मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|पौराणिक कथा|संग्रह ३|
सुभद्रा

सुभद्रा

हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.


अर्धी रात्र उलटून गेली होती. वद्यपक्षातल्या तृतीयेचा चंद्र आकाशात बराच वर आला होता. सुभद्रा आपल्या दोन दासींसह राजप्रासादाबाहेर आली. तिने पाहिले, सारथी रथे घेऊन तयार होता. त्या तिघीजणी रथात बसल्या. गंगेवर पर्वस्नानासाठी सुभद्रा निघाली होती. सारथ्याने घोडयांना इशारा केला. रथाने वेग घेतला. थोडयाच वेळात त्या गंगाकिनारी आल्या. खाली उतरुन चालू लागल्या. जाता जाता सुभद्रेचे लक्ष गेले, एका झाडाला एक अप्रतीम घोडी बांधलेली होती. उमदं जनावर ! डौल असा होता की, पाहत राहावे. सुभद्राही क्षणभर पाहत राहिली. मनात विचार आला, "किती छान घोडी आहे. आपल्या अश्‍वशाळेत असायला हवी होती. कुणाची बरं असावी ? अन् अपरात्री अशी वृक्षाला का बरं बांधून ठेवलेली असावी ? हिचा मालक कुठे दिसत नाही..." तिने इकडे-तिकडे पाहिले, पण कोणीच दिसेना. ती नदीकडे चालली. तिने समोर पाहिले. एक राजवेषधारि तरुण गंगेत आत्महत्या करण्याच्या तयारीत होता. ती दासींसह पुढे गेली अन् त्याला विचारले, "आपण कोण आहात ? अशा उत्तररात्री गंगेवर कसे ?" त्या पुरुषाने चमकून पाहिले. कुणीतरी राजघराण्यातील स्त्री असावी, असं त्याला वाटलं. आता त्याला आत्महत्याही करता येणार नव्हती. तो क्षणभर विचलित झाला. चपापला. मग तो म्हणाला, "मी अभागी आहे. माझ नाव -"
"सांगा. निःसंकोचपणाने सांगा."
"अवन्तीपती दण्डीराज -"
"आपण अवन्तीपती अन् असा आत्महत्येचा प्रसंग आपल्यावर यावा ? कोणत्या संकटात सापडला आहात ?"
"देवी ! ऐकून काय करणार आहेस ? माझं संकट ऐकून त्रिभुवनात मला कोणी आश्रय दिला नाही. मदत केली नाही. तिथं आपण..."
"मी मदत करीन, पण संकट तर समजायला हवं."
"देवी, माझ्यासाठी संकटाला निमंत्रण देऊ नकोस. मला निदान आत्महत्या करुन तरी सुटू दे."
"क्षमा करा. पण आपलं संकट सांगितल्याशिवाय आता आपण काहीही करु शकणार नाही."
"सुभद्रेच्या शब्दांत नम्रता आणि निश्‍चय यांचे विलक्षण मिश्रण झालेले होते. अवन्तीपतीला आपले संकट सांगितल्याशिवाय गत्यंतर उरले नाही. तो म्हणाला, "देवी, माझ्याकडे एक त्रिभुवनात सुंदर असणारी एक घोडी आहे."
"त्या वृक्षाला बांधलेली ?"
"होय. त्या घोडीवर माझं मनापासून प्रेम आहे. तिचा क्षणभराचाही विरह मी सहन करु शकणार नाही. परंतु द्वारकाधीश श्रीकृष्ण माझ्या प्रिय घोडीला बलपूर्वक हरण करण्याचा प्रयत्‍न करीत आहेत."
"कोण-कृष्ण...?"
"होय, देवी ! त्यांच्याशी वैर पत्करुन लढण्याची शक्‍ती माझ्या अंगात नाही आणि या संकटासाठी मला आश्रय देऊन कृष्णाचा रोष कोण पत्करणार ? त्यामुळे मला कोणीही आश्रय देत नाही. "करुण स्वरात दण्डिराजाने सांगितले.
"मी तुम्हाला आश्रय देते." सुभद्रा निश्‍चयी स्वरात म्हणाली.
"कोण...आपण ? आपण मला आश्रय देणार ?"
त्याच्या चेहर्‍यावर आशेचा किरण चमकला. तो तिच्याकडे आश्‍चर्याने बघू लागला. तिला त्याने विचारले, "पण देवी, आपण...आपण कोण ?"
"मी श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा ! मी तुम्हाला आश्रय देते. माझे बलवान, समर्थ स्वामी आणि माझा वीरपुत्र अभिमन्यू तुमचं रक्षण करतील. श्रीकृष्ण माझा भाऊ आहे म्हणून आपण जरासुद्धा शंकित होऊ नका. आपल्याला आम्ही आश्रय दिला आहे."
सुभद्रेने पर्वस्नान आणि आन्हिक उरकले. दण्डीराज आपल्या घोडीला घेऊन सुभद्रेबरोबर पांडवांच्या आश्रमाला आला.त्याची योग्य ठिकाणी व्यवस्था करुन सुभद्रा अर्जुनाकडे गेली. पहाटे पहाटेच सुभद्रा आलेली पाहताच अर्जुनाला आश्‍चर्य वाटले. त्याने विचारले, "आज इतक्या सकाळीच येणं केलंत ?"
"हं ! आपल्याकडे एक महत्त्वाचं काम घेऊन आले आहे. करणार ना ?"
"आपलं काम अन् ते करणार नाही असं होईल का ?"
"पण हे काम वेगळं आहे. नाजूक आहे..."
"काम तर सांगा."
"श्रीकृष्णाशी युद्ध !"
"आज सकाळीच थट्टा करायची लहर आलेली दिसतेय."
"थट्टा नाही. अगदी खरंच !"
मग सुभद्रेने पर्वस्नानाला जात असताना घडलेला सगळा प्रसंग अर्जुनाला सांगितला. दण्डीराजाला अभय दिले असून त्याला आपल्याबरोबर आणल्याचेही सांगितले. ते ऐकून मात्र अर्जुन अस्वस्थ झाला. कृष्ण त्याचा जिवश्‍चकंठश्‍च सखा. त्याच्याशी संघर्ष. त्याला कल्पनाही सहन होईना. काय बोलावे हे त्याला सुचेना. ती अस्वस्थता पाहून तिनेच अर्जुनाला विचारले, "स्वामी, देणार ना दण्डीराजाला आश्रय ? आपल्यावतीनं मी त्याला आश्रय दिला आहे."
"सुभद्रे, तू हे काय केलंस...कसल्या संकटात मला पाडलंस ? कृष्णाशी वैर करायला लावतेस ? तो त्रिभुवनाचा नायक. त्याच्याशी कोणाला तरी वैर करता येईल का ? त्याच्याविरुद्ध युद्धात कोणाला तरी जय मिळेल का ?"
"पराभवाची भीती वाटते आपल्याला ?
"तसं नाही, पण कृष्णासारखा मित्र....त्याच्याशी...."
"नाथ, आपण क्षत्रिय आहात. क्षात्रधर्म आपण जाणता. आणि त्याच विश्‍वासावर मी दण्डीराजाला अभय दिले. आपल्या पराक्रमावर विश्‍वासून मी शब्द दिला."
"सुभद्रे, खरं आहे तुझं, पण मला कृष्णाविरुद्ध शस्‍त्र उचलणे कसे शक्य आहे ?"
"आपल्याला आपली मैत्रीच सांभाळीत बसायचं आहे तर ? आपल्या धर्मापेक्षा आपल्याला मैत्री अधिक आहे. ठीक आहे."
"मला समजावून घे..."
"नाथ, मला एवढंच कळतं, आपण आपल्या क्षात्रधर्माचं पालन करणं आवश्यक आहे. एखाद्यावर अन्याय होत असेल तर क्षत्रियाने त्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. अन्याय करणारा कोण आहे त्याची पर्वा न करता.
आणि नाथ, शरण आलेल्याचे रक्षण करणे हाही क्षत्रियाचा धर्म आहे. आपल्याला आपली मैत्रीच प्रिय असेल तर माझी हरकत नाही; पण श्रीकृष्ण जसा आपला मित्र आहे तसाच माझा भाऊ आहे; आणि तरीही मी, दण्डराजावर अन्याय होतो आहे, तो शरण आला आहे, असं पाहून, त्याला आश्रय दिला आहे. मी तुमच्या आणि अभिमन्यूच्या पराक्रमाच्या विश्‍वासावर शब्द दिला होता. नाथ, लक्षात ठेवा, आपण आपल्या क्षात्रधर्माचं रक्षण करायचं नाकारलंत तर ही सुभद्रा स्वतः आपल्या भावाशी युद्ध करेल; पण दिलेला शब्द ती कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही."
सुभद्रेचे ते रुप पाहून आणि तिचा निश्‍चय पाहून अर्जुन अवाक्‌ झाला. तिचे हे रुप त्याला नवे होते. एवढयात अभिमन्यूही तेथे आला. त्याला सगळी घटना कळताच त्यानेही सुभद्रेच्या मताशी सहमती दर्शविली. अर्जुनालाही सुभद्रेचे म्हणणे पटले होते. मग त्याने सांगितले, "सुभद्रे, काळजी करु नकोस. तू युद्धावर जाण्याची आवश्यकता नाही. तुझी प्रतिज्ञा तीच माझी प्रतिज्ञा आहे. मी दण्डीराजाला अभय देत आहे. निश्‍चिंत मनाने जा."
