रामदासांचे अभंग - २६१ ते २७१

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला,
समर्थ रामदास स्वामींचे अभंग भावार्थासहित.


अभंग---२६१

परमेष्ठी परब्रह्म । तोचि माझा आत्माराम ॥ कैसें केलें संध्यावंदन । सर्वां भूतीं हो नमन ॥ नाहीं आचमनासी ठावो । तेथे नामचि जालें वावो ॥ जेथें हरपले त्रिकाळ । ऐसी संध्येसि साधली वेळ ॥ कळिकाळा तीन चूळ पाणी । रामदास दे सांडुनी ॥

भावार्थ---

सर्वात श्रेष्ठ असे जे परब्रह्म तोच आपला आत्माराम आहे असे सांगून संत रामदास म्हणतात, संध्यासमयी सुर्याला केलेले वंदन म्हणजे विश्वातील सर्व प्राणिमात्रास केलेले नमन होय. येथे संध्या करतांना आचमनास देखील ठिकाण नाही.  ज्या वेळी भूत, भविष्य, वर्तमान हे तिन्ही काळ एकमेकांत मिसळून जातात अशी संध्याकाळची वेळ साधून कळिकाळाला तीन वेळा पाणी देवून संत रामदास आपली संध्या करतात.

अभंग---२६२

पूर्वोच्चरिते ओंकार । प्रणवबीज श्री रघुवीर ॥ ब्रह्मयज्ञ कैसा पाहें । अवघें ब्रह्मरुप आहे ॥ देवर्षि पितृगण । तृप्ति श्रीरामस्मरण ॥ सव्य अपस्व्य भ्रांति । ब्रह्म नि:संदेह स्थिति ॥ आब्रह्मस्तंभ पर्यंत । राम सबाह्य सदोदित ॥ दासीं ब्रह्मयज्ञ सफळी । संसारासी तिळांजुळी ॥

भावार्थ---

ॐ काराचे म्हणजे प्रणवाचे मूळबीज श्री रघुवीर असून त्याचा उच्चार मंत्राच्या प्रारंभी केला जातो.  अखिल विश्व ब्रह्मरुप असून सतत ब्रह्मयज्ञ चालू असतो. देव, ऋषी, पितृगण केवळ श्रीरामांच्या नामस्मरणाने प्रसन्न होतात. ब्रह्म हे कोणत्याही संदेहा पलिकडील स्थिति असून मंत्रोपचारा पूर्वी-करावयाचे सव्य, अपसव्य (डावे, उजवे ) हे केवळ उपचार आहेत असे सांगून संत रामदास म्हणतात, श्रीराम या विश्वाला आतून बाहेरुन व्यापून राहिला आहे.  संसाराला तिलांजली देऊन संत रामदासांनी हा ब्रह्मयज्ञ सफळ संपूर्ण केला आहे.  

अभंग---२६३

अनित्याचा भ्रम गेला । शुध्द नित्यनेम केला ॥ नित्यानित्य हा विचार । केला स्वधर्म आचार ॥ देहबुध्दि अनर्गळ । बोधें फिटला विटाळ ॥ रामदासी ज्ञान जालें । आणि स्वधर्म रक्षिलें ॥

भावार्थ---

संत रामदास म्हणतात, रामनाम जपाचा शुध्द नित्यनेम केल्यानंतर मनातील अनित्य (सतत बदलणार्या )नाशवंत गोष्टींचा भ्रम दूर झाला.  नित्य, अनित्याचा विचार जावून स्वधर्माचा आचार सुरु झाला, मी आत्मा नसून देह आहे ही खोटी देहबुध्दी लोप पावून मनाची मलीनता दूर झाली.  शुध्द ज्ञानाचा उगम झाला आणि स्वधर्माचे रक्षण झाले.  

अभंग---२६४

एकादशी नव्हे व्रत । वैकुंठीचा महापंथ ॥ परी रुव्मांगदाऐसा । व्हावा निश्चय मानसा ॥ एकादशीच्या । उपोषणे । विष्णुलोकीं ठाव घेणें ॥ रामीरामदास म्हणे । काय प्रत्यक्षा प्रमाण ॥

भावार्थ---

एकादशी हे केवळ एक व्रत नसून वैकुंठाला जाण्याचा तो महान पंथ आहे.  रखुमाईपतीला भेटण्याचा मनाचा निश्चय करून एकादशीचे उपोषण करावे आणि विष्णुलोकी निवास करावा.  एकादशी उपोषणाचे पुण्य महान आहे.  संत रामदास म्हणतात, प्रत्यक्ष दिसणार्या गोष्टींना प्रमाणाची जरुरी नसते.  

