राजा अंबरीषाने चिरंजीव मुनी मार्कंडेय यांना विचारले, "सर्व देवांत श्रेष्ठ अशा भगवंताला संतुष्ट कसे करावे?" यावर मार्कंडेयांनी भगवान श्रीकृष्णाचे स्मरण केले. नंतर ते म्हणाले, "भगवंताचे स्मरण करणे, पूजन करणे, त्यांना प्रणाम करणे या प्रत्येकाचं फळ अश्वमेध यज्ञाइतकंच महान आहे. ज्या भगवंतापासून ब्रह्मदेव होतात, त्या ब्रह्मदेवांपासून विश्वाची निर्मिती होते," हे पटवून देण्यासाठी मार्कंडेयाने कौशिकाची कथा सांगितली, ती अशी-
त्रेतायुगात कौशिक नावाचा एक श्रीकृष्णभक्त होता. तो नेहमी भगवंताचे गुणगायन करी व भिक्षा मागून चरितार्थ चालवीत असे. पद्माख्य नावाच्या भक्ताने कौशिकाचे गायन ऐकले. त्याने कौशिकाला व त्याच्या शिष्यांना अन्नदान केले. त्याच ठिकाणी मालव व मालवी नावाचे पतिपत्नी भगवंतांची सेवा करीत असत. महात्मा कौशिकांना ते स्थान आवडले व आपल्या शिष्यांसह ते तेथेच रमले. कौशिकाचे गाणे ऐकण्यासाठी कलिंगराजा तेथे आला व कौशिकाला म्हणू लागला, "आपण माझे गुणगान सर्वांना ऐकवावे." पण कौशिकांनी व सर्व श्रोत्यांनीही आपण फक्त श्रीहरींचे गुणगायन करू व ऐकू असे राजाला अत्यंत नम्रपणाने सांगितले. हे ऐकून राजा रागावला. त्याच्या आज्ञेवरून त्याचे सेवक त्याची कीर्ती गाऊ लागले. शिष्यांनी लाकडी खुंट्या घालून आपले कान बंद करून घेतले. कौशिक वगैरेंनी आपल्या जिभेचे टोक कापून टाकले, जेणेकरून राजा जबरदस्तीने त्याचे गुणगान करवून घेणार नाही. राजाने सर्वांना हद्दपार केले. ते सर्व जण उत्तर दिशेकडे निघाले. देहत्यागानंतर ते यमलोकी पोचले. यमलोकातून ब्रह्मलोकात व तेथून ते सर्व जण विष्णुलोकात पोचले. सर्वत्र त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली. भगवान विष्णू त्या वेळी श्वेतदीपनिवासी लोकांनी केलेल्या सेवेत मग्न होते. ब्रह्मदेवांनी कौशिकादींसह त्यांचे स्तवन केले. भगवान विष्णूंनी सर्व शिष्यांना आपल्याजवळ स्थान दिले. मालव व मालवी यांना दिव्यरूप धारण करून इथेच गायनात मग्न राहावे असे वरदान दिले. पद्माख्याला त्यांनी सर्व धनांचा स्वामी बनवले. कारण त्याने कौशिकास अन्नदान केले होते. कौशिकाच्या गाण्याने आपली योगनिद्रा संपली असून कौशिकाला विष्णुलोक प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले. अशा प्रकारे भगवान श्रीहरी संतुष्ट झाले व सर्वांना पूज्य झाले.