मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|पौराणिक कथा|संग्रह ३|
स्यमंतक मण्याची कथा १

स्यमंतक मण्याची कथा १

हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.


द्वारकेत सत्राजित नावाचा धर्मशील यादव रहात होता. त्याने प्रखर सूर्योपासना करून सूर्याला प्रसन्न करून घेतले. सूर्याने सत्राजिताला स्यमंतक नावाचा अत्यंत तेजस्वी मणी दिला. या मण्यापासून दररोज सुवर्ण प्राप्त होत असे. त्याच्या बळावर सत्राजित बराच दानधर्म करून दानशूर म्हणून प्रसिद्ध पावला. कृष्णाच्या कानावर त्याची कीर्ती व स्यमंतक मण्याची गोष्ट गेल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताला तो मणी राजा उग्रसेनाला देण्यास सांगितले. राजाकडे तो मणी सांभाळण्याची ताकद असून, तोच त्यापासून मिळालेल्या संपत्तीचा योग्य तो विनियोग करील असे कृष्णाचे म्हणणे होते; पण सत्राजिताने ते ऐकले नाही.
एकदा सत्राजिताचा भाऊ प्रसेन गळ्यात स्यमंतक मणी बांधून शिकारीला गेला असता एका सिंहाने त्याला ठार मारले व तो मणी घेऊन जाऊ लागला. वाटेत त्याला जांबवंत हा श्रीरामाचा भक्त भेटला. त्याने तो मणी सिंहाकडून काढून घेतला व आपली मुलगी जांबवंती हिच्या पाळण्याला बांधून ठेवला. इकडे द्वारकेत प्रसेन आला नाही म्हणून सत्राजिताने त्याचा शोध घेतला असता अरण्यात त्याचे व त्याच्या घोड्याचे प्रेत मिळाले; पण तो मणी तिथे नव्हता. श्रीकृष्णानेच तो मणी घेतला असणार असे सत्राजित म्हणू लागला. प्रसेनाचा वध व मण्याची चोरी श्रीकृष्णानेच केली असे आपल्यावरील आरोप ऐकून कृष्णाने हा लोकापवाद दूर करण्याचे ठरवले. त्याने जंगलात बारकाईने पाहिले असता, त्याला मेलेला सिंह व अस्वलाची पावले दिसली. माग काढत श्रीकृष्ण जांबवंताच्या विवरात पोचला असता तेथे पाळण्यावर लावलेला मणी दिसला. तो हळूच मणी घेत असता जांबवंत त्याच्यावर चालून आला. कृष्णाचा पराक्रम पाहून हा श्रीरामचंद्रच असावा असे जांबवंताला वाटले. श्रीकृष्ण हे श्री रामाचेच अवतार आहेत, ही ओळख पटताच जांबवंत श्रीकृष्णाला शरण गेला व जांबवंतीचा तू स्वीकार कर, असे विनवू लागला.
श्रीकृष्णाने आनंदाने जांबवंतीशी गांधर्व विवाह केला. जांबवंताने स्यमंतक मणी लग्नात आंदण म्हणून दिला. श्रीकृष्ण जांबवंती व मण्यासह द्वारकेस गेला. तेथे आल्यावर श्रीकृष्णाने सत्राजितास बोलावून घेतले व उग्रसेनाच्या सभेत सर्वांसमक्ष स्यमंतक मणी त्याला देऊन सर्व हकिगत सांगितली. झालेल्या चुकीबद्दल सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागितली.

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP