रामदासांचे अभंग - २३१ ते २४०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला,
समर्थ रामदास स्वामींचे अभंग भावार्थासहित.


अभंग---२३१

गेला स्वरूपाच्या ठायां । तिकडे ब्रह्म इकडे माया ॥ दोहींमध्यें सांपडलें । मीच ब्रह्मसें कल्पिलें ॥ ब्रह्म निर्मळ निश्चळ । माया चंचळ चपल ॥ तिकडे वस्तु निराकार । इकडे मायेचा विस्तार ॥ पुढे ब्रह्म मागें माया । मध्ये संदेहाची काया ॥ रामीरामदास म्हणे । इतुकें मनाचें करणें ॥

भावार्थ---

साधक स्व-स्वरुपाचा शोध घेण्यास निघाला तेव्हां तो एकीकडे ब्रह्म आणि दुसरीकडे माया असा दोन्हीमध्यें सापडला आणि आपणच ब्रह्म आहोत अशी कल्पना केली. ब्रह्म निर्मळ, निराकार आणि निश्चळ(चंचल नसणारे)तर माया चंचळ आणि चपळ, पुढे ब्रह्म, मागे माया त्यामध्ये साधक सापडून त्याच्या मनांत संदेह़ निर्माण होतो.   संत रामदास म्हणतात, या सगळ्या मानसिक क्रिया आहेत.

अभंग---२३२

ब्रह्म हे जाणावें आकाशासारिखें । माया हे वोळखें वायू ऐसी वायू ऐसी माया चंचल चपळ । ब्रह्म ते निश्चळ निराकार निराकार ब्रह्म नाही आकारलें । रुप विस्तारलें मायादेवी मायादेवी जाली नांव आणि रूप । शुध्द सस्वरूप वेगळेचि । वेगळेचि परी आहे सर्वां ठायीं । रिता ठाव नाही तयांविणें तयाविणें ज्ञान तेचि अज्ञान । नाहीं समाधान ब्रह्मेविण ब्रह्मेविण भक्ति तेचि पै अभक्ति । रामदासी मुक्ति ब्रह्मज्ञानी

भावार्थ---

या अभंगांत संत रामदास माया आणि ब्रह्म यांचे स्वरूप स्पष्ट करून सांगत आहेत, ब्रह्म हे आकाशासारखे निश्चळ, निराकार असून माया वायूसारखी अतिशय चपळ आणि चंचल आहे. ब्रह्म निराकार आहे म्हणजे त्याला कोणताही आकार नाही या उलट मायादेवी विविध नावांनी आणि रुपांनी खूप विस्तार पावली आहे.  ब्रह्माचे स्वरुप अत्यंत शुध्द व सर्व वस्तुजातापेक्षा निराळे असूनही ते सर्व सजीव व निर्जीव सृष्टीला व्यापून राहिलें आहे, ब्रह्मतत्वाशिवाय अणूमात्रसुध्दां जागा रिकामी नाही. ब्रह्म म्हणजे परिपूर्ण ज्ञान असून त्या शिवाय ज्ञान म्हणजे अज्ञान होय.  ब्रह्मतत्व जाणून घेतल्याशिवाय भक्ति ही केवळ अभक्ति आहे असे सांगून संत रामदास स्वप्रचितिने सांगतात की, आपणास ब्रह्मज्ञानानेच मुक्ति प्राप्त झाली.  

अभंग---२३३

अनंताचा अंत पहावया गेलों । तेणें विसरलों आपणासी आपणा आपण पाहतां दिसेना । रूप गवसेना दोहींकडें दोहीकडे देव आपणची आहे । संग हा न साहे माझा मज माझा मज भार जाहला बहुत । देखतां अनंत कळों आला कळों आला भार पाहिला विचार । पुढें सारासार विचारणा विचारणा जाली रामीरामदासीं । सर्वही संगासी मुक्त केलें मुक्त केले मोक्षा मुक्तीची उपेक्षा । तुटली अपेक्षा कोणी एक

भावार्थ---

या अभगांत संत रामदास एका अनिर्वचनीय अनुभवाचे वर्णन करीत आहेत. अनंत ब्रह्मरुप परमात्म्याचे अंतिम स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतांना आपण आपले स्वरुपच विसरुन गेलो आहोत, त्या अनंतरुपांत स्वता:चे रुपच सापडेनासे झालें.  आपले स्वरुप ब्रह्म स्वरुपाशी एकरुप झाले आहे असा अनुभव येऊन आपण नि:संग झालो, आपल्या अस्तित्वाचा भार आपल्यालाच सोसवेनासा झाला आणि सारासार विचार करतांना आपण आणि हे अनंत स्वरुप वेगळे नाही याची जाणिव झाल्याने आपण नि:संग बनलो मुक्तीची उपेक्षा करुन मोक्ष या कल्पनेपासून मुक्त झालो, सर्व अपेक्षा अनंत स्वरुपांत विलीन झाल्या.

अभंग---२३४

ओळखतां ज्ञान ओळखी मोडली । भेटी हे जोडली आपणासी आपणासी भेटी जाली बहुदिसां । तुटला वळसा मीपणाचा मीपणाचा भाव भावें केला वाव । दास म्हणे देव प्रगटला

भावार्थ---

संत रामदास म्हणतात, जेव्हां चित्तात निखळ ज्ञानाचा झरा उगम पावला तेव्हां अज्ञान आपोआपच दूर झालें, खूप दिवसांनी श्री रामाची भेट झाली आणि मीपणाच्या अहंकाराचा पडदा सहजपणें गळून पडला. श्रीरामा वरील अतूट भक्तिभावामुळे मी पणाचा भाव खोटा ठरला, श्री राम ज्ञानरूपाने प्रगट झाले.

अभंग---२३५

मीच ब्रह्म ऐसा अभिमान धरीं । जाणावा चतुरीं चोथादेहु चौथे देहीं सर्वसाक्षिणी अवस्था । ऐसी हे व्यवस्था चौदेहांची चौदेहांची गांठी शोधितां सुटली विवेके तुटली देहबुध्दि देहबुध्दी नाहीं स्वरूपीं पाहतां । चौथा देह आतां कोठें आहे कोठे आहे अहंब्रह्म ऐसा हेत । देहीं देहातीत रामदास

भावार्थ---

मी म्हणजेच ब्रह्म असे जाणून घेऊन जो त्या बद्दल अभिमान बाळगतो तोच चौथा देह आहे, हे चतुराईने समजून घ्यावे असे संत रामदास म्हणतात. मन, बुध्दी, अहंकार व चित्त हा चौथा देह असून ही सर्वसाक्षिणी, (विश्वातील सर्व घटनांचे अवलोकन करून त्यांची संगती लावू शकणारी असामान्य क्षमता )या अवस्थेला संत तुर्या अवस्था मानतात. जागृती, स्वप्न, सुषुप्ती (गाढ झोप)व चौथी तुर्या अवस्था मानली जाते. या अवस्थेत साधक गाढ झोपेतही नसतो आणि पूर्ण जाग्रतावस्थेतही नसतो, या अवस्थेत प्रज्ञा जाग्रुत असून साधकाची अलौकिक प्रतिभा, विचार शक्ती जाग्रुत होते.  या अवस्थेत चौदेहाची गाठी सुटून देहबुध्दी विवेकाने लोप पावतें. अहंकार म्हणजेच मी पणाचा भाव लुप्त होऊन अहंब्रह्म म्हणजेच मी च ब्रह्म आहे याचा साक्षात्कार होतो. संत रामदास स्वप्रचितीने सागंतात की या अवस्थेत साधक देहांत असूनही देहातीत अवस्थेंत पोचतो, परब्रह्म स्वरूपाशी एकरुप होतो.

अभंग---२३६

मायेचे स्वरूप ब्रह्मी उद्भवलें । तिच्या पोटी आलें महतत्व महतत्वीं सत्व सत्वीं रजोगुण । तिजा तमोगुण रजापोटीं पोटां पंचभूतें तयांचिया आली । दास म्हणे जाली सृष्टि ऐसी

भावार्थ---

या अभंगात संत रामदास सृष्टी कशी निर्माण झाली या विषयी सांगत आहेत.   मायेचे स्वरूप ब्रह्मरूपात प्रकट झाले आणि तिच्या पोटी महतत्वाचा जन्म झाला. महतत्वातून सत्वगुण व सत्वगुणांतून रजोगुण निर्माण झाला, रजोगुणातून तमोगुणाचा उदय झाला. तमोगुणातून पंचमहाभूते प्रगट झाली आणि पंचमहाभूतातून सर्व सृष्टी निर्माण झाली.  

अभंग---२३७

स्वप्न वाटे सार तैसा हा संसार । पाहतां विचार कळोंलागे ॥ स्वप्न वेगींसरे संसार वोसरे । लालुचीच उरे दोहींकडे ॥ दास म्हणे निद्राकाळी स्वप्न खरें । भ्रमिष्टासी बरें निद्रासूख ॥

भावार्थ---

स्वप्न हा मनातील कल्पनांचा खेळ, केवळ आभास असतो तसा संसार आहे, विचाराअंती हे कळून येते. स्वप्न जसे दिसते आणि वेगाने दिसेनासे होते, तसाच संसार दिसतो आणि नासतो. मन मात्र लालचावल्या सारखे होते. संत रामदास म्हणतात निद्राकाळी स्वप्न खरें वाटते म्हणून भ्रम झालेल्या माणसाला निद्रासुख बरेंवाटतें.

अभंग---२३८

गळे बांधले पाषाणीं । आत्मलिंग नेणें कोणी ॥ जीव शिवाचें स्वरूप । कोण जाणें कैसें रूप ॥ लिंग चुकले स्वयंभ । धरिला पाषाणाचा लोभ ॥ रामीरामदास म्हणे । भेद जाणतीं शहाणे

भावार्थ---

जीव हे शिवाचे स्वरूप असे सर्वजण म्हणतात परंतू हे रुप प्रत्यक्ष कसे आहे हे कोणीच जाणत नाही, स्वयंभू लिंग समजून पाषाणाची पूजा करतात, त्याचाच लोभ धरतात.  संत रामदास म्हणतात, स्वयंभू लिंग आणि पाषाण यांतील भेद फक्त शहाणे लोकच जाणतात.  

अभंग---२३९

अंत नाही तो अनंत । त्यासि दोरी करी भ्रांत ॥ ऐसें जनाचें करणें । कैसा संसार तरणें ॥ देव व्यापक सर्वांसी । त्यास म्हणती एकदेशी ॥ रामदासी देव पूर्ण । त्यासी म्हणती अपूर्ण ॥

भावार्थ---

दोरी बघून भ्रांती पडल्यामुळे दोरीलाच साप समजतो व भितीने गर्भगळित होतो, अज्ञानामुळे सामान्य माणुस असे वर्तन करतो त्या मुळे त्याला संसार सागर तरून जाणे अवघड जाते असे सांगून संत रामदास म्हणतात की, देव सर्व सृष्टीत, अणुरेणूत व्यापून राहिलेला असूनही आपण त्याला स्थळ कांळाच्या बंधनांत अडकवतो.  अनंत परमेश्वराची मूर्ती बनवून त्याची पूजा करतो. जो पूर्ण आहे त्याला अपूर्ण, जो अविनाशी आहे त्याचे आवाहन व विसर्जन करतो.

अभंग---२४०

जन्मवरी शीण केला । अंत:काळीं व्यर्थ गेला ॥ काया स्मशानीं घातली । कन्यापुत्र मुरडलीं ॥

घरवाडा तो राहिला  ।  प्राणी  जातसे एकला  ॥

धनधान्य तें राहिलें । प्राणी चरफडीत गेले ॥ इष्टमित्र आणि सांगाती । आपुलाल्या घरां जाती ॥ दास म्हणे प्राणी मेले । कांहीं पुण्य नाहीं केलें ॥

भावार्थ---

संत रामदास म्हणतात, माणुस आयुष्यभर घरसंसार, धनधान्य, सगेसोयरे, इष्टमित्र यांच्यासाठी कष्ट घेतो परंतू अंत:काळी सर्व व्यर्थ जाते.  घरदार, धनधान्य सगळं सोडून प्राणी चरफडत एकटाच निघून जातो. देह स्मशानांत ठेवून सर्व सांगाती, मित्र, कन्यापुत्र तेथून निघून आप आपल्या घरी जातात.  कोणतंही पुण्य त्याच्या कामी येत नाही.

N/A

References : N/A
Last Updated : March 11, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP