मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|पौराणिक कथा|संग्रह ३|
शंखचूडाची कथा

शंखचूडाची कथा

हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कथा उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.


दक्षाच्या तेरा कन्या कश्‍यप ऋषींच्या पत्नी होत्या. त्यातीलच एकीचे नाव दनू. तिच्या मुलाचा मुलगा दंभ म्हणून होता. तो धार्मिक वृत्तीचा होता. पुत्रप्राप्तीसाठी त्याने शुक्राचार्यांना गुरू मानून कृष्णमंत्र घेतला व पुष्करला जाऊन घोर तप आरंभिले. भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास सांगितले, तेव्हा त्रिलोकास जिंकणारा, देवांनाही अजिंक्‍य ठरेल असा पुत्र त्याने मागितला. राधेकडून शाप मिळालेला श्रीकृष्णाचा सखा सुदामा दंभपत्नीच्या पोटी आला. त्याचे नाव शंखचूड असे ठेवले. तो फार तेजस्वी होता. लहानपणीच सर्व विद्या त्याने शिकून घेतल्या. त्रैगीषव्य मुनींच्या सांगण्यावरून त्याने पुष्करतीर्थी जाऊन ब्रह्मदेवाची तपश्‍चर्या केली व देवांनाही अजिंक्‍य होईन असा वर मिळवला. ब्रह्मदेवानी त्याला दिव्य श्रीकृष्णकवच दिले. तसेच बदरीवनात जाऊन तेथे तप करीत असलेल्या तुलसीबरोबर विवाह करावा, असे सांगितले. त्यानुसार तो बदरीकाश्रमात आला. सात्त्विक विचारांनी त्याने तुलसीला जिंकले व तिच्याशी गांधर्व विवाह केला. ब्रह्मदेव प्रकट झाले व त्या दोघांना त्यांनी आशीर्वाद दिला. तसेच मृत्यूनंतर शंखचूड पुन्हा गोकुळात श्रीकृष्णाकडे जाईल व तुलसी वैकुंठात विष्णूंना प्राप्त करून घेईल, असे वर्तवले.

शंखचूडाने देवावर आक्रमण करून त्यांना जिंकले व तो छत्रपती सम्राट बनला. अनेक वर्षे त्याने न्यायाने राज्य केले. दानव असूनही तो श्रीकृष्णभक्त होता. पण राज्य गमावल्यामुळे चिंतित होऊन सर्व देव ब्रह्मदेवांना घेऊन वैकुंठाकडे गेले. श्रीहरींनी शंखचूडाची सर्व हकिगत देवांना सांगितली व त्याचा मृत्यू रुद्राच्या त्रिशूलाने निश्‍चित केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे देवांनी महादेवांना शंखचूडास मारण्याची विनंती केली. शंकर व पत्नी तुलसी यांचा उपदेश न ऐकता शंखचूड युद्धास सज्ज झाला. देवकार्य म्हणून शंकरही युद्धास तयार झाले. जोपर्यंत शंखचूडाकडे श्रीकृष्णकवच आहे व त्याची पत्नी तुलसी हिते पातिव्रत्य अखंड आहे, तोवर शंखचूडावर जरा व मृत्यू यांचा प्रभाव पडणार नाही हे जाणून विष्णूंकडून तुलसीचे पातिव्रत्य मायेने हिरावून घेतले व याचकाच्या रूपात शंखचूडाचे कवच काढून घेतले. शंकरांनी त्रिशूल सज्ज करून शंखचूडाचा नाश केला.

N/A

References : N/A
Last Updated : January 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP