त्यांत श्राद्धाचे पार्वण, श्राद्ध , एकोद्दिष्ट श्राद्ध, नांदी श्राद्ध व सपिंडीकरण श्राद्ध, असे चार प्रकार आहेत. पित्रादि त्रयीस उद्देशून विहित व तीन पिंडांनीं युक्त तें पार्वणश्राद्ध होय. त्याचे एक पार्वणक, द्विपार्वणक व त्रिपार्वणक असे तीन प्रकार आहेत. पिता इत्यादिकांचे मृततिथीचे दिवशीं जें प्रतिसांवत्सरिक श्राद्ध केलें जातें तें एकपार्वणक होय. अमावास्यादि षण्णवति श्राद्धें, नित्य श्राद्धें, महालय व अन्वष्टक्य यांशिवाय इतर जीं श्राद्धें, तीं द्विपार्वणक होत. या श्राद्धामध्यें सपत्निक पित्रादित्रयी व सपत्निक मातामहादि त्रयी यांचाच उद्देश आहे. अन्वष्टका श्राद्ध त्रिपार्वणक होय. या श्राद्धांत पित्रादि त्रयी व मातादि त्रयी सपत्निक मातामहादि त्रयी या तीन पार्वणांचा उद्देश आहे. अन्वष्टका श्राद्ध त्रिपार्वणक होय. या श्राद्धांत पित्रादि त्रयी व मातादि त्रयी सपत्निक मातामहादि त्रयी या तीन पार्वणांचा उद्देश आहे. महालय श्राद्ध व तीर्थ श्राद्ध हीं पार्वणैकोद्दिष्टरुप श्राद्धें आहेत; कारण या दोन्ही श्राद्धांत पित्रादि तीन पार्वणें व पत्नी इत्यादि एकोद्दिष्टगण यांचा उद्देश आहे. कित्येक शिष्ट मातामह व मातामही यांचीं पृथक् पार्वणें करुन चार पार्वणांनीं युक्त अशीं हीं दोन श्राद्धें करितात. कित्ये्कांच्या सूत्रांत दर्शश्राद्धही तीन पार्वणांनीं युक्त किंवा चार पार्वणांनीं युक्त करावें, असें हेमाद्रींत सांगितलें आहे. एकाच्याच उद्देशानें करावयाचें असलेलें व एकपिंडानें युक्त तें एकोद्दिष्ट श्राद्ध. एकोद्दिष्टाचेही नवसंज्ञक, नवमिश्रसंज्ञक व पुराणसंज्ञक असे तीन प्रकार आहेत. मृताच्या प्रथम दिवसापासून दहादिवसपर्यंत जी विहित श्राद्धें तीं नवसंज्ञक होत. एकाद्शाहापासून पुनाह्वापर्यंत जीं श्राद्धें तीं नवमिश्र श्राद्धें होत. हीं श्राद्धें विश्वेदेवहीन हीन आहेत. त्यांहून पुढचीं--कनिष्ठभ्रात्यांचें वार्षिक, शस्त्रानें हत झालेल्याचें चतुदर्शी श्राद्ध, इत्यादि तीं पुराणसंज्ञक होत. कित्येक ग्रंथकारांचें मत असें आहे कीं, सपिंडीनंतर करावीं लागणारीं जीं पार्वण श्राद्धें तीं पुराणसंज्ञक होत. पुत्रजन्म, विवाह, इत्यादि प्रसंगीं जें वृद्धिश्राद्ध करावयाचें असतें तें नांदीश्राद्ध होय. हें नांदीश्राद्ध पूर्वार्धांत विस्तारानें सांगितलें आहे. गर्भाधान, पुंसवन, सीमोंतोन्नयन,अ आधान व सोमयाग यांत करावें लागणारें व कर्मांगभूत असलेलें जे वृद्धिश्राद्ध त्यास इष्टिश्राद्ध असें म्हणतात. या श्राद्धांत क्रतु, दक्षसंज्ञक, विश्वेदेव घ्यावेत. अन्यकर्मांत जें नांदीश्राद्ध तें वृद्धिसंज्ञक होय. वृद्धिसंज्ञक श्राद्धांत सत्यवसुसंज्ञक विश्वेदेव घ्यावेत. अन्यकर्मांत जें नांदीश्राद्ध तें वृद्धिसंज्ञक होय. वृद्धिसंज्ञक श्राद्धांत सत्यवसुसंज्ञक विश्वेदेव असे नामभेद व देवभेद आहेत. इतर सर्व समान जाणावें. हें नांदीश्राद्ध तीन पार्वणांनीं युक्त असल्यामुळें पार्वण भेदांर्तात असलें तरी दर्शादि श्राद्धाहून त्याचे धर्म पुष्कळ भिन्न असल्यानें तें निराळें सांगितलें. मृताचा बारावा दिवस इत्यादि कालीं पिंड व अर्ध्य यांचे संयोजन इत्यादि रुप जें कर्म तें सपिंडीकरण होय. हें सपिंडीकरण पार्वण व एकोद्दिष्ट असें विकाररुप आहे. याविषयीं विशेष निर्णय पुढें सांगेन. याप्रमाणें पार्वण व एकोद्दिष्ट असें दोन प्रकारचें श्राद्ध आहे. हें श्राद्ध पुनः नित्य, नैमित्तिक व काम्य असें तीन प्रकारचें आहे. नियत् निमित्तप्राप्त जें विहित श्राद्ध तें नित्य होय. जसें:----दर्शादि श्राद्ध. प्रत्यहीं विहित श्राद्ध हीं नित्य संज्ञक आहे. तें दोनपार्वणांनीं युक्त व विश्वेदेवहीन असें सांगितलें आहे. अनियत निमित्त प्राप्त जें विहित श्राद्ध तें नैमित्तक होय. जसें सूर्यचंद्राच्या ग्रहणादिकालीं हेंही षड्दैवत आहे. फलाच्या इच्छेनें जें कर्तव्य तें काम्यश्राद्ध. जसें पंचमी इत्यादि तिथीस व कृत्तिका नक्षत्रीं कर्तव्य श्राद्ध.