कनिष्ठ पुत्र अग्नियुक्त असल्यास त्यानें सपिंडीकरणही बाराव्या दिवशीं करावें. औरस पुत्र नसेल तर पुत्रिकापुत्र, क्षेत्रज पुत्र, इत्यादि बारा प्रकारचे पुत्र उक्त आहेत. तथापि कलियुगांत या पुत्रांचा निषेध असल्यानें औरस पुत्रांच्या अभावीं दत्तकच अधिकारी आहे. माता व पिता या उभयतांनीं अथवा दोहोंतून एकानें विधिपूर्वक दिलेला (दत्त) व प्रतिगृहीत्याच्या वर्णांतील असलेला तो दत्तक होय. स्त्रियेचें अनुमोदन घेऊन पतीनें पुत्र देणें हें आपत्तिविषयक जाणावें. अत्यंत आपत्ति असेल तर स्त्रियेचें अनुमोदन नसतांही पतीनें पुत्र दत्तक द्यावा. स्त्रियेस पुत्र देण्याचा अधिकार पत्नीच्या अनुमतीनेंच आहे. याविषयीं विशेष विचार पूर्वींच सांगितला आहे. दत्तकाच्या अभावीं पौत्र व पौत्राच्या अभावीं प्रपौत्र. दुसर्या कित्येक ग्रंथकाराचें असें म्हणणें आहे कीं, औरसाच्या अभावीं पौत्र, त्याच्या अभावीं प्रपौत्र व त्यांच्या अभावीं दत्तक. मौंजी झालेला पौत्र असला तरी मौंजी न झालेला औरस पुत्रच अधिकारी आहे. हा अधिकार एक वर्षाहून अधिक असलेल्यास व चौल संस्कार झालेल्यासच आहे. चौल संस्कार झाला नसून पूर्ण तीन वर्षें झालेल्यासही हा अधिकार आहे. मौंजी न झालेल्यानेंही मातापितरांचें अंत्यकर्म व सांवत्सरिकादिक श्राद्ध मंत्रपाठपूर्वकच करावें. सर्व कर्म करण्यास सामर्थ्य नसेल तर मौंजीं न झालेल्यानें समंत्रक अग्नि मात्र द्यावा, व इतर कर्म दुसर्याकडून करवावें. याप्रमाणें श्राद्ध, दर्शश्राद्ध, महालय इत्यादिकांत संकल्प मात्र करवून इतर कर्म दुसर्याकडून करवावें. कित्येक ग्रंथकार असें म्हणतात कीं, तीन वर्षांहून कमी वयाचा असून चौल संस्कार झालेला नसला तरी त्यानेंही समंत्रक दहन मात्र करवून शेषकर्म दुसर्याकडून करवावें. मौंजी झालेलाच दत्तक पुत्र अधिकारी होतो. दत्तकाचा व प्रपौत्राचा अभाव असतां भर्त्याचें पत्नीनें व पत्नीचें भर्त्यानें दहन इत्यादिक और्ध्वदेहिक कर्म व सांवत्सरिक श्राद्धादिक करावें. सापत्न पुत्र असेल तर भर्त्यालाही अधिकार नाहीं. कारण मातेचें अंत्यकर्म औरस पुत्रानें करावें. त्याच्या अभावीं सापत्न पुत्रानें करावें, असें वचन आहे. स्त्रियेनेंही पतीचें समंत्रक और्ध्वदेहादिक कर्म करावें. सामर्थ्य नसेल तर समंत्रक अग्नि मात्र आपण देऊन शेषकर्म दुसर्याकडून करवावें. श्राद्धांत संकल्प मात्र स्वतां करुन शेष कर्म दुसर्याकडून करवावें.