अभंग १
समुदाय काय सांगों श्रीरामाचा । अंतरी कामाचा लेश नाही लेश नाही तया बंधु भरतासी । सर्वही राज्यासी त्यागियेले त्यागियेले अन्न केले उपोषण । धन्य लक्ष्मण ब्रह्मचारी ब्रह्मचारी धन्य मारुती सेवक । श्रीरामी सार्थक जन्म केला जन्म केला धन्य वाल्मीकी ऋषीने । धन्य ती वचने भविष्याची भविष्य पाहता धन्य बिभीषण राघवी शरण सर्व भावे सर्व भावे सर्व शरण वानर धन्य ते अवतार विबुधांचे विबुधां मंडण राम सर्व गुण अनन्य शरण रामदास
भावार्थ--
या अभंगात संत रामदास श्रीरामांच्या निकटवर्तीय समुदाया विषयी बोलत आहेत.राम जेष्ठ पुत्र असूनही त्यांना राज्याधिकार नाकारला जातो हा मोठा अन्याय आहे असे भरताला वाटते.व तो राज्य पदाचा त्याग करतो. असा निष्काम भरत, राजवाड्यातील सर्व सुखांचा, पत्नीचा त्याग करुन रामांबरोबर वनवासात जाणारा व १४वर्षे अन्नत्याग करून उपोषण करणारा लक्ष्मण, सेवेसाठी सदैव तत्पर असणारा व जन्म सार्थकी लावणारा मारुती, भविष्याचा वेध घेऊन रामचरित्र रचणारे प्रतिभाशाली कवी वाल्मिकी, भविष्यावर श्रध्दा ठेवून राघवाला शरण जाणारा रावणबंधू बिभिषण, सर्वभावे रामाला शरण जाणारी वानरसेना, ह्या सर्व ईश्र्वराच्या विभुती असून मी त्यांना अनन्य भावे शरण जातो असे संत रामदास म्हणतात.
अभंग २.
काळ जातो क्षणक्षणा । मूळ येईल मरणा कांहीं धावाधाव करी, जंव तो आहे काळ दूरी । मायाजाळी गूंतले मन, परि हे दुःखासी कारण सत्य वाटते सकळ, परि हे जाता नाही वेळ रामीरामदास म्हणे, आता सावधान होणें.
भावार्थ--
काळ प्रत्येक क्षणी पुढे जात आ मूळ केंव्हा येईल हे सांगता येत नाही.जोवर काळ दूर आहे तोवरच प्रयत्न केले पाहिजेत.संसाराचे मायाजाल हेच दुःखाचे कारण आहे.संसार सत्य वाटत असला तरी तो क्षणभंगूर आहे.रामदास संसाराच्या अनित्यते बद्दल साधकालासावधानतेचा इशारा देत आहेत. व संसाराच्या बंधनापासून मुक्त होण्यासाठी धावाधाव करण्यास सांगत आहेत.
अभंग ३
ऐसा हा मत्सर लागलासे पाठीं । देवा तुझी भेटी केंवि घडे भिन्न उपासना भिन्न संप्रदाव । एकमेकां सर्व निंदिताती पंडितां पंडितां विवाद लागला । पुराणिकां जाला कलह थोर वैदिकां वैदिक भांडती निकुरें । योगी परस्परें भांडताती स्वजाति विजाति भांडण लागलें । दास म्हणे केलें अभिमानें
भावार्थ--
या अभंगात समर्थ रामदास संप्रदायातील मत भिन्नतेबद्दल भाष्य करीत आहेत.येथे भिन्न भिन्न उपासना.भिन्न भिन्न संप्रदाय आहेत.मत्सरापोटी ते एकमेकांची निंदा करतात.पंडितां पंडितां मध्ये पराकोटीचे वादविवाद लागतात.पुराणिकांमध्ये घोर कलह (भांडण ) माजतात.वेद जाणणाय्रा वैदिकांमध्दे निकराचे मतभेद माजतात.योगी परस्परविरोधी बनून वाद घालतात. हे पाहून समर्थ रामदासांना अत्यंत खेद होतो कारण हे सर्व केवळ अभिमानाने घडून येते पण त्याचा परिणाम असा होतो की, भक्त देवाच्या भेटीस पारखा होतो. आपणास देवाची भेटी केंव्ह घडेल असे वाटून तो काकुळतीस येतो.
अभंग ४
देह हे असार क्रुमींचें कोठार । परी येणे सार पाविजे तें देहसंगे घडे संसारयातना । परी हा भजना मूळ देही देहाचेनि संगे हिंपुटी होईजे । विचारें पाविजे मोक्षपद देहसंगें भोग देहसंगे रोग । देहसंगे योग साधनांचा देहसंगे गती रामदासीं जाली । संगति जोडली राघवाची
भावार्थ--
या अभंगात समर्थ रामदास अध्यात्मिक द्रुष्टीकोनातून मानवी देहाचे महत्त्व पटवून देत आहेत. देह हा असार (विनाशी) असून अनेक प्रकारच्या रोगजंतुंचे भांडार आहे. । परंतू या असार देहाचा उपयीग करूनच आपण अविनाशी म्हणजे आत्म तत्वापर्यंत पोहचू शकतो.या देहामुळे संसारात अनेक यातना.शारिरीक व मानसिक दु:खे भोगावी लागतात तरिही देवाचे भजन याच देहामुळे शक्य होते. देहाच्या नश्वरतेमुळे निराश होण्यपेक्षा सारासार विचार करून मोक्षपदाला आपण पोहचू शकतो अशी ग्वाही समर्थ रामदास देत आहेत. देहासंगामुळे अनेक रोग जडतात अनेक भोग भोगावे लागतात, पण या देहामुळेच साधनेचा योग घडतो.या देहामुळेच समर्थांना रामदास म्हणवून घेण्याचे भाग्य प्राप्त झाले.त्यांना राघवाच्या संगतीचा लाभ झाला.असे श्री समर्थ म्हणतात.
अभंग ५
अनित्याचा भ्रम गेला । शुध्द नित्यनेम केला नित्यानित्य हा विचार । केला स्वधर्म आचार देहबुध्दी अनर्गळ । बोधे फिटला विटाळ रामदासी ज्ञान झाले आणि स्वधर्मा रक्षिलें
भावार्थ--
या अभंगात संत रामदास नित्य व अनित्य गोष्टींचा विचार करण्यास सांगत आहेत.अनित्य (क्षणभंगुर) गोष्टींचा निरास करुन मनतील भ्रम दूर करावा असे ते सांगतात.त्यामुळे आपण नित्यानित्य विचार करुन देहबुध्दीचा त्याग करु शकतो.स्वधर्माचे आचरण करण्यासाठी शुध्द नित्यनेमाने आत्मबोध होतो. या आत्मबोधामुळे सोवळे, ओवळे, विटाळ या भ्रामक कल्पना गळून पडतात. संत रामदास म्हणतात की, आपणास असे ज्ञान झाल्या मुळेच आपण स्वधर्माचे रक्षण करु शकलो.
अभंग ६
घात करुनी आपला । काय रडशील पुढिलां बहुत मोलाचें आयुष्य । विषयलोभें केला नाश नाही ओळखिलें सत्या । तेणें केली ब्रह्महत्या रामीरामदास म्हणे । भुलों नको मूर्खपणे
भावार्थ--
केवळ विषय, वासनांच्या लोभामुळे आपण आपले सर्व आयुष्य वाया घालवतो. विषयलोभामुळे आयुष्याचा नाश झाल्यावर पुढे कितीही दु:ख केले, कितीहि रडलो तरी त्याचा काही उपयोग होत नसतो असे सांगून संत रामदास आपणच आपला घात करू नये असा उपदेश करीत आहेत.जो सत्य ओळखू शकत नाहीं तो एकप्रकारे ब्रह्महत्या च करत असतो. मूर्खपणाने सत्य असत्य ओळखण्यात चुक करु नये असा सावधगिरीचा सल्ला ते आपल्याला देत आहेत.
अभंग ७
धातुवरी आला मळ । तेणें लोपलें निर्मळ शेतीं न जाता आउत । तेणें आच्छादिले शेत मुखे न होतां उच्चार । तेणे बुडें पाठांतर नाहीं दिवसाचा विचार । दास म्हणे अंधकार
भावार्थ--
कोणत्याही धातूचा काही दिवस वापर न केल्यास त्यावर गंज चढतो. गंजामुळे धातूची निर्मलता लोप पावते. शेतात बरेच दिवस आउत घातले नाही, शेताची मशागत केली नाही तर तण वाढून सर्व शेत आच्छादून टाकते. पाठ केलेल्या पाठांतराची रोज उजळणी न केल्यास आपण ते विसरून जातो. दिवस उजाडला आहे असा विचार न करता झोपून राहिलो तर संत रामदास म्हणतात की, सगळीकडे अंधारच दिसेतो.
अभंग ८
ऐसा कैसा रे परमार्थ । जळो जळो जिणें व्यर्थ युक्ताहार करवेना । निद्रा आली धरवेना मन चंचळ आवरेना । नीच उत्तर साहवेना रामदास म्हणे भावे । स्थूल क्रियेस नब जावे
भावार्थ--
शरिराला पोषक असलेला योग्य आहार जो घेत नाही, झोप आली असता जो आवरू शकत नाही, आपल्या चंचल मनावर जो संयम ठेवू शकत नाही तसेच इतरांनी केलेली निंदानालस्ती, अपशब्द जो सहन करू शकत नाही. अशा अत्यंत स्थूल गोष्टींवर जो मात करु शकत नाही तो परमार्थ साध्य करु शकणार नाही अशा माणसाचे जिणें व्यर्थ आहे असे संत रामदास मनापासून सांगत आहेत.
अभंग ९
वैद्य भेटला सुखदाता । रोगपालट जाला आतां रस ओतीला कानांत । येउनि झोंबला नयनांत रस भरला सांदोसांदीं । देही पालट जाली बुध्दि दिव्य देही ओतिला रस । गुरु न्याहाळी रामदास
भावार्थ--
या अभंगात वैद्य रुपात सद्गुरू भेटल्यावर दे हात आणि मनात कसे परिवर्तन घडून येते याचे अत्यंत सुरेख वर्णन समर्थ रामदास करीत आहेत.एखादा निष्णात वैद्य भेटताच रोगपालट होतो. हा सुखदाता वैद्य म्हणजे सद्गुरु जो देहबुध्दीतच आमुलाग्र बदल घडवून आणतो.भक्तीचा प्रेमरस कानात ओतल्यावर तो डोळ्यात येऊन उतरतो आणि जगाचे स्वरूपच बदलून जाते. देहबुध्दि लुप्त होऊन सर्वत्र आत्मस्वरुप भरून राहते.हा दिव्यरस देहाच्या कणाकणात झिरपून भवरोग समूळ नाहिसा करतो, मन सुखावते.आपल्या या सद्गुरुला संत रामदास डोळे भरुन पाहतात.
अभंग १०
प्रव्रुत्ति सासुर निव्रूत्ति माहेर । तेथे निरंतर मन माझे माझे मनी सदा माहेर तुटेना । सासुर सुटेना काय करुं काय करूं मज लागला लौकिक । तेणें हा विवेक दुरी जाय दुरी जाय हित मज चि देखतां । यत्न करूं जातां होत नाहीं होत नाहीं यत्न संतसंगेविण । रामदास खुण सांगतसे
भावार्थ--
संत रामदास या अभ़ंगात म्हणतात की, निव्रुती हे माझे माहेर असून तेथे माझे मन ओढले जाते. मनातून माहेरची आठवण जात नाही. परंतु प्रव्रूत्ति हे सासर असून त्या पासून सुटका करून घेता येत नाही. लौकिकाला टाळता येत नाही. त्यामुळे मनात निव्रूत्तिचा विवेक टिकवून धरता येत नाही. प्रयत्न करुनही मन या निव्रूत्ति च्या मार्गाने पुढे जात नाही. माझ्या डोळ्यांदेखत माझे हित दूर जात आहे.मनाच्या या द्विधा अवस्थेत असताना सुध्दा संत रामदासांचे विचारी मन अवस्थेतून सुटण्यासाठी प्रयत्न करते आणि संतसंगति शिवाय कोणतेही प्रयत्न सफल होणार नाहीत अशी ग्वाही देते. संतसंगति हीच निवृत्ती मार्गाची खूण आहे असे संत रामदास स्पष्टपणे सांगतात.