महापितृयज्ञ, सोमयाग, मातामहादिकांचीं वार्षिक श्राद्धें, गयाश्राद्ध व अन्वष्टक्यादि श्राद्धें यांत पिंडदान होतें, असें पूर्वीं सांगितलें आहेच. मातापितरांचे क्षयदिवशीं पिंडदान करावें, असा श्राद्धाचा विधि आहे. त्यावरुन पिंडदान करावें असें सिद्ध होत असतांही पुनः पिंडदानाचा विधि सांगितला आहे. तो मातापितरांच्या वार्षिक श्राद्धीं गर्भिणीपतित्व निषिद्ध कालादि उक्त निषेधाचा बाध होण्याकरितां होय. यावरुन विवाह, उपनयन, चौल हीं झाली असतां, क्रमानें एक वर्ष, सहामहिने व तीन महिनेपर्यंत पिंडदान, मृत्तिकास्नान व तिलतर्पण हीं करुं नयेत, असा निषेध आहे, त्याचाही बाध होतो. सपिंडीकरण व मासिकें यांमध्येंही जें पिंडदान करणें त्याचें उपलक्षणपर क्षयदिवसाचें ग्रहण केलें आहे.