लंकेचा राजा रावण याला भेटण्यासाठी एकदा नारद गेले होते. तेव्हा मोठ्या गर्वाने रावणाने आपल्या सामर्थ्याचे वर्णन केले; परंतु नारदांनी त्याला सूर्यवंशातील दशरथ- कौसल्या यांचा पुत्र श्रीरामचंद्र यांच्या हातून तुझा मृत्यू आहे असे सांगून सावध केले. या भविष्याची सत्यता पडताळण्यासाठी रावण ब्रह्मदेवांना भेटला. त्यांनी हे खरे असल्याचे सांगून आजपासून तिसर्या दिवशी दशरथ कौसल्येचा विवाह कोसल देशाच्या राजधानीत होणार असल्याचे सांगितले. हा विवाह होऊच नये म्हणून रावणाने सैन्य पाठवून कौसल्येला पळवून आणले; पण स्त्री हत्येचे पातक नको म्हणून एका पेटीत तिला बंद करून समुद्रात सोडले. त्या पेटीवरून दोन माशांत भांडण सुरू झाले व युद्धात जो जिंकेल तो पेटीचा मालक होईल असे ठरले. त्यांनी ती पेटी एका बेटावर नेऊन ठेवली. इकडे अजपुत्र दशरथ कोसल देशाला जाण्यासाठी आप्तेष्ट व सैन्य यांच्यासह जहाजातून समुद्रमार्गे निघाला. रावणाला हे कळताच आकाशातून शस्त्रवृष्टी करून त्याने जहाजे फोडून पाण्यात बुडवली. एका फळीच्या आधारे दशरथ पोहत एका बेटावर पोचला. तेथे त्याने ती पेटी पाहिली. ती उघडताच आत कौसल्या दिसली. दोघांनी एकमेकांना सर्व हकिकत सांगितली. विवाहाच्या ठरलेल्या दिवशीच दोघांची योगायोगाने गाठ पडली. अत्यंत आनंदाने पंचमहाभूतांच्या साक्षीने दोघांनी विवाह केला. दिवसा त्या बेटावर फिरावे व रात्री पेटीत राहावे, असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. एके रात्री युद्धात जिंकलेला तो मासा पेटीपाशी आला व त्याने ती पेटी दाढेत धरून लंकेच्या किनार्यावर आणली.
ब्रह्मदेवाची वाणी असत्य झाली हे त्याला कळवावे म्हणून मोठ्या प्रौढीने तो ब्रह्मदेवाकडे गेला, तर दशरथ कौसल्येचा विवाह झाल्याचे त्याला कळले. तसेच त्यांचा ठावठिकाणाही त्याला कळला. रावणाने परत जाऊन ती पेटी आणवली व त्या दोघांस मारून टाकण्यासाठी तलवार उपसली. दशरथही क्षात्रधर्माला जागून युद्धास तयार झाला; पण रावणाची पत्नी साध्वी मंदोदरी हिने परोपरीने रावणाची समजून घालून अनर्थ टाळला. आपल्या अविचाराने राम आताच अवतार घेईल या भीतीने रावणाने हात आवरला व दशरथ कौसल्या यांना विमानाने अयोध्येस पाठवले. दोघे सुखरूप परत आलेले पाहून सगळ्यांना आनंद झाला.