श्रीरामांनी वसिष्ठांना विचारले, "प्रपंच मिथ्या असूनही सत्य कसा भासतो?" यावर वसिष्ठ उत्तरले, "जीव भ्रमांच्या परंपरेत पडतो, त्यामुळे असे होते." उदाहरण म्हणून त्यांनी पुढील आख्यान ऐकवले- समाधी अभ्यासलेला एक भिक्षू असाच चिंतन करीत असता त्याच्या मनात सामान्य जनांप्रमाणे जगावे असे आले. लगेचच तो तसा झाला. त्याने 'जीवट' असे नाव घेतले. असाच एकदा तो स्वप्नात रममाण झाला होता. त्या स्वप्नातील नगरीत मद्यपान करून तो निजला असता त्याला स्वप्न पडले. त्यात तो वेदसंपन्न, प्रतिभावान ब्राह्मण झाला. दमून तो ब्राह्मण एकदा झोपला असता त्याच्या स्वप्नात तो एक मंडलीक राजा झाला. तो राजाही गाढ झोपला असता स्वप्नात तो एक चक्रवर्ती सम्राट झाला. याप्रमाणे स्वप्नांचा क्रम चालू राहून तो पुढे स्वप्नातच अप्सरा, हरिणी, वेल, भ्रमर व पुढे हत्ती झाला. तो हत्तींना धरण्यासाठी बनवलेल्या खड्ड्यात पडला असता सैनिकांनी त्याला साखळीने बांधून राजाकडे नेले. एकदा युद्धात तो हत्ती मारला गेला. मृत्युसमयीच्या भ्रमविषयक विचारांमुळे तो पुन्हा भ्रमर होऊन हत्तीच्या पायाखाली चुरडला गेला. अनेक योनींतून जाऊन तो ब्रह्मदेवाचा हंस झाला. ब्रह्मलोकी ब्रह्मदेवाने केलेल्या विवेक, वैराग्य यांच्या उपदेशांनी तो ज्ञानी होऊन लौकिक जग असार आहे असे त्याला वाटू लागले.
एकदा तो हंस ब्रह्मदेवाबरोबर रुद्रपुरास गेला असता अनायासे त्याला रुद्रदर्शन झाले. रुद्राचे ज्ञान पाहून हंसाला ’मी रुद्रच आहे' अशी भावना झाली. रुद्ररूपी होऊन त्याने हंस शरीराचा त्याग केला. आपली बुद्धी व ज्ञानाच्या साह्याने तो रुद्र आपला मागील सर्व वृत्तांत पाहू लागला. आपल्या शेकडो स्वप्नांनी स्तिमित झालेला तो भिक्षू स्वतःशीच म्हणू लागला, खरोखर विश्वाला मोह पाडणारी ही सर्व माया पसरलेली आहे. ती असत्यच आहे. पण मृगजळाप्रमाणे ती सत्य भासते. परंतु जन्ममरण परंपरेने आपला शेवटी रुद्राशी संगम होताच आपले शास्त्राचे अध्ययन तत्त्वज्ञानाने फलित झाले. म्हणजेच शास्त्रीय साधनाभ्यास श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे या भिक्षूला आपल्या स्वरूपाचे ज्ञान झाले व त्याला आपला भ्रम कळला. रुद्र, भिक्षू, जीवट हे शरीरांनी जरी त्रिरूप होते, तरी आतून एकरूप झाले. त्या भिक्षूच्या सर्व स्वप्नशरीरांनी रुद्राशी एकरूप होऊन रुद्राशी एकरूप होऊन परस्परांचे पूर्वोत्तर संसार पाहिले व कृतकृत्य होऊन ते सुखी झाले.