अभंग---२११
जें कां चैतन्य मुसावलें विटेवरी वासांवलें ॥ तो हा विठ्ठल उभा राहे । समचरणीं शोभताहे ॥ रामीरामदासीं पाहिलें । विठ्ठल आत्मया देखिलें ॥
भावार्थ---
विठ्ठलाचे विटेवरील रूप पाहून वाटते कीं, प्रत्यक्ष चैतन्य मुशीमध्ये ओतून हे रुपडे साकार झाले आहे. विटेवर समचरणीं उभा असलेला पांडुरंग शोभून दिसत आहे असे सांगून संत रामदास म्हणतात, विठ्ठलाच्या स्वरूपांत प्रत्यक्ष आत्मरूपच पाहिलें.
अभंग---२१२
माझें मानस विटेवरी । विठ्ठलचरणीं निरंतरीं ॥ पंढरपुरीं मनोरथ ज्याचा । धन्य धन्य तो देवाचा ॥ जो जो पंढरीस गेला । तेणे कळिकाळ जिंकिला ॥ रामदास म्हणे पंढरी । साधनेविण तारी ॥
भावार्थ---
विटेवरील विठ्ठलाच्या चरणांशीं आपले मन सदा सर्वकाळ गुंतून राहिलें आहे. पंढरपुरीच्या विठ्ठलाच्या भेटीची ज्याला आस लागली आहे तो दैवी भक्त असून धन्य होय, जो भक्त पंढरीची वारी करतो त्याला कळिकाळाचे भय नाही, त्याची जन्म-मरणाची वारी चुकते. संत रामदास म्हणतात, कोणत्याही साधनेशिवाय पंढरीची वारी भाविकांना तारून नेते.
अभंग---२१३
लांचांवोनि भक्तिलोभा । असे वाळवंटीं उभा । पदकी इंद्रनीळशोभा । दिशा प्रभा उजळती ॥ भक्तें पुंडलिकें गोविला । जाऊं नेदी उभा केला । विटें नीट असे ठाकला । भीमातीर वाळुवंटीं ॥ केवढें भाग्य पुंडलिकाचें । उभें दैवत त्रिलोकींचें । की जें तारूं भवसागरींचें । भीमातीरीं विनटलें ॥ एकें पुंडलिकें करुनी जोडी । आम्हा दिधली कल्पकोडी । तुटली संसारसांकडी । रामदास म्हणतसे ॥
भावार्थ---
भक्तांच्या भक्तिप्रमासाठीं वेडा झालेला पांडुरंग चंद्रभागेच्या वाळवंटांत उभा आहे. पांडुरंगाच्या गळ्यामधील वैजयंती माळेच्या पदकाच्या निळसर प्रभेच्या तेजानें सर्व दिशा उजळून निघाल्या आहेत. भक्त पुंडलिकाच्या भक्तीप्रेमाने पांडुरंग बंधनांत पडला आहे. विटेवर समचरणांत उभाआहे, हे भक्तिप्रेम डावलून जाऊ शकत नाही. भक्त पुंडलिकाचे भाग्य एव्हढें मोठे आहे की, त्रिलोकेचे दैवत त्याच्यासाठी तिष्ठत उभे आहे. संत रामदास म्हणतात, संसारसागर तारून नेणारे पांडुरंग रुपी तारू भीमेतिरी शोभून दिसत आहे. पुंडलिकाच्या भाग्यामुळे आपल्याला पांडुरंगाच्या कृपा प्रसादाचा चिरंतन लाभ झाला आहे आणि संसार बंधनाची साखळी तुटून पडली आहे.
अभंग---२१४
कांहीं बोल रे विठ्ठला । मौन वेष कां धरिला ॥ काय मागतों गांठोडी । बोलसीना धरली गुडी ॥ आशा वैभवाची नाही । भिऊं नको वद कांहीं ॥ नलगे मज धन दारा । वेगे लोचन उघडा ॥ दास म्हणे वर पाहे । कृपा करूनी भेटावें ॥
भावार्थ---
संत रामदास या अभंगात विठ्ठलाला आळवित आहेत. विठुराया आपल्याशी बोलत नाही, मौनरुप धारण केले असून मुखांत गुळणी धरली आहे. आपण विठुरायाकडे मौल्यवान धनाचे गाठोड, वैभव, पत्नी यापैकीं कांहीच मागत नाही. तेव्हां न घाबरता त्यांनी आपले डोळे उघडून कृपादृष्टीने पहावें, एकदां तरी भेटावे अशी कळकळीची विनंती संत रामदास विठ्ठलाला करीत आहेत.
अभंग---२१५
सोनियाचा दिवस जाला । पांडुरंग रंगी आला ॥ मनी आतां सावध होई । प्रेमरंगी रंगुनि राहीं ॥ बोल कैसा सुपरित कांहीं । अनुसंधान विठ्ठलपायीं ॥ दास म्हणे हेचि युक्ती । एक देवासी चिंतिती ॥
भावार्थ---
आज सोनियाचा दिवस आला आहे कारण आज पांडुरंग रिंगणांत आले असून भक्तां सोबत रंगात आले आहेत. आतां सावध चित्ताने या प्रेमरंगात रंगून जावे, विठ्ठलाच्या पायीं सारे लक्ष केंद्रीत करुन एकाग्रतेनें लीन होऊन रहावें संत रामदास सागतात, देवाचे चिंतन करण्याची ही एकच युक्ती आहे.
अभंग---२१६
आम्ही देखिली पंढरी । सच्चिदानंद पैलतीरीं ॥ भावभक्ति श्रवण मनन । निदिध्यास साक्षात्कारपण ॥ चिच्छक्ति धर्मनदी । तरलों ब्ह्मास्मिबुध्दि ॥ तेथिंचा अहंकार तेंचि पोंवळी । त्यजोनी प्रवेशलों राउळीं ॥ रामदासी दर्शन जालें । आत्म्या विठ्ठलातें देखिलें ॥
भावार्थ---
या अभंगांत संत रामदास आपणास पंढरीच्या आत्मारुप विठ्ठलाचे दर्शन कसे घडले याचे वर्णन करीत आहेत. चिच्छत्ति धर्मनदी तरून जाण्यासाठी अहंम् ब्ह्मास्मि या वचनाचा उपयोग करावा लागला. त्यासाठी भावपुर्ण भक्तिची, श्रवण मननाची आणि निदिध्यास यांची कास धरावी लागली. या उपासनेनंतर साक्षात्काराचे वरदान मिळाले. या साक्षात्कारीपणामुळे निर्माण झालेला अहंकार म्हणजे या धर्मनदीतील मोल्यवान पोवळी, त्यांचा त्याग करुन पैलतीरावरील मंदिरांत प्रवेश केला आणि सच्चिदानंद परमेश्वराचे दर्शन घडलें. प्रत्यक्ष आत्मरूप विठोबा डोळ्यांनी बघावयास मिळाला.
अभंग---२१७
राम अयोध्येचा वासी । तोचि नांदे द्वारकेसी ॥ कृष्ण नामातें धरिलें । बहु दैत्य संहारिँलें ॥ सखया मारुतीलागुनी । रूप दावी चापपाणी ॥ पुढे भूभार उतरिँला । पांडवासी सहाय जाला ॥ आतां भक्तांचियासाठी । उभा चंद्रभागेतटी ॥ राम तोचि विठ्ठल जाला । रामदासासी भेटला ॥
भावार्थ---
श्रीराम अयोध्येचा राजा, त्याने आपला परमभक्त मारुतिला आपले धनुष्यबाणधारी रुप दाखवलें. तोच द्वापारयुगांत कृष्ण हे नाम धारण करून द्वारकेंत नांदत होता. पृथ्वीवरील दुष्ट, पापी राक्षसांचा संहार करून भूभार हलका केला, पांडवांचे राज्य कपटाने हरण करणार्या कौरवांचा संहार करण्यासाठी त्यांचा साह्यकर्ता झाला. आणि आतां कलियुगांत भोळ्याभाविक भक्तांसाठी चंद्रभागेतटी कर कटीवर ठेवून उभा आहे. संत रामदास म्हणतात श्रीराम हाच विठ्ठल होऊन आपणास भेटला,
अभंग---२१८
सहज बरवा सहज बरवा । सहज बरवा विठोबा माझा ॥ सहज सांवळा दिगंबर । सहज कटीं कर ठेऊनि उभा ॥ रामीरामदास म्हणे । सहज अनुभव तोचि जाणे ॥
भावार्थ---
सावळ्यारंगाचा, दिशा हेंच वस्त्र ज्याने परिधान केले आहे असा आपला विठोबा दोन्ही कर कटीवर ठेवून विटेवर सहजपणे उभा आहे. श्रीरामाचे दास रामदासस्वामी म्हणतात, सहजपणे आपोआप येणार्या अनुभूती फक्त तोच विठोबा जाणू शकतो.
अभंग---२१९
शंकर--खंडोबा--भैरव नमो नमो सदाशिवा । गिरिजापति महादेवा ॥ शिरी जटेचा हा भार । गळां वासुकीचा हार ॥ अंगा लावूनिया राख । मुखी रामनाम जप । ॥ भक्ता प्रसन्न नानापरी । अभंयकर ठेऊनि शिरी ॥ दास म्हणे शिवशंकरा । दुबळ्यावरी कृपा करा ॥
भावार्थ---
मस्त्कावर जटांचा भार असलेला, गळ्यामध्यें वासुकी नावाच्या सापाचा हार घातलेला, अंगाला राख फासून सदासर्वकाळ रामनामाचा जप करणारा, भोळ्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांच्या मस्तकावर आपला अभंयंकर कर ठेऊन आशिर्वाद देणारा अशा गिरिजापती सदा पवित्र, महादेवाला नमन करून संत रामदास शिवशंकराला आपल्यासारख्या दुबळ्या भक्तावर कृपा करावी अशी विनंती करीत आहेत.
अभंग---२२०
माझा कुळस्वामी कैलासीचा राजा । भक्ताचिया काजा पावतसे पावतसे दशभुजा उचलून । माझा पंचानन कैवारी ॥ कैवारी देव व्याघ्राच्या स्वरूपें । भूमंडळ कोपें जाळूं शके जाळूं शके सृष्टि उघडितां दृष्टी । तेथें कोण गोष्टी इतरांची इतरांची शक्ति शंकराखालती । वांचविती क्षिती दास म्हणे
भावार्थ---
आपल्या कुळाचा स्वामी कैलासीचा राजा शिवशंकर याचा महिमा या अभंगांत संत रामदासांनी वर्णन केला आहे. पंचानन (पाच मुखे असलेला )शंकर आपल्या दहा भुजा उचलून भक्तांचे रक्षण करून त्यांचे मनोरथ पूर्ण करतो. तो भक्तांचा कैवारी असून वाघाच्या स्वरूपांत सर्व भूमंडळ केवळ एका द दृष्टीक्षेपात जाळू शकतो, सर्व सृष्टी डोळे उघडतांच जाळून राख करण्याचे सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे. शिवशंकराच्या सामर्थ्याची तुलना इतर कोणत्याही देवदेवतांशी होऊ शकणार नाही. पृथ्वीचे पालन करणारे श्री विष्णुं सुध्दा महादेवाची बरोबरी करु शकणार नाही असा विश्वास संत रामदास व्यक्त करतात.