अभंग---२६५

क्षीरापतीची वाटणी । तेथें जाली बहु दाटणी । पैस नाहीं राजांगणी । कोणालागी ॥ रंगमाळा नीरांजने । तेथें वस्ती केली मनें । दिवस उगवतां सुमनें । कोमाईली ॥ रथ देवाचा ओढिला । यात्रेकरा निरोप जाला । पुढें जायाचा गल्बला । ठायीं ठायीं ॥ भक्तजन म्हणती देवा । आतां लोभ असों द्यावा । बहु सुकृताचा ठेवा । भक्ति तुझी ॥ दास डोंगरी राहतो । यात्रा देवाची । पाहतो । देव भक्तासवें जातों । ध्यानरुपे ॥

भावार्थ---

या अभंगांत संत रामदास एकांत स्थळी डोंगरावर निवास करुन तेथून देवाची यात्रा पाहून यात्रेचे वर्णन करीत आहेत. यात्रेमध्ये भक्तांची एव्हढी गर्दी दाटली आहे की, कोणाला पाय ठेवायला देखील जागा नाही.  पताका, दिव्यांची रोषणाईयांत माणसांची मने रंगून गेली आहेत.  दिवसा उमलणार्या फुलांप्रमाणे मने मोहरून आली.  देवाचा रथ ओढण्यासाठी निरोप येतांच पुढे जाण्याची एकच गडबड उडाली.  भक्तजन देवाची आळवणी करतात की, खूप पुण्याचाठेवा म्हणजेच देवाची भक्ति, आता भक्तांवर असाच लोभ ठेवावा.  ही नितांत भक्ती पाहून देव भुलतो आणि ध्यानमार्गाने भक्तांच्या मनांत शिरून त्यांच्या बरोबर जातो.  

अभंग---२६६

गेला प्रपंच हातींचा । लेश नाही परमार्थाचा ॥ दोहींकडें अंतरला । थोरपणें भांबावला ॥ गेली अवचितें निस्पृहता । नाहीं स्वार्थहि पुरता ॥ क्रोधे गेला । संतसंग । लोभें जाहला वोरंग ॥ पूर्ण जाली नाहीं आस । इकडे बुडाला अभ्यास ॥ दास म्हणे क्रोधे केलें । अवघे लाजिरवाणें जालें ॥

भावार्थ---

ज्या साधकाला प्रपंच सावधपणे करतां येत नाही त्याला परमार्थही साधतां येणार नाही असे सांगून संत रामदास म्हणतात, असा साधक दोन्ही गोष्टींना पारखा होतो. त्याची निस्पृहता (कोणतिही गोष्ट मिळवण्याची ईच्छा) लयाला जाते. पण मनामध्ये स्वार्थ ही नसतो. अहंकाराने क्रोध निर्माण होतो आणि तो सत्संगाला मुकतो. लोभामुळे रंगाचा बेरंग होतो. त्या साधकाच्या आशा, आकांक्षा पूर्ण होऊ शकत नाही, निराशेमुळे साधनेमध्यें खंड पडतो. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही बुडतो, त्याचे जीवन लाजिरवाणे होते.

अभंग---२६७

थोर अंतरी भडका । आला क्रोधाचा कडका ॥ नित्य निरूपणी बैसे । अवगुण जैसे तैसे ॥ लोभें भांबावले मन । रुक्यासाठी । वेंची प्राण ॥ दंभ विषयीं वाढला । पोटीं कामें खवळला ॥ मदमत्सराचा कांटा । अहंकारें धरीं ताठा ॥ दास म्हणे जालें काय । श्रोती । राग मानू नये ॥

भावार्थ---

मनामध्यें क्रोध शिरला की, अंतकरणांत रागाचा अग्नी भडकतो, मग कथा निरुपणाला बसला तरी त्या पासून काहीं बोध मिळत नाही आणि अवगुण सरत नाहीत, त्यांत मनांत लोभ शिरला तर रुपयासाठी प्राण देखिल देण्यास तयार होतो. त्यातच दंभ वाढीस लागतो अनेक प्रकारच्या कामना निर्माण होतात. या कामनांमुळे अहंकार (गर्विष्ठपणा) वाढून अनेकांचा द्वेष, मत्सर करु लागतो, संत रामदास म्हणतात, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, हे सहा साधकाचे शत्रु आहेत असे समजावें, या कथनाचा राग मानू नये,

अभंग---२६८

हो कां मुमुक्षु अथवा मुक्त । आहे विषयांचा आसक्त ॥ विवेकवैराग्यसंग्रह । करणें लागे यावद्देह ॥ रामीरामदास म्हणें । शांति ज्याच्या दृढपणें ॥

भावार्थ---

मोक्षाची ईच्छा करणारा साधक असो किंवा मुक्त साधक असो तो इंद्रियजन्य विषयांत आसक्त होण्याची शक्यता असते. यासाठी जो पर्यंत देहांत जीव आहे तो पर्यंत विवेक आणि वैराग्य या साठी प्रयत्न करणे जरुर आहे असे सांगून संत रामदास म्हणतात, विवेक आणि वैराग्य ज्यांच्या मनांत पूर्णपणे रुजला आहे तेथे मनःशांती द्रुढपणे विराजमान असते.

अभंग---२६९

वृध्द ते म्हणती संसार करावा । जनाहातीं घ्यावा म्हणुनी बरें ॥ म्हणताती जन बरें ते कोणाला । बुडविती त्याला ऐशा बोधी ॥ वैश्वदेव दान अतिथी तो घडें । टाकी एकीकडे केले दोष ॥ मूर्ख तो म्हणाला काय जी वाल्मिक । टाकितां सकळिक मुक्त जाला ॥ रामदास म्हणे कथिलें । जे वेदीं । तया मात्र बंदी इतर थोर ॥        

भावार्थ---

काहीं वृध्द अनुभवी लोक म्हणतात की, संसाराचा त्याग करु नये कारण त्यांमुळे जनसंपर्क वाढतो, वैश्वदेव व दानधर्म घडून पुण्यसंचय घडतो तसेच अतिथींचा आदरसत्कार करण्याची संधी मिळते त्यामुळे सर्व दोषांचे निराकरण होते. या वर उत्तरा दाखल संत रामदास विचारतात, सर्वस्वाचा त्याग करून मुक्ती मिळवणारा वाल्मिकी ऋषींना मूर्ख कसे ठरवतां येईल? वेदांनी जे सांगितलें आहे ते प्रमाण मानून थोर लोक वेदांना वंदन करतात.

अभंग---२७०

सर्वस्व बुडती ऐसी जे मातोक्ती । न धरावी चित्तीं साधकांनी ॥ भरत तो मूर्ख काय होतां सांग । मातेचा तो त्याग । केला जेणें ॥ पित्याने त्यागिलें । दैत्येद्रें प्रल्हादें । कां त्यासी गोविंदें स्नेह केला ॥ दैत्य बिभीषणें टाकीयेला बंधु । रामासी संबंधु । जोडियेला ॥ रामदास म्हणे । शुक्र होतां गुरू । परंतु दातारु । धन्य । बळी ॥

भावार्थ---

संसाराचा त्याग करून परमार्थाला लागलेल्या साधकांचे सर्वस्व बुडते असे मानणार्‍या लोकांना संत रामदास सांगतात की, साधकांनी असा विचार करणे योग्य नाही. श्री रामाच्या भक्तीसाठी भरताने आपल्या मातेचा त्याग केला.  पित्याने त्याग केलेल्या भक्त प्रल्हादाने गोविंदासी स्नेह जोडला, रावणाचा बंधु बिभिषण याने रावणाचा त्याग करून रामाशी संबध जोडला, शुक्राच्यार्या सारखे गुरु असतांना बळीने वामनाला तीनपाद भूमी दान करून श्रेष्ठ दाता ठरला. हे सर्व भक्त धन्य होत.

अभंग---२७१            

अनन्याचे पाळी लळे । पायीं ब्रीदावळी रुळे ॥ महामृदगलाचें प्रमें । रणछोडी आला राम ॥ तारी तुकयाचचे पुस्तक । देव ब्रह्मांनायक ॥ कृष्णातीरीं हाका मारी । दासा भेटी द्या अंतरीं ॥

भावार्थ---

संत रामदास या अभंगात म्हणतात कीं, हा ब्रंमांडनायक देव अनन्य भक्ती करणार्या भक्तांचे अनेक हट्ट पुरवतो.  त्याने पायांत ब्रीदाचे तोडर बांधले आहे, तुकारामांचे इंद्रायणीत बुडवलेलें अभंग या देवाने जसेच्यातसे वर काढलें. प्रेमळ भक्तांच्या हाकेला धावून जाणार्या देवाला संत रामदास कृष्णातिरी उभे राहून भेट देण्यासाठी आळवित आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : March 11, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP