धर्मसिंधु - श्राद्धाचा काल

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


श्राद्धाचा काल

श्राद्धकाल अमावास्या, संक्रांती, युगादि, मन्वादि व महालय इत्यादि बहुधा पूर्वीच्या परिच्छेदात सांगितले आहेतच. आणखीही कित्येक आहेत ते सांगतो- महातीर्थप्राप्ती, व्यतिपात, मृतदिवस, दोन ग्रहणे, श्राद्ध करण्याविषयी इच्छा, श्रोत्रियादि ब्राह्मणाचे आगमन, अर्धोदय, कपिलाषष्ठी इत्यादि अलभ्य योग, ग्रहपीडा, दुःस्वप्नदर्शन, नवान्नप्राप्ति, नवोदकप्राप्ति गृहप्रच्छादन इत्यादिक निमित्त हे श्राद्ध काल होत. "भद्रा, व्यतिपात व रविवार यांचा योग आला तर तो पद्मक योग होय, व तो अयनादिकांहून चतुर्गणित पुण्यकारक आहे, व सर्व मासात कृष्ण पक्षात श्राद्ध करावे, असे सांगितले आहे. या पक्षात प्रतिदिवशी किंवा पंचमीपासून किंवा ज्या दिवशी श्राद्ध करण्यास अनुकूलता असेल त्या दिवशी असे तीन पक्ष आहेत. मासातुन एक दिवस कर्तव्य असता अमावास्येच्या दिवशी करावे. नारायणवृत्तीमध्ये असे सांगितले आहे की, दर्शश्राद्धानेच श्राद्धाची सिद्धी होते. सर्व मासात दर्शश्राद्ध करण्यास सामर्थ्य नसेल तर कन्या, कुंभ व पक्ष वृषभ या राशीस रवि असता तीन अमावास्या तिथीस किंवा एक अमावास्या तिथीस श्राद्ध करावे. साग्निक पण अशक्त असेल तर त्याने पिंडपितृयज्ञ मात्र केला असता दर्शश्राद्धाची सिद्धी होते. निरग्निकाच्या दर्शश्राद्धाची सिद्धि ब्राह्मणभोजनमात्राने किंवा धान्यादि द्रव्यदानाने होते. सर्व कृष्णपक्षात महालयाचा कृष्णपक्ष श्रेष्ठ होय. त्यातही पंधरा दिवस इत्यादि पक्ष व इतरही बराच विस्तार दुसर्‍या परिच्छेदात सांगितला आहे. याविषयी दुसरा विशेष निर्णयकाल तत्त्वविवेचन ग्रंथात आहे. पंधरादिवसपर्यंत जो महालय पक्ष त्याच्या प्रयोगाचा आरंभ केल्यावर अशौच प्राप्त झाले असता केलेले महालय निष्फळ होतात. म्हणून अशौचनिवृत्ति झाल्यावर कोणत्या तरी दिवशी सकृन्महालय मात्र करावा. याप्रमाणे पंचमी इत्यादि पक्षीही असाच निर्णय करावा. अशौचावाचून दुसरा प्रतिबंध प्राप्त झाल्यास प्रतिनिधिद्वारा शेष महालय करावेत. अपुत्र असे पितृव्य, ज्येष्ठ भ्राता इत्यादिकांचे एक पार्वणक महालय श्राद्ध अपरपक्षात त्यांच्या त्यांच्या मृततिथीच्या दिवशी जीवत्पितृकानेही करावे. बारा पूर्णिमांचा संभव नसेल तर माघी, श्रावणी व (भाद्रपदी) ह्या नित्य आहेत. कोणत्याही कृष्ण पक्षात प्रतिपदादि पंधरा तिथि कृत्तिकापासून भरणीपर्यंत नक्षत्रे, विष्कंभादिक योग, सूर्यादिक वार व बवादिक करणे यांचे ठायी श्राद्ध करावे. असे विशेष वचन आहे. यावरून तिथी इत्यादिक जे काल सांगितले ते काम्य श्राद्धाचे काल जाणावे. याप्रमाणे श्राद्धाचा सामान्य काल सांगितला.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-06-28T05:59:35.4670000