मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|पौराणिक कथा|संग्रह ३|
लोपामुद्रा

लोपामुद्रा

हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.


सकाळची प्रसन्न वेळ. राजकुमारी लोपामुद्रा राजमहालात आली. महाराणींना वंदन केलं, महाराजांना वंदन केलं, आणि ती परत जाऊ लागली. तिच्या त्या सार्‍या मोहक हालचाली दोघंही कौतुकाने पाहत होते. पाहून सुखावत होते. ती जाताच महाराणी म्हणाल्या, "आपली लोपामुद्रा आता मोठी झाली."
"हं !"
"हं काय ! महामंत्र्यांना बोलावून घ्यावं म्हणते. आजच !"
"ते कशाला ?"
"कमाल आहे बाई तुमची राज्याच्या कामात घरच्या कामाकडे अगदी लक्ष नसतं तुमचं ! महामंत्र्यांना सांगून लोपामुद्रेसाठी एखादा सुरेख राजकुमार शोधायला हवा."
महाराज खळखळून हसत म्हणाले, "खरं आहे. हे माझ्या लक्षातच आलं नव्हत्म हं !" आणि पुन्हा ते विचारात बुडून गेले. त्यांनाही जाणवलं--कन्येसाठी, तिच्या रुपागुणाला साजेसा वर शोधायलाच हवा. मनातल्या मनात ते एकेका देशाचे युवराज आठवू लागले; पण प्रत्येकात काही ना काही उणिवा जाणवू लागल्या. लोपामुद्रेच्या दर्जाचा एकही राजकुमार त्यांच्या नजरेसमोर येईना.
"कसला एवढा विचार चाललाय ?"
"छान, तुम्हीच विचार करायला लावून, परत आम्हालाच विचारताय. कमाल आहे बुवा !"
"म्हणजे ?"
"लोपमुद्रेच्या विवाहाचा विषय आपणच नाही का काढला ?"
"पटलं ना आमचं म्हणणं ? आता आमची काळजी दूर झाली. पण आपल्या मुद्रेला साजेसा वर हवा हं ! नवसासाया्साची एकुलती एक आपली मुलगी. वेळ लागला तरी चालेल; पण रुपागुणांनी संपन्न आणि तिला जपणारा हवा. अगदी फुलासारखं !"
"अहो, अजून वरसंशोधनाला सुरुवातही नाही. तोच--"
"आधीच सांगितलेलं बरं ! नंतर यादी वाचून काय उपयोग ?"
महाराज पुढे काही सांगणार तोच दूत पुढे झाला. प्रणाम करीत सांगू लागला,
"क्षमा असावी महाराज, आपल्या एकांताचा भंग करावा लागला. पण महत्त्वाची वार्ता आहे."
"कोणती ?"
"थोर तपस्वी अगस्त्यमुनी आपल्या भेटीसाठी राजवाडयाकडे येत आहेत."
"शुभ शकुनच म्हणायचा ! लोपामुद्रेच्या विवाहाचा आपण विचार करीत असतानाच, त्यांचं आगमन व्हावं. त्या पुण्यपुरुषाच्या चरणधूलीनं वास्तू पवित्र व्हावी हा योगायोगच नाही का ?" महाराणींची धांदल उडाली. त्या पुन्हा म्हणाल्या, "महाराज, आपण पुढं होऊन त्यांचं स्वागत करावं. आम्ही त्यांच्या पूजनाची, फलाहाराची तयारी करायला लागतो."
विदर्भाच्या राजमहालात एकच धावपळ उडाली. अगस्त्यमुनी आल्याची वार्ता वार्‍यासारखी पसरली. आपल्या हाती सापडेल ते पूजा साहित्य घेऊन जो तो त्यांच्या दर्शनाला येत होता, साष्‍टांग नमस्कार घालीत होता आणि आशीर्वाद घेऊन, कृतकृत्य होत होता; कृतार्थ होऊन परत फिरत होता. ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध अगस्त्यमुनी सर्वांना प्रसन्न अंतःकरणाने आशीर्वाद देत होते. राजवाडयातल्या सर्वांनी दर्शन घेतले. महालातली गर्दी कमी झाली. मुनींची दृष्‍टी शोधक नजरेनं कुणाला तरी शोधत होती. त्यांनी राजाला विचारलं, "राजा, तुझी कन्या कुठं दिसत नाही ?"
"आमची ? मुनिराज, ती आपलीच कन्या आहे. आपल्याच आशीर्वादानं ती आम्हाला लाभली. आपणच तिचे जनक !"
"नाही राजा, मि तिचा जनक कसा असेन ! तिचे जनक आपणच आहात. खूप वर्षांपूर्वी काही एक हेतू मनात धरुन, ’तुम्हाला एक गुणसंपन्न कन्या होईल’ असा आशीर्वाद मी दिला होता."
"सांगावा हेतू. मुनिवर्य, आपली इच्छा म्हणजे आम्हाला आज्ञाच आहे. आम्ही ती लगेच पुरवू."
"वचन देतोस ?"
"विश्‍वास ठेवावा मुनिवरांनी ! आम्ही आमच्या शब्दाला प्राणापलीकडे जपतो. आमचा शब्द हेच वचन !"
"ठीक आहे. नाव काय म्हणालास तुझ्या कन्येचं ?"
"लोपामुद्रा--"
"आता उपवर झाली असेल ना ?"
"होय मुनिवर ! रुपागुणानं अद्वितीय असणार्‍या माझ्या मुलीला अनुरुप वर प्राप्‍त व्हावा अशी इच्छा आहे. तसा आपला आशीर्वाद असावा."
"तथास्तु."
एवढयात महाराणींच्या बरोबर लोपामुद्रा आत आली. एवढे मोठे जितेंद्रिय अगस्तिमुनी- पण तिच्या लावण्याकडे पाहतच राहिले. त्या सौंदर्याने डोळे दिपले त्यांचे. स्वतःला सावरुन प्रसन्नपणानं ते राजाला म्हणाले, "राजा, वरसंशोधनासाठी कुठंही हिंडायची गरज नाही तुला. तुझ्या पुण्याईनं वर घरी चालत येईल !"
"मी स्वतःला धन्य समजेन ! सारी आपली कृपा."
लोपामुद्रा पुढे झाली. अगस्तिमुनींचं नाव तिच्याच संदर्भात तिने खूप वेळा ऐकले होते. मुलाची कामना बाळगून आईवडिलांनी व्रतवैकल्यं केली होती; तप केले होते, ते केवळ अगस्त्यमुनींच्या आशीर्वादानेच फलद्रूप झाले होते. प्रारंभापासूनच तिच्यावर त्यांची कृपा होती, हे तिला माहीत असल्याने त्यांच्याबद्दल तिला नितांत आदर वाटत आला होता; पण प्रत्यक्ष दर्शनमात्र आजच घडत होते. तिने अत्यंत नम्रतेने, आदराने आपले मस्तक त्यांच्या चरणावर ठेवले. अगस्त्य रानावनात भटकणारे ! चालून चालून रुक्ष झालेले आणि थंडीवार्‍याने, मातीने भेगाळलेले त्यांचे पाय. त्या पायांना राजकन्येच्या मुलायम केशकलापांचा स्पर्श झाला, तिच्या कोमल कपाळाचा स्पर्श झाला आणि ऋषी सुखावले. तिच्या रेशमी केशकलाप असणार्‍या माथ्यावरुन हात फिरवीत ते म्हणाले, " राजा, माझ्या कल्पनेत असणार्‍या तुझ्या मुलीच्या प्रतिमेपेक्षाही ही सुंदर आहे."
"होय गुरुदेव ! आपलाच प्रसाद."
"प्रसाद नाही, राजा ! ही आमची ठेव आहे."
"ठेव ?"
"हो, ठेवच ! राजा, ही कन्या आम्ही आमच्यासाठी निर्माण केली. आमच्या तपाची पुण्याई त्यासाठी तुम्हा दोघांच्या पाठीशी उभी केली होती. आज आम्ही तिला न्यायला आलो आहोत."
"पण महाराज--तिचा विवाह--"

"आमच्याशी होईल. आज आम्ही आलोत ते तिला मागणी घालायला."
लोपामुद्रा त्यांच्याकडे आश्‍चर्याने पाहतच राहिली. मनात म्हणाली, ’या मुनींना आज झालंय तरी काय ? संन्याशाला शृंगाराची स्वप्नं पडावीत ? वठलेल्या वृक्षानं वेलीचं साहचर्य अपेक्षावं ? वैराग्याच्या मनी कामकळा निर्माण व्हावी ? छे.. भलतंच काही तरी ! यांना समजावणार तरी कोण ? अन् तसं घडलं नाही तर ? आपल्या सार्‍या स्वप्नांची राखरांगोळी--’ हा विचार मनात येताच ती गोंधळली. कावरीबावरी झाली. तिला काही सुचेनासं झालं.
महाराणींनी अगस्त्यांचे शब्द ऐकले नि सारे विश्‍वच आपल्या भोवती फिरते आहे, असं त्यांना वाटलं. त्यांच्या डोळ्यांपुढे अंधारी आली. आपल्या या नाजुक फुलाला हा असला रुक्ष, ओबडधोबड पती ? हा आपला जावई ? त्यांना ही कल्पनाच सहन होईना. आणि महाराज ! एवढे विवेकी, संयमी, पण या अकस्मात झालेल्या आघातानं बधिर झाले. चिंताक्रांत बनले.
’काय करावं ? या मुनींशी लोपामुद्रेचा विवाह म्हणजे पोटच्या पोरीचा बळी देण्यासारखंच आहे. हा दरिद्री ब्राह्मण-आहे काय याच्याजवळ ? पण नकार तरी कसा देणार ? याने शाप दिला तर ? राजवंश नाहीसा होईल. राज्यलक्ष्मी निघून जाईल. निरपराधी प्रजा भरडली जाईल. काय कराव्म ? बळी द्यायचा तो कोणाचा ? लेकीचा की प्रजेचा ?’
"राजा, विचार कसला करतोस ?"
"हाच, महाराज....माझी कन्या अजाण. तिला आपल्यासारख्या तपस्यांची सेवा कशी जमणार ? आपला संसार सुखी करणं..."
"केवळ लोपामुद्रेच्याच हाती आहे. याची मला कल्पना आहे, म्हणूनच राजा, मी येथे येण्याचे कष्‍ट घेतले."
"पण..."
"आता पुन्हा पण कसला ? आमचे पितर तिकडे झाडावर लोंबकळत राहिले आहेत. खाली डोकं वर पाय करुन. त्यांची त्या नरकातून सुटका करायची म्हणजे माझा विवाह झाला पाहिजे. मला पुत्र व्हायला पाहिजे. या हेतूनं, माझ्या वंशवृद्धीसाठीच मी तुला आशीर्वाद दिला होता. लोपामुद्रेसारख्या रत्‍नाला तुझ्या कुलात उत्पन्न केलं. तीच मला वधू म्हणून योग्य आहे. आज तिचं पाणिग्रहण करण्याच्या हेतूनेच मी इथं आलो आहे."
"तरीही मुनिवर, हा विवाह..."
"राजा, दिलेला शब्द एवढयात विसरलास ? तुझा शब्द म्हणजेच वचन ना ? मग ते पाळायला नको का ? दिलेला शब्द कर्तव्य म्हणून पाळावा लागतो. राजा...."
अगस्त्यांचा आवाज वाढत होता. त्याची तीव्रता जाणवत होती. पुढे काय होणार याची ती नांदीच होती. लोपामुद्रेची आई दुःखाच्या खोल गर्तेत बुडून गेली होती. राजा दिलेल्या शब्दांत गुंतला होता. अगतिक झाला होता. यातून मार्ग काढणं केवळ लोपामुद्रेच्याच हाती होतं. तिने विचार केला, ’आईवडिलांना चिंतामुक्‍त करणं हे मुलीचं कर्तव्य आहे. आज ते माझ्या हाती आहे. माझ्या ऐहिक सुखाचा विचार करण्याची ही वेळ नाही. सुखस्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलण्याचीही ही वेळ नाही. राज्यदेखील आज शापाच्या तडाख्यात सापडेल. या सर्वांसाठी मला पुढे झाले पाहिजे. प्राक्‍तन अटळ असेल तर ते स्वीकारलं पाहिजे. वनवासही सुखाचा केला पाहिजे; नव्हे, तो मी करीन !"
लोपामुद्रेचे डोळे काही एका निश्‍चयाने चमकले. ती बदलली. पूर्ण बदलली, तिचा स्वप्नाळूपणा हरपला, अल्लडपणा संपला. ती गंभीर झाली. धीरानं पुढं झाली अन् सगळा संकोच सोडून म्हणाली,"मुनिवर्य, ही विदर्भकन्या लोपामुद्रा आपल्याशी विवाह करायला आनंदाने तयार आहे."
"पोरी ! काय बोलतेस तू हे ? शुद्धीवर आहेस का ?"
"आई, मी पूर्ण विचार केला आहे, हे असंच घडणार आहे. तात, माझ्या विवाहाची तयारी करायला सांगा."
तिचा तो निश्‍चय आणि चेहर्‍यावरचं ते तेज पाहून सारेच दिङमूढ झाले. तिला विरोध करायला कोणालाही शब्द सुचेनात. एवढंच काय पण सागराचं प्राशन करणारे, आतापी-वातापींचा ग्रास घेणारे आणि विंध्याद्रिलाही नमवणारे अगस्ती, पण त्या निश्‍चयाच्या तेजाने क्षणभर दिपून गेले. सुकुमार राज्यकन्येकडे पाहत राहिले.
अगस्ती आणि लोपामुद्रा यांचा विवाह झाला; पण सार्‍या राजप्रासादावर दुःखाची दाट छाया पसरली होती. कोणीच कोणाशी कारणाशिवाय बोलत नव्हतं. कामं यंत्रासारखी चालली होती. चैतन्यहीन ! सारे सोपस्कार आटोपले. लोपामुद्रा सासरी निघाली. वस्‍त्रालंकारांनी नटून !
अगस्तिऋषींच्या ही गोष्‍ट लक्षात आली. राजमहालाच्या दाराशीच ते थबकले. त्यांनी लोपामुद्रेला जाणीव दिली,
"लोपामुद्रे, तू आता ऋषिपत्‍नी झाली आहेस. ऋषिपत्‍नी ही स्वतःच लक्ष्मीरुप असते. तिला या चंचल लक्ष्मीची आवश्‍यकता नसते. आश्रमाभोवती असणार्‍या निसर्गाच्या सान्निध्यात रमताना, सेवाभावाचं आचरण करताना, तपस्या करताना या लक्ष्मीची अडगळ कशाला ?"
"खरं आहे, नाथ ! माझ्या लक्षातच आलं नाही हे. थांबावं आपण. मी आलेच आत्ता."
असं म्हणून ती माघारी फिरली--आपल्या उमलत्या वयाला न शोभणार्‍या गांभीर्यानं ! ती आपल्या महालात गेली. वस्‍त्रालंकारांनी
नटलेलं, सजलेलं आपलंच रुपडं एकदा डोळे भरुन पाहून घेतलं. आणि एकेक अलंकार उतरवायला सुरुवात केली. डोळ्यांत पाणी तरळलं, पण निश्‍चयानं तिनं ते पुसलं. वल्कलं परिधान केली. बाहेर आली. पतीशेजारी उभी राहिली, आणि नम्रतेनं हलकेच म्हणाली, "चलावं..."
महाराणी, तिच्या सख्या तिच्या या बदलाकडे अवाक होऊन पाहतच राहिल्या. सर्वांचा निरोप घेऊन ती निघाली. अगस्त्यांच्या पाठोपाठ. पतिसेवेचं कठोर व्रत आचरण्यासाठी ! वनातल्या पर्णकुटीकडे तिची पावलं पडत होती; आणि राजवाडयाच्या दारातून सारेजण अश्रूपूर्ण नेत्रांनी लोपामुद्रेच्या पाठमोर्‍या नि दूरदूर जाणार्‍या आकृतीकडे पाहत होते.
लोपामुद्रेने अगस्त्यांच्या आश्रमात प्रवेश केला नि ती पूर्णपणे बदलून गेली. राजकन्येची तपस्विनी झाली. अगस्त्यमुनींची ती छाया होऊन वावरु लागली. त्यांची अहर्निश सेवा करु लागली. सकाळी सूर्योदयापूर्वीच उठावं. पारोशी कामं करावीत. सडासंमार्जन करावं. स्नान करावं आणि पतीच्या आन्हिकाची तयारी करावी. त्यांच्यासाठी सुग्रास भोजन करावं. अतिथी आला असेल तर त्याला तृप्‍त करावं आणि मग उरलेलं अन्न भक्षण करावं. रात्री पतिचरणाची सेवा करावी. त्यांना झोप लागल्यावर पर्णशय्येवर अंग टाकावं. पतीच्या मनी इच्छा निर्माण झाली की, ती ओठावर यायच्या आत पूर्ण करावी. त्यांचं सुख ते आपलं सुख मानावं. त्यांच्या दुःखानं दुःखी व्हावं. तिला स्वतःचं वेगळं अस्तित्व उरलंच नव्हतं. नदी सागराशी एकरुप झाली होती. तिनं आपली ’मुद्रा’ अगस्तींच्या जीवनात ’लोप’ पावून टाकली होती.
आणि एके दिवशी या तपस्येने अगस्त्यमुनी पत्‍नीच्या सेवेवर प्रसन्न झाले. तिच्या सौंदर्याइतकेच तिचे गुणही मोहक होते. तिच्या पवित्र आचरणाने आणि तपाच्या सात्त्विक तेजाने तेही भारावून गेले. भारावलेल्या स्निग्ध स्वरात म्हणाले,
"लोपामुद्रे, तुझ्या सेवेनं मी संतुष्‍ट झालो आहे. तुझ्यावर मी प्रसन्न आहे. मला हवी होती तशीच तू आहेस. सांग, तुझी कोणती इच्छा मी पूर्ण करु ?"
कौतुक ऐकून तिच्या चेहर्‍यावर मंद स्मित झळकलं. जीवन कृतार्थ झाल्यासारखं वाटलं. तपाची सांगता झाल्यासारखं वाटलं. सुखावलेल्या मनानं ती म्हणाली,
"नाथ, आपल्या सहवासात मी तृप्‍त आहे."
"खरचं, तू तृप्‍त आहेस ? कशाचीच उणीव राहिली नाही ?" आणि मग ती लाजली. काय बोलावं हेच तिला कळेना. तिचे ओठ बोलण्यासाठी विलग झाले पण पोटातलं ओठावर येईना. तिचं मुखकमल खाली झुकलं. अगस्त्यमुनींनी ते सारं ओळखलं आणि तिला जवळ बसवून भावार्द्र स्वरात म्हणाले,"समजलं. सारं समजलं. स्‍त्रीत्वाच्या सार्थकतेची तुला ओढ लागणं स्वाभाविक आहे; पण आता तो क्षण फार दूर नाही. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. माझ्या पुत्राची मता व्हायला तूच एक योग्य स्‍त्री आहेस. तेवढी तुझी तपस्या झाली आहे. सांग, तुला अनेक पुत्र हवेत, की बुद्धिमान, गुणसंपन्न असा एकच पुत्र हवा ?"
"नाथ, गुणसंपन्न, कीर्तिमान आणि कुळाचं नाव काढील असा एकच पुत्र मला आवडेल. "
"तथास्तु. जशी तुझी इच्छा. तसेच घडेल."
"पण...पण."
अगस्त्यमुनी तिच्याकडे पाहू लागले. आजपर्यंत त्यांनी असा ’पण’ कधीच ऐकला नव्हता. त्यामुळे त्यांना आश्‍चर्य तर वाटलंच, पण त्या लाजर्‍या मुखातून, लाडिकपणे आलेल्या त्या शब्दांचं कौतुकही वाटलं. ते शब्द मोहमयी वाटले. त्यांनी विचारलं,
"पण काय ? सांग ना ?"
"नाथ, मला वाटतं, मनापासून वाटतं..."
"हं.."
"आपण देणार आहात ते स्वीकारायला राजवैभवच हवं !"
"वा ऽऽ कल्पना चांगली आहे; पण ते आणू कोठून ?"
"ते काय आपल्याला मी सांगायला हवं थोडंच ? म्हटलं तर ऋद्धिसिद्धी आपल्या भोवती फेर धरुन नाचतील, एवढी शक्‍ती आपल्या तपात आहे. नाथ, आपलं सामर्थ्य काय मला माहीत नाही ? एवढा मोठा महासागर पण आपलं नाव काढलं की, थरकाप उडतो त्याचा तसाच तो विंध्याद्री ! आकाशाशी स्पर्धा करणारं त्याचं मस्तक, पण तोही आपल्यापुढे नतमस्तक झाला. आपल्या तपःसामर्थ्यानं आपण देवादिकांनाही नमवलं. आपला स्वभाव प्रेमळ, मन विशाल, परोपकारी ! पशुहिंसा न करताही आपण इंद्राला पाऊस पाडायला भाग पाडलंत. अशा शक्‍तिमान माणसाला लक्ष्मीचा वरदहस्त मिळणं अवघड आहे ? आपण नुसतं मनात आणायचा अवकाश, की..."
"कुबेराची संपत्ती तुझ्या पायाशी लोळण घेईल; पण लोपामुद्रे, या नश्‍वर वैभवाचा आमच्या मनाला मोह पडत नाही. या क्षणभंगुर ऐहिक सुखाच्या मागे लागून शाश्‍वत सुखाला पारखं व्हायचं का ? त्यातून आपण तपस्वी वनवासी !"
"हे सगळं खरं आहे. पण आपण आता गृहस्थाश्रम स्वीकारणार तर त्यासाठी लक्ष्मी हवीच. आतिथ्य करायच्म म्हटलं की धनाचं पाठबळ नको का ? दातृत्वाला द्रव्याच्म सहाय्य नको का ? अन् असं पहा, आमची ही इच्छा आहे. आपल्याशिवाय ती कोण पुरी करणार ? आम्ही हा हट्ट आपल्यापाशी नाही तर कोणाजवळ करणार ? ते काही नाही, आपण माझा हा हट्ट पुरवाच !"
"तुझं म्हणणं खरं आहे. पण माझं मंत्र-सामर्थ्य अशा कारणासाठी उपयोगात आणावं, असं मला वाटत नाही. आणि तुझा हट्‍टही योग्य आहे. बरं राजहट्ट, स्‍त्रीहट्ट आणि बालहट्ट यापुढे काही मात्रा चालत नाही. ठीक आहे. तुझी इच्छा पूर्ण होईल."
असं म्हणून अगस्त्यमुनी धनप्राप्‍तीसाठी बाहेर पडले. त्यांना इल्वल राजाची आठवण झाली. ते त्याच्याकडे गेले. राजाने त्यांचा मोठया प्रेमाने आदरसत्कार केला..येण्याचे कारण विचारले. ते म्हणाले,
"राजा, मला धनाची जरुरी आहे. तुझ्याकडे कोणालाही त्रास न देता धन जमा झालं असेल, तर अशा निर्दोष धनापैकी काही धन तू मला दे."
राजाने प्रसन्न मनाने विपुल धन दिले. वैभव घरी आले. लोपामुद्रेची कामना पूर्ण झाली. तिच्या मुखावर तृप्‍तीचा आनंद विलसू लागला. तपश्‍चर्येने कृश झालेली तिची काया रोमारोमातून फुलली. बहरली. मातृत्वाच्या चाहुलीने ती हरवून गेली.
आता त्यांचा गृहस्थाश्रम खर्‍या अर्थाने सुरु झाला. एका नव्या जाणिवेनं आणि नव्या उमेदीनं लोपामुद्रा कामाला लागली. सारी कामं तर नित्याप्रमाणे होत होतीच पण आला अतिथीही तृप्‍त मनाने जात असे. हसत मुखानं त्याचं झालेलं स्वागत, यथोचित ठेवलेला मान याने तो लोपामुद्रेला तोंड भरुन आशीर्वाद देऊन जाई. अशा तर्‍हेने लोपामुद्रा अगस्त्यमुनींची सहधर्मचारिणी झाली. आपल्या सेवावृत्तीनं, सुशील सदाचरणसंपन्न आचरणानं, विनयानं, क्षमेनं, आणि प्रेमळपणानं ती खरीखुरी ’गृहलक्ष्मी’ शोभू लागली. तिच्या या विविध रुपांतर अगस्त्यमुनीही प्रसन्न होते. तृप्‍त होते.
दिवस उलटत होते. महिने सरत होते. आणि एके दिवशी लोपामुद्रेने एका सुरेख बाळाला जन्म दिला. योग्य मुहूर्तावर त्याचं नाव ठेवलं दृढास्यू ! आणि आता मात्र त्या आश्रमात स्वर्गीय आनंदच दरवळू लागला. दृढास्यूवर वात्सल्याचा अभिषेक करीत असताना तिला आपलं जीवन कृतार्थ झाल्याचं जाणवलं.
या स्वर्गीय आनंदाचा आस्वाद घेण्यासाठी देवही धरतीवर येऊ लागले. आश्रमातलं आदरातिथ्य स्वीकारावं, प्रेमळ पाहुणचार घ्यावा, एक-दोन दिवस या धर्मशील प्रेमळ दांपत्याच्या सहवासात राहून पुन्हा स्वस्थानी जावं. असं नेहमी घडू लागलं. या सौख्याविना त्या दांपत्यालाही आणखी काही नको होतं.
अगस्त्य-लोपामुद्रेच्या आतिथ्याचे कौतुक ऐकून एकदा देवगुरु बृहस्पती आश्रमात आले. त्या दांपत्याच्या आपुलकीनं, प्रेमानं ते इतके भारावून गेले की त्यांना राहवेना. ते तृप्‍त अन् भारावलेल्या मनानं म्हणाले, "मुनिवर्य, आज आम्ही आपल्या पाहुणचारानं धन्य झालोत. आपली धर्मपत्‍नी लोपामुद्रा महान पतिव्रता आहे. तिच्या कीर्तीचा सुगंध भूलोकी तर दरवळला आहेच, पण स्वर्गलोकीही पसरला आहे. अरुंधती, सावित्री, अनसूया, शाण्डिली, लक्ष्मी, शतरुपा, स्वाहा या देवता नि पतिव्रता सुद्धा श्रेष्‍ठ पतिव्रता म्हणून तिचा गौरव करतात. आपल्या आश्रमाचं हे वैभव अनुभवावं म्हणूण आम्ही मुद्दाम आलो होतो. हे पाहून मन प्रसन्न झालं आहे. मुनिराज, लोपामुद्रा आपल्या आश्रमाचं वैभव आहे. पतिव्रतेचं तेज सूर्यापेक्षाही तेजस्वी असतं. ज्या घरी पतिव्रता नांदते ते कुल पवित्र होय. तिचे मातापिता धन्य होत. गंगास्नानानं जे पावित्र्य लाभते, जे पुण्य लाभते ते पतिव्रतेच्या शुभदृष्‍टीने मिळते." ते लोपामुद्रेकडे वळून पुढे म्हणाले,"महासती लोपामुद्रे ! आज आपल्या दर्शनाने आम्ही पावन झालोत. संतुष्‍ट स्‍त्री हीच गृहाची लक्ष्मी हे पटलं. तू खरोखरच धन्य आहेस. तुझं जीवन सफल झालं आहे. आम्ही आपल्याला वंदन करतो."
"गुरुदेव, हे काय ? मी आपल्याला वंदन करायचं. आपण नाही !" लोपामुद्रा संकोचून मागे सरत म्हणाली.
ते ऐकून शेजारी असणारे अगस्त्यमुनी म्हणाले,"लोपामुद्रे, देवगुरुंनी केलं तेच योग्य आहे. तुझी योग्यता फार मोठी आहे. दे, त्यांना आशीर्वाद दे !"
पतिमुखातल्या त्या अमृतबोलांनी ती सुखावली. जीवनसाफल्याच्या चांदण्यात न्हाऊन निघाली; आणि नकळत तिचे हात आशीर्वाद देण्यासाठी वर उचलले गेले.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP