मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|पौराणिक कथा|संग्रह ३|
गार्गी

गार्गी

हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.


राजा जनकाचा यज्ञ संपला. राजाने विपुल दान-धर्म केला. आलेले अतिथी-अभ्यागत तृप्‍त झाले. सगळेजण राजाची मुक्‍त कंठाने स्तुती करु लागले. राजा जसा दानशूर, धार्मिक होता तसाच गुणग्राहकही होता. धर्मचर्चा, परमार्थ चर्चा याची त्याला विशेष आवड होती. या यज्ञाच्या निमित्ताने कुरु आणि पाञ्चाल देशाचे अनेक विद्वान ऋषी-महर्षी त्याच्या नगरात आले होते. त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली की, या निमित्ताने विद्वज्जनात शास्‍त्रचर्चा, धर्मचर्चा घडवून आणावी. त्याने त्या सर्वांना निमंत्रित केले. मोठा दरबार भरविला. सर्वजण आल्याची खात्री झाल्यावर त्यांना उद्देशून जनक म्हणाला, "विद्वज्जनहो, आपण सगळे उपस्थित झाल्याबद्दल आम्हाला आनंद होत असून, या सभेत आता धर्मचर्चा चांगलीच रंगेल याबद्दल आम्हाला संदेह नाही. आम्ही आमच्या गोशाळेत एक हजार गाई बांधलेल्या असून, प्रत्येक गाईच्या शिंगांना दहा-दहा सुवर्णमुद्रा बांधलेल्या आहेत. आपल्यापैकी जो सर्वांत श्रेष्‍ठ ब्रह्मवेत्ता असेल, त्याने त्या गाई घेऊन जाव्यात. नंतर होणार्‍या वादात त्याने सर्वांना जिंकले पाहिजे, हे मात्र त्याने विसरु नये."
जनकराजाने घोषणा करुन तो आपल्या सिंहासनावर बसला. ते ऐकल्यावर सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. काहींची दृष्‍टी भूमीला खिळली. राजाच्या गोशाळेत जाऊन गाई घेऊन जाण्याचे धाडस कोणीही दाखविले नाही. प्रत्येकालाच आपल्या ज्ञानाबद्दल साशंकता निर्माण झाली होती. जो तो मनात विचार करु लागला,"राजाने बक्षीस म्हणून ठेवलेल्या गाई आपण नेल्या तर सगळे आपल्याला अहंकारी समजतील. अभिमानी म्हणतील. धर्मचर्चा करु लागतील, आणि एखाद्याने जरी आपल्याला अडवले तर फजिती होईल. गाई परत कराव्या लागतील. केवढा अपमान होईल. त्यापेक्षा गप्प बसणेच बरे.’
काळ पुढे सरकत होता. कोणीही गाई न्यायला पुढे होत नाही हे पाहून, राजा पुन्हा उठला. पुन्हा विश्रांती केली. तरीही कोणी उठेना. हे पाहून राजा म्हणाला, "कुरु पाञ्चालातल्या या विद्वज्जनात कोणीही या सभेचे आव्हान स्वीकारु शकत नाही याचे आम्हाला आश्‍चर्य वाटते. मोठया अपेक्षेने आम्ही ही सभा बोलावली होती; पण आता धर्मचर्चेविनाच ही सभा विसर्जित करावी लागणार की काय ?"
हे ऐकताच याज्ञवल्क्यमुनी उठले. आपल्या धीरगंभीर आवाजात त्यांनी आपल्या शिष्याला सांगितले. "भारद्वाजा, ऊठ ! ही सभा विद्वज्जनांची ठरली पाहिजे. जा, महाराजांच्या गोशाळेतल्या गाई आपल्या आश्रमाकडे घेऊन जा."
ते ऐकून सगळ्यांच्या नजरा याज्ञवल्क्यांच्याकडे वळल्या. राजाच्या मुखावर स्मिताची रेषा खुलली. इतर ऋषींना सुटल्याचा आनंद झाला असला तरी, आता याज्ञवल्क्याची वादात फजिती कशी करावी याचा विचार ते करु लागले. तोच पुन्हा याज्ञवल्क्य राजाला म्हणाले,"राजन, मी अत्यंत नम्रतेने पण आत्मविश्‍वासाने हे आव्हान स्वीकारतो. सर्वांशी चर्चा करायला मी उत्सुक आहे." आणि सभेकडे पाहून तो म्हणाला, "मान्यवर मुनींनो ! मी तुम्हा सर्वांत श्रेष्‍ठ ब्रह्मवेत्ता आहे असा दावा मी करीत नाही. आपणा सर्व ब्रह्मवेत्त्यांना मी विनम्रतेने अभिवादन करतो. मी आपल्याशी चर्चेला तयार आहे. आपण प्रश्‍न विचारावेत. यथामती, यथाशक्‍ती मी उत्तरे देतो."
शास्‍त्रार्थ चर्चेला सुरुवात झाली. याज्ञवल्क्यांवर प्रश्‍नांचा भडिमार सुरु झाला. ते जराही विचलित झाले नाहीत. त्यांनी सर्व प्रश्‍नांची धैर्याने उत्तरे दिली. अश्‍वलमुनींनी निवडक प्रश्‍न विचारले; पण योग्य उत्तरे मिळताच ते गप्प बसले. नंतर आर्तभाग, भुज्यू, चाक्रायण, उषस्त आदी विद्वानांनी विविध प्रश्‍न विचारुन त्यांना अडचणीत टाकण्याचा खूप प्रयत्‍न केला. परंतु याज्ञवल्क्यांची तयारी एवढी जबरदस्त होती की, ते निरुत्तर झाले नाहीत. हळूहळू सभा शांत होत गेली; फुललेले निखारे विझत विझत शांत होतात त्याप्रमाणे ! ते पाहून गार्गी पुढे सरसारवली. तिने नम्रतेने सांगितले,"महर्षी, मलाही काही प्रश्‍न विचारायचे आहेत. ते मी विचारते, आपण त्यांची उत्तरे द्यावीत."
"हे गार्गी, खुशाल विचार प्रश्‍न !"
"महर्षी, ज्या अर्थी हे सर्व पार्थीव पदार्थ पाण्यात ओतप्रोत आहेत, तसे पाणी कशात ओतप्रोत आहे ?"
"पाणी वायूत ओतप्रोत आहे."
"मग वायू ?"
"आकाशात."
"आकाश कशात ओतप्रोत आहे ?"
"अंतरीक्षात."
"अंतरीक्ष ?"
"गंधर्वलोकात."
"आणि गंधर्वलोक ?"
"छान. गार्गी, तुझी प्रश्‍नमालिका बरीच मोठी दिसते. मला निरुत्तर करायचा विचार दिसतोय."
"तसं नाही, महाराज. एका उत्तरातून दुसरा प्रश्‍न तयार होत गेला म्हणून विचारते आहे. आणि उत्तरांनी अंतिम समाधान व्हायला नको का ? आपण एवढी भराभर उत्तरे देत आहात की, सारी सभा विस्मयात पडली आहे. बरं, ते जाऊ द्या. आपला प्रश्‍न अर्धवट राहील. मी विचारत होते, गंधर्वलोक कशात ओतप्रोत आहे ?" गार्गीने याज्ञवल्क्यांना पुन्हा मूळ मुद्दयावर आणीत विचारले.
"गंधर्व लोक आदित्य लोकात."
"आदित्य लोक कशात ?"
"चंद्रलोकात."
"चंद्रलोक ?"
"नक्षत्र लोकात."
"आणि तो ?"
"देवलोकात."
"महर्षी, मग देवलोक कशात ओतप्रोत आहे ते कृपया सांगावे."
"प्रजापती लोकात."
"आणि प्रजापती लोक ?"
"ब्रह्म लोकात."
"फारच सुंदर ! हे महामुने, आपण माझ्या प्रश्‍नांची उत्तर फारच सुंदर आणि तत्परतेने दिलीत. मी प्रसन्न आहे. पण मुनिवर, हा ब्रह्मलोक मग कशात ओतप्रोत आहे ?"
"क्षमा कर, गार्गी ! पण ही उत्तराचि अंतिम सीमा आहे. याच्या पुढे प्रश्‍न असूच शकत नाही. यापुढे तू प्रश्‍न विचारु नयेस, असं वाटतं. तू विदुषी आहेस. ब्रह्मवादिनी आहेस. मी काय म्हणतो ते तुला समजलं असेल. याशिवाय अधिक प्रश्‍न विचारलास तर काय होईल याचीही तुला कल्पना आहे. तरीही गार्गी, तू विचारलेल्या अंतिम प्रश्‍नाच्या संदर्भात मी काही गोष्‍टी विषद करतो."
"महाराज, मी ऐकायला उत्सुक आहे. आपण सांगण्याची कृपा करावी,अशी मी विनंती करते."
"गार्गी ! या सर्वाचं आदिकारण ब्रह्म आहे. तेच सर्वांचं अधिष्‍ठान आहे. ज्याच्यापासून जे बनते ते त्याचे अधिष्‍ठान समजले जाते, तसे ब्रह्म हे अधिष्‍ठान आहे."
"मुनिवर, हे अधिक स्पष्‍ट करुन नाही का सांगता येणार ?"
"येईल. ऐक. ब्रह्म हे अतिशय मोठे असून त्याचे कोणत्याही मापाने माप करता येणार नाही. त्याचप्रमाणे या ब्रह्माला कोणतेही रंग, रुप नाही. आर्द्रता नाही. ते सर्वांचा आधार असले, तरी त्याचा कशाशीही संबंध नाही. इंद्रिये ज्या शक्‍तीच्या साहाय्याने व्यापार करतात ती शक्‍ती या अक्षर ब्रह्माचीच आहे; परंतु या ब्रह्माला मात्र इंद्रिये नाहीत. हे ब्रह्म एकजिनसी असून सर्वत्र भरलेले आहे.
हे गार्गी ! इतकेच काय पण या ब्रह्माच्याच आधिपत्याखाली सूर्यचंद्र नित्य प्रकाशतात आणि पूर्वपश्‍चिमवाहिनी सरिता अखंड वाहत असतात. थोडक्यात सांगायचे झाले तर ब्रह्मांडातील सर्व देवांचा, मानवांचा, पशुपक्ष्यांचा व वनस्पतींचा सर्व व्यवहार या ब्रह्मतत्त्वाच्या शक्‍तीनेच चालतो. आणि तरीही ही शक्‍ती कोठे दृश्य स्वरुपात नाही, तर ती अदृश्य असते. उदाहरण द्यायचे झाले तर, देशाचा कारभार करण्यासाठी निरनिराळे अंमलदार नेमलेले असतात. ते आपापला कारभार नियमित आणि सुसंघटित रीतीने चालवितात, असे आपण म्हणतो. तसा कारभार करण्यासाठी लागणारी शक्‍ती त्याची स्वतःची आहे असे वरकरणी आपल्याला वाटते. पण बारकाईने विचार केला तर कळून येते की, ती शक्‍ती देशातील राजाची असते व त्याच्यापासूनच ती त्यांना प्राप्‍त झालेली असते. ब्रह्मसत्ताही पण अशीच आहे. हे गार्गी ! या ब्रह्माच्या सत्तेशिवाय या विश्‍वातील एक पानसुद्धा हलत नाही."
आपल्या प्रश्‍नांची समर्पक उत्तरे श्रवण करुन गार्गीचे समाधान झाले. तिने समाधानाने मान डोलाविली. तिची वृत्ती खिलाडू, उदार होती. प्रतिपक्षामधील गुण मान्य करण्याइतके तिचे हृदय सरळ व गुणज्ञ होते. त्यामुळे ती लगेचच सर्व सभेला उद्देशून म्हणाली,"ऋषिमुनींनो आणि परमपूज्य विद्वज्जनहो, आपण आतापर्यंतची शास्‍त्रचर्चा सर्वांनी ऐकलीत. त्यातून याज्ञवल्क्यमुनींचे वाक्‌चातुर्य, अभ्यास, वादकौशल्य अशा कितीतरी गुणांची ओळख आपल्याला पटलेली आहे. यांना आदराने वंदन करुन, यांचा श्रेष्‍ठपणा मान्य करण्यातच आपलाही मोठेपणा आहे. मला असं वाटतं की, तुमच्यापैकी कोणीही विद्वान या ब्रह्मवेत्त्या ऋषीला केव्हाही जिंकू शकणार नाही."
गार्गी वादातून निवृत्त झाली. सर्व सभेने तिचा निर्णय मान्य केला. राजा जनकालाही ते पटले. त्याने सभेचा समारोप करताना गार्गीच्या विद्वत्ता, बहुश्रुतता, समयसूचकता, ब्रह्मजिज्ञासा, सभाधीटपणा, सरल हृदयी आणि गुणज्ञता आदी गुणांची मुक्‍तकंठाने स्तुती केली.
सभा संपली होती. गार्गीच्या अनेक गुणांना प्रभाव अजूनही जनमानसावर वावरत होता. जाणारे विद्वज्जन गार्गीच्या गुणांचा गौरव करीतच आपापल्या कुटीच्या दिशेन जात होते.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP