एकदा काही कारणाने पार्वती सर्व देवांवर रागावली व तुम्ही सर्व जण वनस्पतिरूप घ्याल असा तिने शाप दिला. "यामुळे सृष्टीच्या घटनेत घोटाळा होईल, तरी आम्हाला उःशाप द्यावा,' अशी देवांनी विनंती केल्यावर पार्वती म्हणाली, "तुम्ही निदान अंशरूपाने तरी वृक्षांत राहावे." पार्वतीच्या आज्ञेप्रमाणे वटवृक्षाच्या ठिकाणी शंकरांनी, पिंपळाच्या वृक्षात विष्णूंनी, पळसात ब्रह्मदेवांनी, आंब्याचे वृक्षात इंद्राने तर निंबाच्या वृक्षात लक्ष्मीने वास केला. याप्रमाणे वैशंपायन कथा सांगत असता जमनेजयाने विचारले, "पिंपळात जर विष्णूचा वास आहे तर पिंपळाला अपवित्र का मानतात?" यावर वैशंपायन म्हणाले, "समुद्रमंथनातून चौदा रत्ने निघाली, त्यात एक लक्ष्मी होती. सर्वानुमते ती विष्णूला अर्पण करावी असे ठरले. पण लक्ष्मी म्हणाली, माझी मोठी बहीण अवदशा हिचे लग्न झाल्यावर मी लग्न करीन. अवदेशेचे भयंकर रूप तसेच कलहप्रिय स्वभाव यामुळे तिच्याशी लग्न करण्यास कोणी तयार नव्हते. तेव्हा विष्णू उद्दालकऋषींकडे गेले. त्यांच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन त्यांनी अवदशेचे त्यांच्याशी लग्न लावून दिले. उद्दालक अवदशेला घेऊन आपल्या आश्रमाकडे आले. पण तेथील सर्व वातावरण अवदशेस आवडेना. जिथे लोकांची पापमार्गाकडे प्रवृत्ती असते, लोक कृतघ्न व कपटी असतात, जिथे धर्माचार, होमहवन नाही, तिथे राहणे तिला आवडत असे. तसे तिने आपल्या पतीस सांगितले. उद्दालक अत्यंत सात्त्विक व शांत होता. त्याने विचार करून अवदशेला एका पिंपळाच्या झाडाजवळ बसवले व आपण आश्रमात पळून गेला.
इकडे बराच वेळ झाला तरी उद्दालक येत नाही हे जाणून अवदशा भयंकर आवाजात रडू लागली. ते रडणे लक्ष्मीच्या कानावर गेले, तेव्हा ती विष्णूला घेऊन तेथे पोचली. अवदशा विष्णूला, "मला तुमच्याजवळ राहायचे आहे' असे म्हणू लागली. तिची दया येऊन विष्णू म्हणाले, "माझा वास या पिंपळात असतो, तू तेथे राहा." त्याप्रमाणे तिने पिंपळात वास केला. देवांना खूप काळजी वाटू लागली. ते अवदशेकडे जाऊन म्हणाले, "तू तेथे राहा, पण भगवंतांना सोड. दर शनिवारी ते तुझ्यापाशी रहातील." अवदशेने ते ऐकले. तेव्हापासून पिंपळाच्या वृक्षात अवदशेला वास आहे म्हणून त्यास अपवित्र मानतात. शनिवारी त्यात विष्णूचा वास असतो म्हणून त्या दिवशी त्याची पूजाअर्चा करतात."