रामदासांचे अभंग - २२१ ते २३०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला,
समर्थ रामदास स्वामींचे अभंग भावार्थासहित.


अभंग---२२१

पृथ्वी अवघीं लिंगाकार । अवघा लिंगाचा विस्तार ॥ आतां कोठें ठेवूं पाव । जेथे तेथे महादेव ॥ अवघा रुद्रची व्यापिला । ऐसे देवचि बोलिला ॥ दासे जाणोनिया भला । देह देवार्पण केला॥

भावार्थ---

संत रामदास म्हणतात, ही सर्व पृथ्वी लिंगाचा विस्तार असल्याने लिंगाकार आहे. सर्व स्थळे महादेवाने व्यापलेली आहेत, एकच रूद्र सगळीकडे व्यापून राहिला आहे, पाय ठेवायला देखील जागा नाही. हे देवाचे वचन आहे असे जाणून आपण आपला देह त्या सर्वव्यापी परमेश्वराला अर्पण केला.

अभंग---२२२

देव शिवाचा अवतार । जाउनि बसला गडावर ॥ एक निळ्या घोड्यावर । एक ढवळ्या नंदीवर ॥ एका विभूतीचे लेणें । एका भंडारभूषणें ॥ रामदासी एक जाला । भेदभाव तो उडाला ॥

भावार्थ---

देव खंडोबा शिवाचा अवतार असून तो जेजुरीच्या गडावर वास्तव्य करुन आहे, खंडोबा एका निळ्या घोड्यावर स्वार झाले आहेत तर शिवशंकर धवल नंदीवर विराजमान झाले आहेत. एक महान विभूतीचे लेणे असून भंडारा हे भूषण मानतात. संत रामदास भेदभाव विसरून त्यांच्याशी एकरूप झाले आहेत.

अभंग---२२३

सोरटीचा देव माणदेशी आला । भक्तीसी पावला सावकाश ॥ सावकाश जाती देवाचे यात्रेसी होति पुण्यराशी भक्तिभावें ॥ भक्तिभावे देवा संतुष्ट करावें संसारी तरावें दास म्हणे ॥

भावार्थ---

सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथ भाविकांच्या भक्तिप्रेमामुळे महाराष्ट्रातिल माणदेशी आला आणि सावकाश भक्तांना पावन केले. जे एकाग्रचित्तानें सावकाशपणे यात्रेला जातात ते मनातिल भक्तिभावामुळे पुण्यराशी बनतात. संत रामदास म्हणतात भक्तांनी आपल्या प्रेमभावाने देवाला संतुष्ट, प्रसन्न करावे आणि हा संसार सागर तरून जावा, जन्म मरणाच्या वारीतून आपली सुटका करून घ्यावी.  

अभंग---२२४

अनंत युगाची जननी । तुळजा रामवरदायिनी । तिचे स्वरूप उमजोनी । समजोनि राहे तो ज्ञाता ॥ शक्तिविणें कोण आहे । हें तो विचारूनि पाहे । शक्तिविरहित न राहे । यशकीर्त्तिप्रताप ॥ शिवशक्तिचा विचार । अर्धनारीनटेश्वर । दास म्हणे हा विस्तार । तत्वज्ञानी जाणती ॥

भावार्थ---

श्रीरामाला वर देणारी तुळजापूरची भवानी अनंत युगाची माता आहे.  तुळजाभवानीचे खरे स्वरूप जो जाणून घेतो आणि सतत लक्ष्यांत ठेवतो तो खरा जाणकार (ज्ञाता ) समजावा, या जगांत कोणती गोष्ट शक्तिशिवाय राहू शकते असा विचार केल्यास यश, किर्ति, पराक्रम या पैकी एकही गोष्ट शक्तिशिवाय राहू शकत नाही असे ल्क्ष्यांत येते.  शिव आणि शक्ति म्हणजेच अर्धनारी नटेश्वर होय. हे विश्व शिवशक्तिचाच विस्तार आहे हे तत्वज्ञानी लोक जाणतात असे संत रामदास या अभंगात स्पष्ट करतात.  

अभंग---२२५

सोहं हंसा म्हणिजे तो मी मी तो ऐसे । हे वाक्य विश्वासे विवरावें ॥ विवरावें अहंब्रह्मास्मि वचन । ब्रह्म सनातन तूंचि एक ॥ तूंचि एक ब्रह्म हेचि महावाक्य । परब्रह्मीं ऐक्य अर्थबोध ॥ अर्थबोध रामीरामदासीं जाला । निर्गुण जोडला निवेदनें ॥

भावार्थ---

संत रामदास साधकाने निर्गृण भक्ती कशी साध्य करावी या विषयी सांगत आहेत.  सोहं म्हणजे मी परमात्म्याचा अंश असून तो म्हणजेच मी व मी म्हणजेच तो या वाक्याचा खोलवर विचार करून चिंतन करावे.  सनातन (अनंत काळापासून चालत आलेले) ब्रह्म तूच आहेस हे महावाक्य असून आत्मा परमात्मा एकरूप आहेत हाच अर्थबोध होतो, संत रामदासांना हा अर्थबोध झाला आणि ते निर्गुणासी जोडले गेले.

अभंग---२२६

मायेभोवती भोंवावें तरी तिने कुरवाळावें ॥ संत एकटा एकला । एकपणाहि मुकला ॥ त्यासी माया असोनि नाहीं ॥ आपपर नेणें काहीं ॥ रामीरामदासी माय । व्याली नाहीं चाटिल काय ॥

भावार्थ---

संत रामदास साधकांना सांगतात, आपण मायेभोवती फेर धरला तरच ती आपल्याला कुरवाळून बंधनांत पाडते, संत मायेच्या बंधनापासून अलग एकटे असतात म्हणून परमेश्वराशी एकरूप होतात व त्यांच्या एकांताचा सुध्दा अंत होतो, त्यांच्या दृष्टीने माया असून नसल्या सारखीच असते.  हे स्पष्ट करण्यासाठी संत रामदासांनी एक अगदी समर्पक उदाहरण दिले आहे, रामदासी माय जर व्यालीच नाही तर वासराला चाटण्याचा मोहच नाही.  संसारापासून मुक्त असलेले संत संसाराच्या मोह बंधनात अडकत नाहीत हेच ते स्पष्ट करतात.  

अभंग---२२७

दृश्य सांडूनियां मागें । वृत्ति गेली लागवेगें ॥ माया सांडूनी चंचळ । जाला स्वरूपीं निश्चळ ॥ कांहीं भासचि नाडळे । वृत्ति निर्गुणीं निवळे ॥ चराचरातें सांडिलें । बहुविधें ओलांडिलें ॥ अवघें एकचि निर्गुण । पाहे वृत्तिच आपण ॥ रामदास सांगे खूण । वृत्ति तुर्येचें लक्षण ॥

भावार्थ---

या अभंगात संत रामदास वृत्तिची निवृत्ति कशी होते या विषयी बोलत आहेत.   संसाराचा दृश्य पसारा सोडून वृत्ति वेगानें नघून जाते तेव्हा साधक चंचळ माया सोडून ईश्वर स्वरुपाशी स्थीर होतो, सारे भास विरून जातात आणि वृत्ति निर्गुणामध्ये मिसळून जाते.  मायेचे सर्व पाश ओलांडून, चराचर सृष्टीच्या पलिकडील निर्गुणाशी एकरुप होते.   साधक केवळ वृत्तिरुपाने उरतो, हिच तुर्यावस्था होय असे संत रामदास म्हणतात,

अभंग---२२८

ज्याचे नाम घेसी तोचि तूं आहेसी । पाहे आपणासी शोधूनियां ॥ शोधितां शोधितां मीपणचि नाहीं । मीपणाचें पाही मूळ बरें ॥

मूळ बरें पहा नसोनियां राहा  ।

आहां तैसें आहां सर्वगत ॥ सर्वगत आत्मा तोचि तूं परमात्मा । दास अहं आत्मा सांगतसे ॥

भावार्थ---

साधक स्वता:चा शोध घेत असतांना त्याला मी पणा कोठे सापडतच नाही, मी पणाचे मूळ न सापडल्याने मी पणाच नाही अशी त्याची धारणा होऊन आपण सर्व ठिकाणी व्यापलेले आत्मतत्व आहोत याचा साक्षात्कार होतो.  सर्वत्र व्यापून असलेला आत्मा हाच परमात्मा असून तोच तूं आहेस असे संत रामदास सांगतात.  मी देह नसून अविनाशी आत्मतत्व आहोत हे जाणून घेतले पाहिजे.  

अभंग---२२९

दिसें तें नासेल सर्वत्र जाणती । या बोला व्युत्पत्ति काय काज ॥ काज कारण हा विवेक पाहिजे । तरीच लाहिजे शाश्वतासी ॥ शाश्वतासी येणें जाणें हें न घडे । आकार न मोडे दास म्हणे ॥

भावार्थ---

जे जे डोळ्यांना दिसते ते सर्व नाशवंत आहे हे सर्वजण जाणतात, त्या साठी विशेष व्याकरण पटुत्वाची गरज नाही.  प्रत्येक घटनेला कांहीतरी कारण असते तसेच घडणाय्रा प्रत्येक घटनेचा परिणाम अटळ असतो हे जाणून घेतले तरच शाश्वत आणि अशाश्वत गोष्टींचा उलगडा होतो. संत रामदास म्हणतात, आकाराला आलेली प्रत्येक वस्तु बदलत असते, नाश पावते आणि परत वेगळ्या स्वरूपांत निर्माण होते.  शाश्वतासी बदल किंवा विनाश संभवत नाही.

अभंग---२३०

छायेमाजी छाया लोपे । तरि काय परूष हारपे ॥ तैसा देह लोपतां । कदा न घडे मरण ॥ खेळाअंतीं डाव हारपत । तरी कां नटासि आला मृत्य ॥ रामदासी रामीं राम । जन्म मरण कैंचा भ्रम ॥

भावार्थ---

जन्म मरण हा केवळ मनाचा खेळ किंवा भ्रम आहे हे पटवून देण्यासाठी संत रामदास अत्यंत समर्पक उदाहरणे देतात.  ज्या प्रमाणे सावली हा छाया प्रकाशाचा खेळ आहे, त्या प्रमाणे जन्म मृत्यू हा मनाचा खेळ आहे.  रंगभुमीवर काम करणारा नट नाटकातील कथेप्रमाणे हरपला तरी तो नट मरण पावला असे होत नाही. देहाचा लोप झाला तरी मरण आले असे नाही कारण मी देह नसून आत्मस्वरुप आहे हे ज्याने जाणले तो अमर झाला.  

N/A

References : N/A
Last Updated : March 11, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP