रामदासांचे अभंग - १४१ ते १५०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला,
समर्थ रामदास स्वामींचे अभंग भावार्थासहित.


अभंग--१४१

कृपा पाहिजे । राघव कृपा पाहिजे मन उदासिन इंद्रियदमन । तरिच लाहिजे निंदक जनीं समाधानी । तरिच राहिजे दास निरंतर नीच उत्तर । तरिच साहिजे

भावार्थ--

या अभंगात संत रामदास राघवाची कृपा पाहिजे असे म्हणतात. मनातील विषय वासनांचा निरास होऊन मन उदासीन होण्यासाठी, इंद्रियांवर संयम ठेवून त्यांचे दमन करण्याची शक्ती येण्यासाठी, निंदा करणार्‍या लोकांमध्ये राहून सुद्धा समाधानी वृत्तीने जगण्यासाठी, लोकांनी केलेली निंदा हेटाळणी सहन करण्याची सहनशीलता येण्यासाठी, रामाची कृपा पाहिजे असे संत रामदास सांगतात.

अभंग--१४२

नामचि कारण रे । महाभय नामें निवारण रे नामें होय चित्त शुध्दि । नामें होय दृढ बुध्दि नामें महा दोष जाती । पुढें संताची संगति रामदास सांगे खूण । नाम सिध्दांचें साधन

भावार्थ--

संत रामदासांनी या अभंगात नामाचा महिमा सांगितला आहे.  मृत्युचें महाभय निवारण करण्यासाठी, चित्त शुद्ध होऊन बुद्धी दृढ होण्यासाठी, संतांची संगती मिळवून महा दोषांचे निवारण होण्यासाठी नाम हेच एकमेव साधन आहे संत रामदास सांगतात की, रामनाम हे सिद्धांचे साधन आहे.  अखंड रामनामाचा जप ही सिध्दांची खूण आहे.

अभंग--१४३

श्रीगुरुंचे चरणकंज हृदयीं स्मरावें निगमनिखिल साधारण । सुलभाहुनि सुलभ बहू इतर योग याग विषमपथीं कां शिरावें नरतनु दृढ नावेसी । बुडवुनी अति मूढपणें दुष्ट नष्ट सुकर-कुकर तनू कां फिरावें रामदास विनवि तुज । अझुनि तरी समज उमज विषयवीष सेवुनियां फुकट कां मरावें

भावार्थ--

या अभंगात संत रामदास गुरु भक्तीचा महिमा सांगताहेत.  वेद, वेदांत, योग, याग या कठीण मार्गांचा अवलंब करण्यापेक्षा अत्यंत सहज सोपा असा गुरु वचनावर दृढ विश्वास ठेवून, गुरु चरणांचा आश्रय घ्यावा.  संसारसागर तरून जाण्यासाठी नरदेहाची बळकट नौका लाभली असताना मूर्खपणाने तिला विषय वासनेत बुडवून नीच योनींत जाण्याचा धोका पत्करू नये. संत रामदास विनंती करीत आहे की आपण हे समजून घेऊन त्याप्रमाणे वागले पाहिजे.

अभंग --१४४

त्रिविध तापहारक हे गुरुपाय । भवसिंधूसि तारक हे गुरुपाय स्वात्मसुखाचें बीज हे गुरुपाय । ज्ञानाचें निजगुज हे गुरुपाय भक्तिपंथासि लाविती हे गुरुपाय । नयनिं श्रीराम दाविती हे गुरुपाय सहज शांतीचें आगर हे गुरुपाय । सकल जीवासी पावन हे गुरुपाय

भावार्थ

आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक या त्रिविध तापां पासून सुटका करणारे, संसार सागरातून तारून नेणारे हे गुरुचरण आहेत. गुरु चरण हे आत्मसुखाचे बीज असून ज्ञानाचे भांडार आहे. साधकांना भक्ती पंथाला लावणारे, डोळ्यांना श्रीरामाचा साक्षात्कार घडवणारें गुरुचरण शांतीचे आगर व कृपेचे सागर आहेत. सकल जीवांना पावन करणारे गुरुचरण रामदासांचे जीवन आहे, असे संत रामदास म्हणतात.

अभंग--१४५

आतां तरी जाय जाय जाय । धरिं सद्गुरुचे पाय संकल्प विकल्प सोडूनि राहें । दृढ धरुनियां पाय पाय पाय नामस्मरण ज्या मुखीं नाहीं । त्याणें वांचुनी काय काय काय मानवतनु ही नये मागुती । बरें विचारुनि पाहें पाहें पाहें आत्मानात्म विचार न करितां व्यर्थ प्रसवली माय माय माय सहस्र अन्याय जरी त्वा केले । कृपा करिल गुरुमाय माय माय रामदास म्हणे नामस्मरणें । भिक्षा मागुनि खाय खाय खाय

भावार्थ--

ज्यांच्या मुखात राघवाच्या नामाचा जप नाही त्याचे जीवन व्यर्थ होय. मानव जन्म हा परत परत मिळणार नाही तो दुर्लभ आहे.  या जन्मात आत्मा व अनात्मा अविनाशी व विनाशी यांचा विचार केला नाही तर हा जन्म मातेला कष्ट देणारा, व्यर्थ ठरतो.  साधकाचे हजार अपराधांना गुरुमाऊली क्षमा करते व त्याच्यावर कृपा करते.  नामस्मरण करून भिक्षा मागून खाल्याने सुद्धा जीवनाचे सार्थक होईल असे संत रामदास सांगतात.  आत्‍ताच बोध घेऊन मनातील सर्व भेदाभेद, संशय, संकल्प-विकल्प यांचा त्याग करून गुरुंना शरण जावे, त्यांचे पाय धरावे

अभंग--१४६

करीं सीताराम मैत्र । होईल देह तुझा पवित्र वरकड भिंतीवरील चित्र । का भुललासी कांरे बैसलास निश्चळ । करशिल अनर्थास मूळ सांडुनी विश्रांतीचे स्थळ कां भुललासी मुख्य असू द्यावी दया । नाहीतर सर्व हि जाईल वायां मिठी घाली रामराया । कां भुललासी करशिल डोळ्याचा अंधार । पाहें जनासी निर्वैर सांडीं धन संपत्तीचे वारें । कां भुललासी रामदासाचें जीवन । तू कां न करिसी साधन राम तोडिल भवबंधन । कां भुललासी

भावार्थ--

या अभंगात रामदास सितारामशी सख्य म्हणजे मैत्री जोडण्यास सांगत आहेत.  त्यामुळे साधकाचा देह पवित्र होईल असे ते म्हणतात. बाह्यजगातील कल्पनेच्या चित्रांना भुलून निश्चल बसणे हे अनर्थाचे मूळ आहे. रामचरण हे अंतिम विश्रांतीचे ठिकाण आहे. धन संपत्तीचा मोह सोडून देऊन कुणाशीही वैरभाव न ठेवता दया पूर्ण व्यवहार असावा, नाहीतर या सर्व गोष्टी वाया जातील.  श्रीराम हे रामदासांचे जीवन आहे त्यासाठी साधना केल्यास श्रीराम हे संसाराचे बंधन तोडून टाकतील.

अभंग--१४७

सुखदायक गायक नेमक साधक तो असावा हरिभक्त विरक्त संयुक्त विवेकी तो भजावा

भावार्थ--

सुरेल सुखदायक गायन करणारा गायक, अखंडपणे साधना करणारा साधक, विवेक आणि वैराग्य असलेला हरिभक्त यांचे भजनी लागावे असे संत रामदास या अभंगात सांगतात.

अभंग--१४८

प्रपंच दु:खाचा द्रुम । वाढला चुंबित व्योम तेथें पाहती संभ्रम । सुखाची फळें सदा फळ आभासे । पाड लागला दिसे परि तो निष्फळ भासे । पाहतां देठी तयावरी दोनी पक्षी । एक उदास उपेक्षी येर तो सर्वत्र भक्षी । परि न धाये सेवितां तयाची छाया । तापली परम काया तरी ही बैसती निवाया । आत्मरुप प्राणी रामी रामदासी लक्ष । तोचि जाला कल्पवृक्ष सेवी सज्जन दक्ष । स्वलाभे पूर्ण

भावार्थ--

प्रपंच हा दुःखाचा झपाट्याने वाढणारा गगनचुंबी वृक्ष आहे.  त्याला सुखाची फळे लागतील हा केवळ भ्रम आह.  त्यावर फळे आल्याचा भास निर्माण होतो ती पाडाला लागली आहेत असेही वाटते. परंतु मुळात बघितले तर तो निष्फळ आह.  या झाडावर दोन पक्षी वस्ती करून आहेत.  एक अत्यंत उदासीन असून पूर्णपणे निरपेक्ष आहे.  दुसरा पक्षी कडू-गोड सर्वच फळे सेवन करतो व त्याचे कशानेच समाधान होत नाही.  या वृक्षाच्या सावलीचा आश्रय घेणारे दुःखाने होरपळून निघतात.  तरीही आत्मरूप प्राणी त्याचा निवारा शोधतात. संत रामदास म्हणतात या वृक्ष संत जणांसाठी तो कल्पवृक्ष होतो व त्यांना त्याचा पूर्ण लाभ मिळतो.

अभंग--१४९

ज्ञान पवाड पवाड गगनाहुनी वाड । मुक्ति जाड रे जाड रे अत्यंतचि जाड भक्ति गोड रे गोड रे मुक्तिहुनी गोड । पुरे कोड रे कोड रे नाही अवघड दास म्हणे रे म्हणे रे दास्यत्व करावें । भक्तियोगे रे योगे रे जन उध्दरावे दया देवाची देवाची सर्वत्रीं पुरावें वृत्ति संमंधें संमंधें कांहींच नुरावें

भावार्थ--

अज्ञान हे आकाशासारखे असीम, अनंत आहे. मुक्ती अतिशय बळकट आहे पण भक्ति ही मुक्तीपेक्षा गोड आहे.  अत्यंत सहज साध्य व सर्व अपेक्षा पूर्ण करणारी आहे संत रामदास म्हणतात, श्री रामाचे दास्यत्व करावे आणि भक्ती भावाने लोकांचा उद्धार करावा. देवाची दया सर्वांना मिळावी कुणीही उपेक्षित राहू नये.

अभंग--१५०

नाना पिकाची भोय । वाहिल्याविण जाय शोधल्याविण उपाय । व्यर्थचि होय नाना औषधें घेतो । पथ्य न करितो तैसा वचनें करितो । परि वर्तेना तो रामदास म्हणे । भीकचि मागणें आणि वैभव सांगणें । तैसें बोलणें

भावार्थ-- पीक येण्यासाठी बी पेरले पण त्याची योग्य निगराणी केली नाही तर सर्व काही व्यर्थ जाते.  रोग निवारण्यासाठी अनेक औषधे घेतली परंतु पथ्य सांभाळले नाही त्याप्रमाणेच स्वतःच्या वैभवाच्या गोष्टी बोलणारा भीक मागून जगू लागला.  संत रामदास म्हणतात प्रत्यक्ष करणे शिवाय बोलणे व्यर्थ आहे.  उपाय शोधल्याशिवाय सर्व प्रयत्न वाया जातात.

N/A

References : N/A
Last Updated : March 11, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP