अभंग ११
ईंद्रासी उद्वेग सर्वकाळ मनीं । माझे राज्य कोणी घेईना कीं घेईना कीं कोणी बळिया दानव । घालिना कीं देव कारागृहीं कारागृह देवादिकांचे चुकेना । तेथे काय जनां चुकईल चुकईल भोग हें कईं घडावें । लागेल भोगावें केलें कर्म केले कर्म तुटे जरी भ्रांति फिटे । दास म्हणे भेटे संतजन
भावार्थ--
या अभंगात संत रामदास कर्मभोग आणि त्याचे परिणाम या विषयाची चर्चा करीत आहेत. त्या साठी ते इंद्राचे उदाहरण देतात. आपले राज्य कोणी तरी बळकावून बसेल असे वाटत असल्याने त्याच्या मनात नेहमीच उद्विग्नता असतं. एखादा बलवान दानव सर्व देवांना काराग्रुहात डांबून इंद्रपद मिळवून बसेल अशी भिती त्याला वाटते. संत रामदास म्हणतात की, देवादिकांना सुध्दा तुरंगवास चुकला नाही तर तो माणसाला कसा चुकणार?सुखदु:खाचे भोग माणसला कदापीही चुकवता येणार नाहीत. आपण जसे कर्म करू तसे भोग आपल्याला भोगावे लागणार असा कर्मसिध्दांत आहे. केलेल्या कर्माचे भोग भोगून संपवल्या नंतरच मनाची भ्रांती फिटते असे स्पष्ट मत येथे संत रामदासांनी व्यक्त केले आहे. ते पुढे असेही म्हणतात की, संतजन भेटल्यावरच ही प्रक्रिया घडून येते.
अभंग १२
तेचि जाणावे सज्जन । जयां शुध्द ब्रह्मज्ञान कर्म करिंती आवडी । फळाशेची नाही गोडी शांति क्षमा आणि दया । सर्व सख्य माने जया हरिकथा निरुपण । सदा श्रवण मनन बोलासारिखें चालणें । हींचि संतांचीं लक्षणें एकनिष्ठ उपासना । अतितत्पर भजना स्वार्थ सांडूनियां देणें । नित्य तेंचि संपादणें म्हणे रामीरामदास । जया नाहीं आशापाश
भावार्थ--
अभंगात संत रामदास सज्जनांची लक्षणे सांगत आहेत. त्यांना शुध्द ब्रह्मज्ञान असते. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता काम करण्याची आवड असते. शांती, क्षमा व दया या विषेश गुणांविषयी त्यांना अत्यंत आस्था असते, हरिकथेचे निरूपण, सतत, श्रवण व मनन करणे ह्यांची आवड असते. संत नेहमीच जसे बोलतात तसेच वागतात. एकनिष्ठपणे उपासना करणे, देवाचे भजनात तत्परता असणे, अत्यंतिक नि:स्वार्थीपणा कोणताही आशपाश नसणे. सतत नित्य वस्तु म्हणजे परमेश्वराची उपासना करणे ही संत सज्जनांची लक्षणें आहेत हे संत रामदास सांगतात.
अभंग १३
जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी । नि:संदेह मनी सर्वकाळ आवडीने करी कर्म-उपासना । सर्वकाळ ध्यानारूढ मन पदार्थांची हानी होतां नये काही । जयाची करणी बोलाऐसी दास म्हणे धन्य सर्वांसी जो मान्य । जयाचा अनन्य समुदाव
भावार्थ--
संत रामदास या अभंगात म्हणतात की, जो मनाने पूर्ण समाधानी असून नि:संदेह असतो तो खरा ज्ञानी असतो. तो आवडीने कर्म उपासनेत रमतो, तोए सर्वकाळ इश्वर चिंतनात मग्न असतो. ज्ञानी संतांकडुन केव्हाही कोणत्याही पदार्थाची हानी होत नाही. ते नहमीच जसे बोलतात तसेच वागतात. ज्यांचा जन-समुदाय खूप मोठा असतो. असे संत सज्ज्न खरोखर धन्य होत.
अभंग १४
जाणावा तो साधु जया पूर्ण बोधू । भूतांचा विरोधू जेथ नाही कल्पनेचा देहो त्या नाही संदेहो । सदा नि:संदेह देहातीत जया नाही क्रोध जया नाही खेद । जया नाही बोध कांचनाचा रामदास म्हणे साधूची लक्षणें । अति सुलक्षणें अभ्यासावी
भावार्थ--
ज्याला नित्य वस्तूचा पूर्ण बोध झाला आहे तो खरा साधु असे समजावे. अशा साधुच्या मनात कोणत्याही प्राणिमात्रांच्या विषयी आकस नसतो. असे साधु केवळ आत्मरूप असतात. ते नेहमी नि:संदेह असून देहातीत असतात. ते राग, लोभ, दु:ख यांच्या पलिकडे असतात. त्यांना धन, कांचनाचा अजिबात मोह नसतो. संत रामदास म्हणतात ही खर्या साधुची लक्षणे असून ती मनापासून अभ्यासावी.
अभंग १५
बोलण्यासारिखे चाले जो सज्जन । तेथें माझे मन विगुंतलें नाही अभिमान शुध्द ब्रह्मज्ञान । तेथे माझे मन विगुंतले वॄत्ति उदासीन स्वधर्मरक्षण । तेथे माझे मन विगुंतलें पूर्ण समाधान सगुण भजन । तेथे माझे मन विगुंतलें दास म्हणे जन भावार्थ संपन्न । तेथे माझे मन विगुंतलें
भावार्थ--
जो सज्जन बोलण्या प्रमाणे वागतो तशी क्रुती करतो, शुध्द ब्रह्मज्ञानी असूनही ज्या सज्जनांना अभिमानाची बाधा नसते, नेहमी उदासिन वॄत्तिने राहून जे धर्म रक्षणासाठी सतत प्रयत्न करतात, पूर्ण समाधानी असून जे आनंदाने सगुणाची उपासना करतात, अशा संताच्या ठिकाणी आपले मन गूंतून राहिले आहे असे संत रामदास या अभंगात सांगतात. शेवटच्या ओळीत तर ते असे म्हणतात की, जे सामान्य जन भावार्थ संपन्न असून भक्तीपुर्ण अंतकरणाने देवाला आळवतात तेथेही आपले मन गुंतून पडते.
अभंग १६
धन्य ते भाविक वंदिती हरिदास । तयां ह्रषीकेश वंदितसे धन्य तें निंदक निंदिती सज्जन । येणें भावें घडे ध्यान त्यांचें धन्य दास दासी सज्जन सेवेसी । ते सुरवरांसी वंद्य होती
भावार्थ--
रामदास म्हणे तरीच धन्य होणें । जरी संग लाधणे सज्जनाचाभावार्थ संत रामदास म्हणतात की, ते भाविक धन्य होत की जे हरिदासांना वंदन करतात. पुढे ते असेही म्हणतात की, जे सज्जनांची निंदा करतात ते निंदक सुध्दा धन्य होत कारण निंदा करण्यासाठी का होईना पण त्यांना सज्जनांचे ध्यान घडते. जे दासदासी सज्जनांची सेवा करतात ते धन्य होत कारण सुरवरच नव्हे तर प्रत्यक्ष ह्रषीकेशी त्यांना वंदन करतात. संत रामदास स्पष्टपणे सांगतात की, सज्जनांची संगति सहवास मिळणे यांतच जिवनाची खरी धन्यता आहे.
अभंग १७
जाणावा तो नर देवचि साचार । वाचे निरंतर रामनाम सगुणी सद्भाव नाही ज्ञानगर्व । तयालागी सर्व सारखेचि निंदकां वंदकां संकटी सांभाळी । मन सर्वकाळी पालटेना पालटेना मन परस्त्रीकांचनी । निववी वचनी पुढिलांसीं पुढिलांसी नाना सुखें देत आहे । उपकारीं देह लावितसे लावितसे देह राम भजनासी । रामीरामदासीं रामभक्त
भावार्थ--
जो वाचेने सतत रामनामाचा जप करीत असतो तो पुरूष देवाचे रुप आहे असे समजावे असे स्षट करुन संत रामदास म्हणतात की, त्यांना सगुण भक्ती आवडते. त्यांच्या ठिकाणी अपपर भाव नसतो. ते सर्वांना सारखेच मानतात. ते पूर्ण ज्ञानी असतात पण त्यांना त्याचा गर्व नसतो. ते मनाने स्थिर असून आपली निंदा किंवा वंदना करणार्या सर्वांना ते संकटात सांभाळतात. ते स्थिरबुध्दी असून स्त्री आणि कांचन यांचा मोह त्यांना पडत नाही. ते केवळ शब्दांनी समोरच्याचे मन शांत करतात, त्यांना नाना सुखें देतात आणि आपला देह परोपकारा करिता खर्च करतात. ते आपला देह रामभजनात झिजवतात. संत रामदास म्हणतात की, रामाचे दास असलेले ते खरे रामभक्त असतात.
अभंग १८
देव अभक्तां चोरला । आम्हां भक्तां सांपडला भेटीं जाली सावकाश । भक्ता न लागती सायास पुढे विवेक वेत्र-पाणी । वारी द्रुश्याची दाटणी रामदासाचे अंतर । देवापाशी निरंतर
भावार्थ--
जे देवापासून विभक्त आहेत अशा अभक्तानीं देव चोरून नेला आहे. परंतू तो आम्हा भक्तांना सापडला आहे कारण प्रेमळ भक्तांना देव शोधून काढण्यासाठी काहीच सायास करावे लागत नाहीत, ते अनायासे देवाची सावकाश भेट घेऊ शकतात. संत रामदास सांगतात की, रामदासांचे मन निरंतर, सदासर्वकाळ रामापाशी गुंतलेले असते.
अभंग १९
ऐसा कोण संत जो दावी अनंत । संदेहाचा घात करुं जाणे आढळेना जया आपुले पारिखें । ऐक्यरूप सुखें सुखावला धन्य तेचि जनीं जें गुणें बोधिले । दास म्हणे जाले पुरुष ते
भावार्थ--
संत रामदास म्हणतात, असा कोण संत आहे की, जो मनातील सर्व शंकांचे निरसन करुन प्रत्यक्ष अनंताचे दर्शन घडवू शकतो. तो असा संत असतो की, ज्याला आपल्या वेगळे असे कोणी दिसतच नाही. तो ऐक्यभावाने जगातील सर्वाशी पूर्णपणे एकरुप झालेला असतो त्यामुळें तो पूर्ण सुखात असतो. सगुण भक्तीने जे अशा प्रकारे सामान्य जनांशी बांधले गेले आहेत ते भाग्याचे पुरुष होत.
अभंग २०
जंव तुज आहे देहाचा संबंध । तंव नव्हे बोध राघवाचा राघवाचा बोध या देहावेगळा । देह कळवळा तेथें नाही नांदतसे सदा जवळी कळेना । कदा आकळेना साधुविण कांहीं केल्या नव्हे साधुसंतांविण । रामदास खूण सांगतसे
भावार्थ--
या अभंगात संत रामदास स्पष्टपणे सांगत आहेत की, जो पर्यंत देहसंग असतो तो पर्यंत राघवाचा बोध होत नाही कारण राघवाचा बोध देहातीत असतो. देहाविषयी मोह, ममत्व असेल तो पर्यंत राघवाचा लाभ होणार नाही. तो सतत आपल्या निकट असूनही त्याचे स्वरुप आपल्याला सत्संगाशिवाय समजू शकत नाही. राघवाचे स्वरूप समजण्यासाठी संतांना शरण जाणे हाच केवळ एकमेव मार्ग आहे. ही खूण संत रामदास सांगत आहेत.