अर्जुनाने दण्डीराजाला आश्रय दिल्याचे श्रीकृष्णाला समजले. त्यालाही आश्‍चर्य वाटले. त्याने धर्मराजाला निरोप पाठविला,"अर्जुनाला समजावून सांग--माझ्याशी युद्धाला उभा राहू नकोस. माझं सामर्थ्य तुला माहीत आहे. तेव्हा दण्डीराजासह त्याची घोडी माझ्या स्वाधीन कर."
धर्मराजाला निरोप कळताच त्याने अर्जुनाला बोलावून सांगितले, "अर्जुना, कृष्णाचा निरोप आला आहे."
"दादा, कल्पना आहे मला त्याची."
"मग, कृष्णाशी शत्रुत्‍व का पत्करतो आहेस ? देऊन टाक ती घोडी कृष्णाला."
"दादा, आपल्याला सारं समजलं आहे. दण्डीराजाला आपण एकदा आश्रय दिल्यावर, आता त्याला झिडकारणं हे क्षत्रियाला शोभणारं नाही. आपला प्राण गेला चालेल पण, दिलेलं वचन खोटं होता कामा नये."
"अरे, पण असं वचन दिलंस कशाला ?"
"शरण आलेल्याचं रक्षण करणं आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणं हाही क्षात्रधर्म आहे हे मी आपल्याला सांगायला हवं का ? दादा, आपल्याला धर्मराज म्हणतात. आपण अधर्मानं वागणार का ?"
अर्जुनाचा प्रश्‍न योग्य होता. धर्मराजाला त्याचे उत्तर देता आले नाही. अर्जुन आपल्या क्षात्रधर्मापासून मागे जायला तयार नव्हता.
धर्मराजांनी कृष्णाला कळविले, ’अर्जुनाची बाजू योग्य आहे, तेव्हा तूच या घोडीचा नाद सोडून दे.’ पण कृष्णालाही पटेना.
अखेर दोन्ही मित्र - कृष्ण नि अर्जुन समोरासमोर युद्धाला उभे राहिले. दोघेही अतुल पराक्रमी. युद्ध सुरु झाले. कोण कुणाला ऐकणार ? दोन मित्रांचे, गुरु-शिष्यांचे, देव-भक्‍तांचे हे युद्ध पाहण्यासाठी आकाशात देवदेवता, यक्ष, गंधर्व, किन्नरांची गर्दी झाली.
शस्‍त्रांच्या घनघोर युद्धानंतर दोघांनीही अस्त्रांचा वापर करायला सुरुवात केली. दिशा कोंदाटून गेल्या. दोघेही एकमेकांच्या अस्‍त्रांना निष्प्रभ करीत होते. आता नवीन अस्‍त्र दोघांजवळही राहिले नव्हते. अखेरचा उपाय म्हणून अर्जुनाने पाशुपतास्‍त्र हाती घेतले. ते पाहताच कृष्णही संतापला आणि त्याने आपले सुदर्शन चक्र हाती घेतले. त्यांच्या दिव्य प्रभावाने सगळ्या विश्‍वात प्रलयाचे दृश्य दिसू लागले. आता दोघांना जर थांबवले नाही तर विश्‍वाचा नाश अटळ होता. हे पाहून भगवान शंकर कृष्णापुढे उपस्थित झाले. त्यांनी कृष्णाची स्तुती करुन सांगितले,"कृष्णा, तू भक्‍तवत्सल आहेस. आपल्या भक्‍तासाठी तुझी प्रतिज्ञा भंग कर. आता युद्ध पुरे."
कृष्णाने अर्जुनाला जवळ घेतले. प्रेमाने आलिंगन दिले. देवभक्‍तांचेहे मनोमीलन भगवान शंकर आणि देवदेवता पाहत होते. त्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्‍टी केली. अर्जुनाने दण्डीराजाला सन्मानाने परत पाठवले. कृष्ण पांडवांकडे गेला.
घरी आल्यावर कृष्णाला समजले, हे सगळे सुभद्रेमुळे घडले. कृष्णाने सुभद्रेला बोलावले आणि तिच्या न्याय्य भूमिकेबद्दल तिची पाठ थोपटली. सुभद्रेला कृतकृत्यता वाटली. तीही अभिमानाने कृष्णाला म्हणाली,
"कृष्णा, मी तुझीच बहीण आहे. दण्डीराजावर अन्याय होत होता. मला तो दूर करणं भाग होतं."
कृष्ण आणि अर्जुन दोघेही तिच्याकडे आनंदाने आणि अभिमानाने पाहत होते.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP