मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|पौराणिक कथा|संग्रह ३|
देवकी

देवकी

हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.


’खरंच का कृष्णाने सांदीपनी मुनींना गुरुदक्षिणा म्हणून, त्यांचा मृत पुत्र आणून दिला ? केवढा मोठा झाला आहे माझा कृष्ण--’ देवकी स्वतःशीच विचार करीत होती. ही वार्ता कळल्यावर तिला आश्‍चर्य वाटले होते आणि अभिमानही !

’मृत पुत्र परत आणता येतो ? तो परत भेटू शकतो ?...पण कृष्णाने आणला नाही का ? त्याचा अधिकार केवढा वाढला आहे. त्याने गुरुदक्षिणा म्हणून गुरुजींची मनोकामना पूर्ण केली. माझी इच्छा तो पूर्ण करील का ? कंसाने मारलेल्या माझ्या सहा पुत्रांचे दर्शन मला पुन्हा घडेल का ? त्यांची आठवण झाली की जीव कसा व्याकुळ होतो. वाटतं, त्यांना मांडीवर घ्यावं. कुरवाळावं. त्यांना स्तनपान करावं. कुठं असतील ती मुलं...मला पुन्हा कशी दिसतील...’
देवकी मृत मुलांच्या आठवणीने भावाकुल झाली. त्या नवजात बालकांच्या आठवणींच्या तळाशी असणारे अस्पष्‍ट चेहरे तिच्या डोळ्यांसमोर तरळू लागले. तिचे डोळे भरुन आले; आणि त्या धूसर दृष्‍टीतून ती खोल भूतकाळात गेली. तिला तिच्या विवाहापासूनच्या सार्‍या घटना डोळ्यांसमोर दिसू लागल्या.
देवकीचा विवाह वसुदेवाशी थाटामाटात पार पडला. नवविवाहिता देवकी वसुदेवासह रथात बसली. सासरी जाण्यास निघाली.
कंस हा तिचा चुलत भाऊ. बहिणीवर नितांत प्रेम. देवकी सासरी निघालेली पाहून तिला निरोप द्यायला तो आला. तिला बरं वाटावं म्हणून रथावर चढला. घोडयांचे लगाम हाती घेतले. देवकीने सर्वांचा निरोप घेतला. मंगल वाद्ये वाजू लागली. आणि लवाजम्यासह देवकी निघाली. कंस स्वतः रथ हाकीत होता. संथ गतीने ती वरात पुढे सरकत होती. सगळीकडे आनंद भरुन राहिला होता. देवकी-वसुदेवही सुखसागरात चिंब झाले होते. भावी जीवनाची स्वप्‍नं पाहत होते. भगिनीच्या विवाहाचा आनंद कंसाच्या मुखावरही दिसत होता. आणि एवढयात आकाशात मेघाशिवाय विजा चमकल्या. त्या दिव्य तेजाने सारे दीपले. अनेकांची नजर आकाशाकडे लागली. क्षणार्धात ढगाम्चा गडगडाट व्हावा तसा आवाज झाला. भीतीची एक हलकीशी लहर सगळ्यांच्या मनातून लहरुन गेली. सगळ्यांचे लक्ष आकाशाकडे असतानाच त्यांच्या कानांवर शब्द आले,"कंसा ! मूर्खा...जिच्या रथाचे घोडे तू आनंदाने हाकीत आहेस, त्या देवकीचाच आठवा मुलगा तुला ठार मारणार आहे."
आकाशवाणीचे ते शब्द ऐकताच कंसाचा नूर बदलला. आपल्याच बहिणीचा मुलगा आपला नाश करणार आहे, हे समजताच तो संतापला. रागाने लाल झाला. त्याने घोडयांचे लगाम सोडून दिले. रथाखाली उडी मारली. तलवार उपसली आणि क्रोधाने देवकीला मारण्यासाठी उडी मारली. तलवार उपसली आणि क्रोधाने देवकीला मारण्यासाठी तो तिच्या अंगावर धावून गेला. तिची वेणी एका हातात धरली. तिला रथाखाली ओढून तिच्यावर वार करणार तोच वसुदेव विजेच्या चपलतेने पुढे सरसावले. त्यांनी कंसाला अडवीत म्हटले, "राजकुमार, आपण भोजवंशाचे कुलदीपक. मोठमोठे शूरवीर आपल्या गुणांचे कौतुक करतात. शौर्याचे गोडवे गातात. आणि आता आपण हे काय करता आहात ? अहो, देवकी ही आपली बहीण आहे, ती स्‍त्री आहे आणि शिवाय आत्ताच तिचा विवाह झाला आहे. अशा मंगल प्रसंगी आपण तिला मारणार ?"
"वसुदेवा, हिला जिवंत ठेवणं म्हणजे माझ्या मृत्यूला जिवंत ठेवण्यासारखे आहे. कोणता विचारी पुरुष आपल्या हाताने मृत्यूची जोपासना करील ?"
"अरे, तू जरा विचार कर, जो जन्म घेतो त्याला मृत्यू अटळ असतो. जन्माबरोबरच मृत्यूचाही जन्म होत असतो. आज नाही तर शंभर वर्षांनी पण मृत्यू हा येणारच. आल्या प्राण्याला जावं लागणारच. तेव्हा..."
"मी हिला सोडून देऊ--असंच ना ?"
"होय. कंसा, ही तुझी लहान बहीण आहे. हिचं जीवन अजून उमलायचं आहे. बहरायचं आहे. अजून विवाहाची मंगल चिन्हंही हिच्या अंगावरुन उतरली गेली नाहीत. म्हणून तू हिला मारु नकोस."
वसुदेवाने वेगवेगळ्या प्रकाराने कंसाची समजूत घालण्याचा प्रयत्‍न केला. अनेक हिताच्या गोष्‍टी सांगितल्या; पण त्या दुष्‍ट कंसाची काही केल्या समजूत पटेना. ते पाहून वसुदेवाने मनात विचार केला, ’कोणत्याही उपायाने का होईना हा प्रसंग टाळलाच पाहिजे. या मंगल क्षणी विपरीत घडता कामा नये. त्यासाठी आपली मुलं याच्या स्वाधीन करण्याचे वचन दिले तर ?’
वसुदेवाने मनाशी विचार पक्का केला. आणि तो कंसाला पुन्हा म्हणाला, "हे कंसा, तुला देवकीपासून तर कोणत्याही प्रकारचं भय नाही ना ? आकाशवाणीनेही तसं काही सांगितलं नाही ना ?"
"नाही."
"तुला भीती आहे ती तिच्या मुलांची. तिचा आठवा मुलगा तुला मारणार."
"होय."
"मग मी तिची मुलं तुझ्या स्वाधीन करण्याचं वचन देतो. मग तर झालं ?"
कंसही विचार करु लागला. वसुदेव आपलं वचन कधीच खोटं करणार नाही, याची त्याला खात्री होती. शिवाय त्याला भय होते ते देवकीच्या आठव्या मुलापासून--देवकीपासून नाही ! त्याला वसुदेवाचा विचार पडला. त्याने देवकीला सोडून दिले. दोघेही आपल्या महाली गेले. पण मंगल प्रसंगावर पडलेले कृष्णछायेचे झाकोळून गेले. दिवस उलटू लागले. योग्य समयी देवकीला मुलगा झाला. ठरल्याप्रमाणे त्याला कंसाच्या स्वाधीन करणे भाग होते. वसुदेव देवकीजवळ आले. त्यांचा गळा दाटून आला. कोणत्या शब्दांत देवकीची समजूत घालावी त्यांना समजेना. अखेर मोठया कष्‍टाने ते म्हणाले, "देवकी ! ठरल्याप्रमाणे..."
"आपलं बाळ त्या दुष्‍टाला द्यायला पाहिजे."
"होय. आपला शब्द..."
"नाही, नाथ ! आपलं पहिलंवहिलं बाळ...नाही, त्या दुष्‍टाला देणार नाही."
देवकीच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. तिने बाळाला हृदयाशी घट्ट धरले. वसुदेव देवकीची समजूत घालत होते, "देवकी, अगं, वेडयासारखं करु नकोस. भगवंताला जर कंसाला मारायचंच असेल तर तो सारी व्यवस्था करणार नाही का ? त्याची लीला अतर्क्य आहे. त्यावर विश्‍वास ठेव."
"पण माझ्या आठव्या बाळापासून त्याला भय आहे. यानं त्याचं काय केलंय ?"
"खरं आहे. हे जर कंसाच्या लक्षात आलं तर तो आपलं बाळ परतही देईल. दे बाळाला..."
बराच वेळ समजूत घातल्यानंतर, देवकीने त्याला पुन्हा पुन्हा हृदयाशी धरले. भावावेगाने त्याची कितीतरी चुंबने घेतली. आणि अश्रूंच्या अभिषेकातच तिने त्याला वसुदेवाच्या हातांत दिले. देवकीच्या उचंबळून आलेल्या वात्सल्याने वसुदेवांचेही डोळे पाणावले. त्यांनी बाळाला अलगद हाती घेतले. प्रेमभराने त्याचे चुंबन घेतले. त्याला छातीशी घट्ट धरले. आपल्या अश्रूंना डोळ्यांतच रोधले आणि शिसं भरल्या पायांनी ते देवकीच्या महालातून बाहेर पडले. बाळासाठी रडून रडून जिची चर्या कोमेजून गेली आहे, म्लान झाली आहे, अशी देवकी किती तरी वेळ वसुदेवाच्या पाठमोर्‍या मूर्तीकडे बघत उभी होती.वसुदेव दृष्टिआड होताच तिला शोक आवरेना. तिने आपले अंग मंचकावर झोकून दिले. डोळ्यांतील आसवांनी शय्या भिजून गेली. तिचे मन अंधारुन गेले होते. जीवन शून्यवत वाटत होते. अशा स्थितीत ती किती वेळ होती हे तिलाही कळले नव्हते. ती भानावर आली, ती वसुदेवांच्या हर्षभरित, प्रेमळ हाकेमुळे.
"देवकी...देवकी..." अशा हाका मारत हर्षातिरेकाने वेडावलेल्या स्थितीतच वसुदेव महालात आले. त्यांच्या हातांत त्यांचा तान्हुला होता. ते पाहताच देवकी वार्‍यासारखी पुढे झेपावली. त्यांच्या हातातून बाळाला घेत, त्याला छातीशी कवटाळीत, त्याच्यावर चुंबनांचा वर्षाव करीत ती म्हणाली, "बाळाला परत दिलं त्यानं---आता हे आपल्याजवळच राहणार ना ? आता परत नाही ना नेणार माझ्या बाळाला ?"
"देवकी, त्याने बाळाला घेऊन जा असं सांगितलं."
"काय म्हणाला तुम्हाला ?"
"मी गेलो. बाळाला दाखवलं. मी आल्याच्म पाहून त्याला बरं वाटलं होतं. तो म्हणालाही, ’तू तुझे शब्द विसरणार नाहीस याची खात्री होती मला. म्हणूनच त्या दिवशी तुम्हाला सोडलं.’ मग बाळाला पाहून तो पुढे म्हणाला, ’वसुदेवा, या नाजुक, कोवळ्या मुलाला घेऊन जा परत. यापासून मला भय नाही. आकाशवाणीनं सांगितलं होतं, देवकीच्या आठव्या मुलापासून मला भीती आहे.’ त्याने असे सांगताच मी बाळाला घेऊन आलो."
"देव पावला---आता माझं सोनुलं माझ्याजवळ राहणार----"
"देवकी---"
"आता काय ?"
"तुला माहीत आहे, कंस दुष्‍ट आहे. चंचल वृत्तीचा आहे. त्याचं मन त्यच्या मुळीच स्वाधीन नाही, तो केव्हा बदलेल सांगता येत नाही.
तेव्हा---"
"नका, नाथ---असं काही बोलू नका. अशा बोलण्याने माझ्या मनाला किती यातना होतात म्हणून सांगू---हृदय कोणीतरी करवतीनं कापतंय, असं वाटतं. या शुभ्र घडीला तरी असं अशुभ---"
"देवकी----मला काहीच वाटत नाही का ? पण कंस कसा आहे हे तुलाही माहीत आहे. म्हणून सांगितलं इतकंच---
काही काळ गेला नाही तोच कंसाचा दूत आला. त्याला पाहताच वसुदेव-देवकीच्या मनात धस्स झाले.’आता हा कशाला आला? आणखी कोणतं संकट आता वाढून ठेवलं आहे ?’ असा विचार मनात येत असतानाच तो वसुदेवाला म्हणाला, "आपल्या दोघांना कंसमहाराजांनी बोलावलं आहे. आपल्या मुलाला घेऊन यायला सांगितलं आहे."
दूत निघून गेला. देवकीनं विचारलं,"आता पुन्हा कशाला बोलावलं असेल हो त्यानं ?"
"मी तरी काय सांगू---? पण मी म्हटलं नव्हतं तो चंचल आहे. केव्हा बदलेल सांगता येत नाही."
त्यांनी आपल्या बाळाला घेतले. दोघेही कंसाच्या महालात पोहचले. त्यांना पाहताच कंस संतापाने लालबुंद झाला. झालेला बदल वसुदेवाच्या लक्षात आला. काही वेळापूर्वी शांत, आनंदी असलेल्या कंसाला एवढं संतापायला काय झालं त्यांना कळेना. त्यांना विचार करायला वेळ मिळायच्या आतच कंस कडाडला,"देवकी----आण ते कार्टं इकडं---"
"अरे पण दादा ऽऽ"
"माझ्या डोळ्यांत धूळ फेकता होय ?"
"काही तरी अपसमज होतोय---आम्ही काहीच केलं नाही; उलट आपण सांगितल्यावरुनच बाळाला मी परत नेलं." वसुदेव काकुळतीला येऊन त्याला समजावू लागले.
"चूक तुमची नाही, मलाच कळलं नाही. नारदांनी डोळे उघडले नसते तर---तर मी भ्रमातच राहिलो असतो."
"नारद आले होते इथं---काय सांगितलं त्यांनी ?"
"त्यांनी काय सांगितलं ? माझं हित आणि तुमची कारस्थानं."
"आमची कारस्थानं ?"
"होय. तुमची कारस्थानं ! गोकुळात राहणारे नंद, गोप, गोपी, तू, ही देवकी सगळे देवतांचे अवतार आहेत, आम्हाला मारण्यासाठी सगळ्यांनी अवतार घेतलेत म्हणे ! पृथ्वीवर पापं वाढलीत. त्यांचा नाश करायचा आहे. आणि या देवकीच्या पोटी तो विष्णू अवतार घेऊन मला मारणार आहे."
"पण महाराज, तिच्या आठव्या मुलापासून----"
"गप्प बस----म्हणे आठवा मुलगा ! नारद म्हणाले, तो विष्णू कपटी आहे. आठवा कुणापासून मोजणार ? आठव्या मुलापासून उलटया क्रमाने मोजले तर पहिला मुलगाही आठवा होऊ शकतो. आता माझे डोळे उघडले. आण---आण तो मुलगा इकडे."
कंसाचे डोळे लाल झाले होते. त्याच्या उग्र चेहर्‍याकडे पाहवत नव्हते. त्याचा तो अवतार पाहून देवकी घाबरली. जोराच्या वार्‍याने केळ जशी थरथरावी तशी ती थरथरु लागली. तिने आपलय तान्हुल्याला छातीशी घट्ट धरले. वसुदेवालाही काय करावे काही कळेना. तो गोठून गेल्यासारखा उभा राहिला. कंसाने पुढे पाऊल टाकले. देवकी मागे सरली. तो पुढे आला. त्याने त्या बाळाला हात घातला. देवकीचा प्रतिकार लटका पडला. वसुदेवाने त्याला अडवण्याचा प्रयत्‍न केला पण कंसाने त्याला असा एक तडाखा दिला की, तो खाली कोसळला. त्याने देवकीच्या हातातलं मूल हिसकावून घेतलं. देवकी अक्रोश करु लागली. त्याकडे दुर्लक्ष करुन कंस नशेतच उद्‌गारला,"विष्णू तुझ्या पोटी येणार अन् मला मारणार काय ? थांब, तुलाच मी मारतो."
त्या दुष्‍टाने त्या बाळाचा एक पाय आपल्या आडदांड हातात धरला, त्याला गरगर फिरवले आणि धाड्‌कन खाली आपटले. रक्‍ताच्या चिळकांडया उडाल्या. कंसाचे हात बाळाच्या रक्‍ताने रंगले.
आणि ते भयंकर दृश्‍य पाहून वसुदेव-देवकी बेशुद्ध पडले.
बर्‍याच वेळाने देवकी शुद्धीवर आली ती "बाळ...कुठेस तू ? कंसा ऽऽ---- दुष्‍टा, मारु नकोस रे त्याला----सोड----सोड---त्याला--सोड." असं काहीतरी बरळतच ! तिने हात हलविण्याचा प्रयत्‍न केला. हातांत बेडया होत्या. तिने भोवताली पाहिले. वसुदेव खाली मान घालून तिच्याजवळ बसले होते. त्यांच्याही हातांत बेडया होत्या. ते दोघेही तुरुंगात होते. बाहेर कंसाच्या क्रूर रक्षकांचा पहारा होता. काळ पुढे सरकत होता. दोघेही बंदिखान्यातल्या जीवनाला सरावले होते. अजूनही देवकीचे दुःख कमी होत नव्हते. वसुदेव समजूत घालीत होते--"परमेश्‍वरावर विश्‍वास ठेव. तो सारं व्यवस्थित करील. कंसाला मारण्यासाठी भगवान आपल्याच उदरी येणार असतील, तर ते आपल्या सामर्थ्याने या सार्‍या शृंखला तोडून टाकतील. तू चिंता करु नकोस."
वसुदेवांच्या स्निग्ध शब्दांनी तिला धीर यायचा. दुःख थोडे हलके व्हायचे. काळ हेच दुःखावर औषध असते. हळूहळू दुःखाची तीव्रता कमी होऊ लागली, आणि देवकीला दुसर्‍या बाळाची चाहूल लागली. ती पुन्हा मोहरली; पण क्षणभरच ! सुख आणि दुःख हातात हात घालून त्या बंदिखान्यात वावरु लागले. दुसर्‍या बाळालाही कंसाने ठार केले. देवकीचा आक्रोश ऐकला फक्‍त तुरुंगाच्या दगडी भिंतींनी ! असे एक-दोन वेळा नाही, सहा वेळा घडले. कंसाने देवकीची सहा बाळे, तिच्याकडून हिसकवून घेऊन ठार मारली. जणू तिच्या हृदयाचे सहा वेळा लचके तोडले--क्रूरपणे ! निर्दयपणे !!
सातव्या वेळी देवकी गर्भवती झाली आणि तिचे तेज अधिक देदीप्यमान दिसू लागले. पण काय होतंय ते देवकीला कळलंच नाही नि तो गर्भ पोटातून अचानक नाहीसा झाला. देवकीला आता या यातना सहन होत नव्हत्या. ती भगवंताची प्रार्थना करत होती,
"देवा नारायणा, आता तू अवतार घे आणि या कंसाला, दुष्‍टाला मारुन टाक. आता मला हे दुःख सहन होत नाही रे ! माझ्या तान्ह्या बाळांनी कंसाचं काय वाईट केलं होतं ? डोळ्यांदेखत त्यांचा मृत्यू बघणं कोणत्या मातेला सहन होईल ? देवा, त्या दुःखाची कल्पना करायला माताच बनलं पाहिजे...तू आता लवकर ये आणि या दुष्‍टाला योग्य शिक्षा कर. आता धीर धरवत नाही."
देवकीची प्रार्थना देवाने ऐकली. देवकी आठव्यांदा गर्भवती झाली. या वेळी तिच्या मनाला विलक्षण प्रसन्नता वाटत होती. तिचे तेज आगळेवेगळे दिसत होते. जणू शतकोटी सूर्य-चंद्र तिच्या मुखावर झळाळत आहेत. दिवस जात होते. श्रावण वद्य अष्‍टमीला देवकीने एका सुरेख बाळाला जन्म दिला. थोडयाच वेळात वसुदेव-देवकीला भगवंताने आपले चतुर्भुज रुप दाखविले. पुढचा मार्ग सांगितला. थोडयाच वेळात वसुदेव त्या बालाकाला घेऊन गोकुळात गेले. नंदपत्‍नी यशोदाही त्याच वेळी प्रसूत झाली होती. तिला मुलगी झाली होती. वसुदेवाने अपत्यांची अदलाबदल केली. पुन्हा बंदिशाळेत आले. कंसाला देवकी प्रसूत झाल्याची वार्ता कळताच तो रागारागाने आला. ती कन्या हिसकावून घेतली आणि गरागरा फिरवून शिळेवर आपटणार तोच ती हातून निसटली आणि कंसाला म्हणाली,"दुष्‍टा, मी योगमाया तुझ्या हाती थोडीच सापडणार ? तुझा शत्रू अन्यत्र वाढतो आहे. तो तुला ठार केल्याशिवाय राहणार नाही."
कंसाचा चेहरा उतरला. कृष्णाच्या नाशासाठी त्याने खूप प्रय‍त्‍न केले, पण उपयोग झाला नाही. कृष्णानेच कंसाला मारले. नंतर तो गुरुगृही गेला, विद्यासंपन्न झाला, आणि गुरुदक्षिणा म्हणून सांदीपनीमुनींना त्यांचा मृतपुत्र आणून दिला. देवकीच्या डोळ्यांसमोरुन या सगळ्या घटनांचा चित्रपट सरकला. तिचा विचार अजूनही चालू होता. आता तिला कृष्णभेटीची उत्सुकता लागली होती. ती त्याची चातकासारखी वाट पाहत होती.एक दिवस सकाळीच कृष्ण-बलराम देवकीच्या महाली आले. त्यांनी मातेला वंदन केले. आशीर्वाद देऊन तिने कृष्णाला आपल्या एका बाजूला आणि बलरामाला एका बाजूला बसवले. देवकीच्या मनातून आपल्या मृतपुत्रांची स्मृती जात नव्हती. तिने कृष्णाकडे बघत हाक मारली, "कृष्णा--मी असं ऐकलं आहे की."
"काय, आई ?"
"गुरुगृही तू विद्या संपादन केलीस आणि गुरुदक्षिणा म्हणून सांदीपनीमुनींना तू त्यांचा मृतपुत्र परत आणून दिलास."
"खरं आहे. त्यांनी आणि गुरुपत्‍नीने आमच्यावर मुलासारखं प्रेम केलं. आम्ही इकडे आल्यावर त्यांच्या जीवनात फार मोठी पोकळी निर्माण होणार होती. त्यांनी सूचित केलं, ’माझा पुत्र असता तर-तर तो कायम माझ्याजवळ राहिला असता. पण आज तो...’ हे शब्द म्हणत असताना ते गहिवरले. त्यांचे डोळे पाणावले. त्यांची ती भावाकुल स्थिती माझ्याच्याने पाहवेना. म्हणून मी गुरुदक्षिणा म्हणून..."
देवकीचे डोळेही पाणावले. तिचा प्रेमळ हात कृष्णाच्या पाठीवरुन फिरत होता. तो स्पर्श वेगळा होता. बोलका होता. त्याने आईच्या मुखाकडे पाहिले नि तो म्हणाला, "तुझ्या डोळ्यांत पाणी ?"
"बाळा, तुझ्या गुरुजींचं-गुरुपत्‍नीचं दुःख हृदयाला भिडलं...."
"आईऽऽ !"
"हो. कृष्णा...आपला एक पुत्र जरी काळाने हिरावून नेला असला तरी मातेला किती दुःख होतं, त्याचा अनुभव मी घेतला आहे. पण मी...मी आणखी दुर्दैवी...."
"आई, असं का म्हणतेस ? बलदादा, मी-आम्ही दोघं समर्थ असताना तू स्वतःला दुर्दैवी का म्हणतेस ?"
"तसं नाही रे...तुमच्यासारखी गुणी मुलं, सामर्थ्यसंपन्न मुलं लाभायला भाग्यच लागतं. मी भाग्यवती आहे कृष्णा, पण..."
"पण काय, आई ?"
"मला माझ्या गतपुत्रांची स्मृती अस्वस्थ करते आहे. ती सहा बाळं माझ्या डोळ्यांसमोर येतात. वाटतं, त्यांना भेटावं. त्यांना आंजारावं-गोंजारावं ! त्यांना मांडीवर खेळवावं. कृष्णा, वेडी म्हणशील मला. पण मातृप्रेम वेडंच असतं रे ! वाटतं, त्यांना स्तनपान करावं. कृष्णा..."
"बोल, आई."
"कृष्णा, माझ्या इच्छेसाठी....माझ्यासाठी त्या बाळांना आणशील परत ? त्यांना एकदा डोळे भरुन पाहावंसं वाटतं रे..."
कृष्णाने देवकीच्या मुखाकडे पाहिले. त्या बालकांना भेटण्याची आतुरता, त्यांच्या वियोगाचं दुःख, कारुण्य अशा कितीतरी भावना तिच्या मुखावर दाटल्या होत्या. तो म्हणाला, "आई, एवढंच ना ! त्यासाठी एवढं दीन व्हायचं काय कारण ? जे मी माझ्या गुरुसाठी केलं ते मी माझ्या मातेसाठी करु शकणार नाही का ? मातेची इच्छा पूर्ण करणं हे कर्तव्य आहे माझं. आई, तू काळजी करु नकोस. मी तुझी साही मुलं तुला भेटवितो."
"खरंच...कृष्णा...खरंच भेटतील ती मला ?"
"होय, आई. तू निश्‍चिंत रहा.
कृष्णाच्या बोलण्याने तिचा चेहरा उजळला. तिच्या मुखावर आनंद मावेनासा झाला. कृष्ण, बलराम दोघांनीही देवकीला नमस्कार केला. प्रेमळ शब्दांनी आणि भरल्या हृदयाने तिने आशीर्वाद दिला. ते दोघे महालाबाहेर पडले. तिचे मन स्वप्‍न-विभोर बनले. मनाला असंख्य मोरपिसं फुटली. तिच्या रोमारोमात आनंद भरुन राहिला होता.
कृष्ण आणि बलराम यांनी योगमायेचा आश्रय घेऊन सुतल लोकात प्रवेश केला. दैत्यराज बलीचे तेथे राज्य होते. त्याने रामकृष्णांना आलेले पाहताच त्यांचे स्वागत केले. त्यांना वंदन करुन उत्तम प्रकारच्या आसनावर बसविले, त्यांचे यथाविधी पूजन केले. त्यांना बहुमूल्य वस्‍त्राभूषणे दिली. त्या आदरातिथ्याने संतुष्‍ट होऊन कृष्णाने बलीला त्याचे क्षेमकुशल विचारले. काही वेळाने बलीने विचारले, "देवाधिदेवा. आज पाताललोकी येणं का केलंत ? आपलं कोणतं प्रिय मी करावं ?"
"दैत्यराज, तुझं औदार्य अखिल विश्‍वाला माहीत आहे. तू उदार आहेस म्हणून मी पुन्हा दान मागायला आलो आहे."
"आता मी आपल्याला काय देणार ? माझ्याकडे आता काही देण्यासारखं...."
"आहे. म्हणूनच आलो आहे."
"सांगावं आपण. मी जरुर देईन. अतिथीला तृप्‍त करुन, भरल्या मनानं पाठविण्यात आनंद असतो.""दैत्यराज, माझ्या मातेची सहा मुलं, ती जन्मल्याबरोबरच कंसाने ठार मारली होती. त्या मुलांसाठी माझी माता अत्यंत शोकाकुल झाली आहे आणि ति मुलं तुझ्याजवळ आहेत. माझ्या मातेचा शोक दूर करण्यासाठी ती माझी भावांडे मला हवी आहेत. ती तू मला दे."
श्रीकृष्णाचे बोलणे ऐकताच बलीने ती छोटी बालके कृष्णाच्या स्वाधीन केली. कृष्ण-बलराम त्या मुलांसह द्वारकेला परत आले. देवकी त्यांची वाट पाहत होती. कृष्ण-बलरामाला तान्हुल्या मुलांना घेऊन आलेले पाहताच ती देहभान विसरली. तिचा आनंद गगनात मावेना. कृष्ण महालात आला. त्याने ती मुले-त्याची भावंडे-आईच्या स्वाधीन केली. त्या मुलांना घेताच देवकीचे वात्सल्य उचंबळून आले. ती पुन्हा पुन्हा त्या मुलांना आपल्या हृदयाशी कवटाळू लागली. त्यांना मांडीवर घेऊन थापटू लागली. त्यांची पुन्हा पुन्हा चुंबने घेऊ लागली. त्यांची मस्तके हुंगू लागली. तिच्या स्तनांतून दूध येऊ लागले. तिने त्या मुलांना पदराखाली घेतले. त्यांना स्तनपान करविले. त्या मुलांच्या स्पर्शाने ती जणू सुखसमुद्रात पोहत होती. सुखामृतात भिजून चिंबचिंब झाली होती. त्या बालकांशिवाय तिला अन्य काहीही दिसत नव्हते. जाणवत नव्हते. ती आणि मुले दोन्ही एकरुप झाले होते. कृष्ण तिच्या जवळ उभा होता. आईच्या वात्सल्यमूर्तीचा तो नव्याने पुन्हा अनुभव घेत होता. त्याच्या मनातही मातृप्रेमाच्या लहरी उचंबळल्या. देवकीच्या त्या भावसमाधीचा भंग करीत तो म्हणाला, "आई ऽऽ"
"हं..."
"आई ऽऽ...या सगळ्यांपेक्षा मी लहान आहे. शेंडेफळ आहे तुझं..."
त्या शब्दांनी देवकी भारावून गेली. त्या बछडयांना थोडंसं बाजूला करीत तिने आपले हात पसरले. जणू वात्सल्याला अंकुर फुटले. कृष्णही पुढे गेला. मोठया प्रेमाने तिने त्याला आपल्या मांडीवर घेतले. त्याच्या मुखावरुन पुन्हा पुन्हा आपला हात फिरवला. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू झरत होते. कृष्णाला ती त्यांनी न्हाऊ घालत होती. आणि वात्सल्याच्या त्या अपूर्व संगमाने कृष्णाच्या नेत्रांतूनही अश्रू झरत होते.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP