महिकावती नावाच्या नगरीत कृतवीर्य नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचे नाव रंकावती असे होते. मधू नावाच्या शापित राक्षसाने तिच्या पोटी सहस्रार्जुन नावाने जन्म घेतला. या मधू राक्षसाने शंकराला पूजेच्या वेळी त्रास दिला होता. तसेच पार्वतीच्या एक हजार पूजा त्याने मोडल्या होत्या. म्हणून शंकरांनी त्याला, तू पुढील जन्मी हातावाचून जन्म घेशील व दुःख भोगशील असा शाप दिला होता. त्यामुळे सहस्रार्जुन जन्मला तेव्हा त्याला हात नव्हते. मग त्याने दत्तात्रेयाची प्रखर उपासना करून त्यांना प्रसन्न करून घेतले व 'मला सर्व शरीरावर हात दे' असा वर मागितला. तेव्हा दत्तात्रेयांनी त्याला 'सहस्र हात तुला उत्पन्न होतील' असा वर दिला. नंतर सहस्रार्जुनाने शंकरांची तपश्चर्या करून त्यांच्याकडून अमृत मिळवले व तो महिकावतीस राज्य करू लागला.
एकदा लंकाधिपती रावण दिग्विजय मिळवून परत जात असता पूजेची वेळ झाली म्हणून वाटेत नर्मदाकाठी थांबला. स्नान करून तो तेथे शिवपूजा करीत होता, त्याच वेळी सहस्रार्जुन नर्मदेच्या पाण्यात उतरून जलक्रीडा करू लागला. त्याने आपल्या सहस्र भुजा पसरून पाण्याला बंधारा घातला. त्यामुळे नर्मदेचे पाणी वरच्या बाजूला वाढू लागले. ते आजूबाजूला पसरून त्यामुळे रावणाने स्थापन केलेले शिवलिंग, पूजा वगैरे सर्व वाहून गेले. रावणाच्या प्रधानाने हे सर्व कुणी नेले ते रावणास सांगितले. यावर संतापून जाऊन रावण सहस्त्रार्जुनावर चालून गेला. पण सहस्रार्जुनाने रावण सैन्याचा नाश करून रावणाला धरले व बंदीशाळेत ठेवले. ही बातमी प्रधानाने लंकेस जाऊन रावणाचा बाप विश्रवा व आजोबा पौलस्ती यांना दिली. त्या दोघांनी ब्रह्मदेवाला रावणाच्या सुटकेविषयी विनंती केली. मग ब्रह्मदेव त्या दोघांना घेऊन महिकावतीस सहस्त्रार्जुनाकडे आला व त्याने रावणाला सोडून देण्याविषयी सांगितले. सहस्रार्जुन म्हणाला, "हे ब्रह्मदेवा, तू स्वतः माझ्या घरी याचक म्हणून आलास, हीच रावणाला मोठी शिक्षा झाली," असे म्हणून त्याने रावणाला सोडले. पुढे सहस्रार्जुनाने जमदग्नींच्या आश्रमातील कामधेनू जबरदस्तीने पळवली, तेव्हा रेणुकेच्या आज्ञेने परशुरामाने सहस्रार्जुनाचा नाश केला.