निषादराजाने आपल्या सर्व सेवकांना खुणेने असे सांगितले, की अयोध्येहून आलेल्या पाहुण्यांची आपापल्या घरी राहण्याची व्यवस्था करा. त्याप्रमाणे सर्वांची नीट व्यवस्था लावून निषादराज सर्व मातांना भेटला आणि आपला परिचय करून दिला. शत्रुघ्ननेही त्याचे राम आणि भरतावरील प्रेम पाहून त्याला आलिंगन दिले. नंतर भरताने सर्वांची राहण्याची नीट सोय झाली आहे हे पाहिल्यावर निषादराजास जेथे राम आणि सीता यांनी रात्री मुक्काम केला होता ती जागा दाखविण्यास सांगितले. निषादराजा भरताला तेथे घेऊन गेला. त्याने श्रीराम आणि सीता यांनी ज्या दर्भाच्या शय्येवर रात्री विश्रांती घेतली ती जागा भरतास दाखविली. ती पाहून भरताला अतिशय दुःख झाले. राजवैभवात लोळणार्या राम आणि सीता यांना अशा अंगाला बोचणार्या बिछान्यावर झोपावे लागले. याचा दोष भरताने स्वतःकडे घेतला. त्याने त्या जागेला भक्तिभावाने वंदन केले आणि प्रदक्षणाही घातली. राम आणि सीता यांच्याबरोबरच त्याला लक्ष्मणाचीही आठवण झाली. लक्ष्मण अजून लहान आहे, तरी श्रीरामांसाठी तो अपार कष्ट सोसतो आहे याचे कौतुक करीत भरत म्हणाला, की लक्ष्मणासारखा आदर्श भाऊ पूर्वी कधी झाला नाही, आजच्या घडीलाही त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही आणि पुढेही असा भाऊ होणार नाही.
भरताच्या दृष्टीने सेवकाचा धर्म हा अत्यंत कठोर असतो आणि त्याचे पालन करणाराच खरा भक्त (सेवक) मानला जातो. येथे संस्कृतातील सेवाधर्मो परम गहनो योगी नामपि नानुगम्यः या वचनाची आठवण होते. भरतासह सर्वांनी प्रयाग नगरीत प्रवेश केला. भरताने त्रिवेणी संगमात स्नान करून तीर्थराज प्रयागाला प्रार्थना करताना जे उद्गार काढले, त्याचे वर्णन वरील दोह्यात आले आहे. भरताने तीर्थराज प्रयागाची भक्तिभावे प्रार्थना करून म्हटले, "मला धर्म, अर्थ, काम किंवा मोक्ष यांपैकी कोणताही पुरुषार्थ प्राप्त करण्याची तिळमात्र इच्छा नाही. (त्रिवेणी संगमात स्नान केल्यावर मोक्ष मिळतो असे धर्मवचन आहे. तथापि भरताला तोसुद्धा नको आहे.) सद्गती (गति) किंवा मोक्ष प्राप्त व्हावा अशीही इच्छा माझ्या मनात नाही. माझे एकच मागणे आहे आणि ते म्हणजे जन्मोजन्मी रामांच्या चरणांवर (राम पद) माझे अनन्य प्रेम (रति) राहो. हे प्रयागराज, मला तू हेच वरदान दे. माझे दुसरे काहीही मागणे नाही. तुलसीदासांनी येथे आदर्श भक्ताचे अंतिम ध्येय काय असावे, हे भरताच्या मुखातून सांगितले आहे आणि भरत हा आदर्शभक्त होता, हे सूचित केले आहे.