आंगण किंवा श्राद्धभूमीचे द्वार यांचे ठायी चतुष्कोन दोन हस्तपरिमित किंवा प्रादेशमात्र उत्तरेकडे उतरते देवमंडल करून दक्षिणप्रदेशी सहा अंगुले जागा सोडून दक्षिणेकडे उतरते ४ हातपरिमित किंवा अवितस्तिमात्र पित्रमंडल वर्तुल, सव्य व अपसव्य, प्रादक्षिण्य व अप्रादक्षिण्य, इत्यादि दैवपितृधर्माने गोमूत्र व गोमय यांनी करावे. नंतर यथायोग्य दर्भ, यव, तिल, गंध व पुष्पे यांनी त्या मंडलाची पूजा करावी. मंडलाच्या समीप पाटावर पूर्वाभिमुख बसलेल्या ब्राह्मणाच्या पायावर उत्तराभिमुख किंवा पश्चिमाभिमुख श्राद्धकर्त्याने 'अमुक संज्ञकाविश्वेदेवा इदंवः पाद्यं स्वाहानमम' असे म्हणून यव, गंध व पुष्प, यांनी युक्त असलेले उदक अंजलीने घालून 'शन्नोदेवी०' या मंत्राने शुद्धोदकाने ब्राह्मणाचे पाय वरतीच प्रक्षालन करावे. पायाचा अधोभाग प्रक्षालन करू नये, व ग्रंथियुक्त पवित्रक हातात घालून पाद प्रक्षालन करू नये. पितृमंडलाचे ठायी उत्तराभिमुख बसलेल्या ब्राह्मणाचे पायावर कर्त्याने दक्षिणाभिमुख होऊन तिल, गंध, इत्यादिकांनी युक्त असलेले उदक अंजलीने पितृतीर्थाने 'पितरममुक नामरूप गोत्रे इदंते पाद्यं स्वधानमः' याप्रमाणे तीन ठिकाणी करावे. ब्राह्मण एकच असेल तर 'पितृपितामह प्रपितामहा इदंवः पादं' असे बहुवचनान्त वाक्य म्हणून उदक घालावे; व 'शन्नोदेवी०' इत्यादि मंत्राने पूर्वीप्रमाणे पाय धुवावे. असेच पुढेही पित्रादि त्रयस्थानी तीन ब्राह्मणांचा क्षण असता 'इदंते' असा व एक ब्राह्मणपक्षी 'इदंवः' असा बहुवचनाने ऊह जाणावा. याप्रमाणे मातामहादि पार्वणाविषयी जाणावे. पाद्यसमयी पाद्याचे पूर्वी पादार्घ्य व पाद्याचे नंतर गंध, पुष्प व अक्षता पायापासून मस्तकापर्यंत पूजनपूर्वक देवाकडे 'एषवः' पादार्घ्यः अशा वाक्याने देऊन पितरांकडेही तिलांनी मस्तकापासून पायापर्यंत पूजनपूर्वक पादार्घ्य दान करावे, असे सांगितले आहे; ते कात्यायन इत्यादिकांचा आचार असल्यामुळे त्यांसच विहित आहे, ऋग्वेदीयांस हा आचार नाही. त्यानंतर पाद्य देऊन शेष असलेले गंध, यव व तिल इत्यादिक सव्याने व अपसव्याने उभय मंडलावर टाकून आपले पाय प्रक्षालन करून व पवित्रक टाकून दुसरी पवित्रके धारण करावीत; व देवमंडलाच्या उत्तरप्रदेशी आपण व ब्राह्मण यांनी द्विवार आचमन करून श्राद्धदेशी जावे. पादप्रक्षालनाचे उदक व आचमनाचे उदक यांचा संसर्ग करू नये. अपसव्याने 'अमुक श्राद्धसिद्धिरस्तु' असे म्हणावे. ब्राह्मणांनि प्रतिवचन दिल्यावर त्यांचा अंगुष्ठविरहित दक्षिण हस्त धरून सव्य व अपसव्य यांनी 'भूर्भुवस्वः समाध्वं' असे म्हणून दर्भसहित पीठावर ब्राह्मणांस त्वरित बसवावे. त्यात देवस्थानी पूर्वाभिमुख व पित्र्यस्थानी उत्तराभिमुख ब्राह्मण बसवावेत. तसे करणे अशक्य असल्यास दक्षिणदिशा वर्ज करून अन्यदिशाभिमुख बसवावेत.