रामदासांचे अभंग - १०१ ते ११०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला,
समर्थ रामदास स्वामींचे अभंग भावार्थासहित.


अभंग--१०१

कल्पनेच्या देवा कल्पनेची पूजा । तेथें कोणी दुजा आढळेना आढळेना देव आढळेना भक्त । कल्पनेरहित काय आहे आहे तैसे आहे कल्पना न साहे । दास म्हणे पाहे अनुभवें

भावार्थ--

भक्त आपल्या मनात आवडणार्‍या देवाची कल्पनेने मूर्ती साकार करतो आणि कल्पनेनेच कल्पनेतल्या देवाची षोडशोपचारे पूजा करतो. प्रत्यक्षात देव व भक्त दोन्हीही आढळत नाही कल्पनेशिवाय काहीच घडत नाही. संत रामदास म्हणतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहावा.

अभंग --१०२

विदेशासी जातां देशचि लागला । पुढें सांपडला मायबाप सर्व देशीं आहे विचारें पाहतां । जाता न राहता सारिखाची व्यापुनियां दासा सन्निधचि असे । विचारें विलसे रामदासीं

भावार्थ--

देशत्याग करुन विदेशात जाण्याचे ठरवले तर पुढेही आपलाच देश लागला. आणखी मार्गक्रमणा केले तरी आपलेच मायबाप आढळले.  विचार केला तर सर्व देश सारखेच आहेत हे लक्षात आल. सगळीकडे एकच तत्व व्यापून आहे हा विचार या अभंगात संत रामदास साधकांचे.

अभंग --१०३

मनाहूनि विलक्षण । तेंचि समाधिलक्षण नलगे पुरुनी घ्यावें । नलगे जीवेंचि मरावे अवघा वायु आटोपावा । नलगे ब्रम्हांडासी न्यावा डोळे झाकूनि बैसला । परि तो मनें आटोपिला नाना साधनीं सायास । मनें केला कासाविस रामदास म्हणे वर्म । हेंचि मनाचें सुगम

भावार्थ--

संत रामदास या अभंगात म्हणतात की समाधी लक्षण मनासारखेच विलक्षण आहे. समाधी साधताना साधकाला पुरुन घ्यावे लागत नाही की जिवंतपणी मरावे लागत नाही.  वायूचा निरोध करून ब्रह्मांडात न्यावा लागत नाही त्याचप्रमाणे नाना प्रकारच्या साधना व त्यासाठी नाना प्रयत्न करताना मनाच्या चंचलपणा पुढे काही उपाय सापडत नाही.  जीव कासाविस होतो.  चंचलता हे मनाचे वर्म समजून घेतले पाहिजे तरच साधकाची साधना सफल होऊ शकते

अभंग--१०४

दृढ होतां अनुसंधान । मन जाहलें उन्मन होता बोधाचा प्रबोध । जाला शब्दांचा नि:शब्द ज्ञान विज्ञान जाहलें । वृत्ति निवृत्ति पाहिलें ध्यानधारणेची बुध्दि । जाली सहज समाधि रामीरामदासीं वाच्य । पुढें जालें अनिर्वाच्य

भावार्थ--

या अभंगात संत रामदास साधकाचे अनुसंधान म्हणजे मनाची एकाग्रता साधली असता कोणते अनुभव येतात याचे मार्गदर्शन करतात ते म्हणतात साधनेत दृढ एकाग्रता साधली तर मनाचे उन्मन होते म्हणजे मन विचारांच्या उच्च पातळीवर जाते. मनाला झालेला बोध केवळ शाब्दिक न राहता त्याचा प्रबोध होतो म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाच्या पातळीवर येतो.  तेथे शब्दाचे काही प्रयोजन रहात नाही मन निशब्द बनते.  ज्ञानाचे विज्ञान म्हणजे ते शाब्दिक न राहता प्रत्यक्ष व्यवहारात उतरवता येते.  साधकाच्या सहजप्रवृत्ती निवृत्तीत बदलतात.  मन समाधी अवस्थेपर्यंत पोचते जेथे स्वतःचा व जगाचा विसर पडतो अपूर्व शांतता अनुभवास येते. संत रामदास म्हणतात मन रामरुपाशी एकरुप झाले की, तो अनुभव शब्दात सांगता येत नाही, मन शब्दातित होते.  संत रामदास म्हणतात ram रूपाशी एकरूप झाले की तो अनुभव शब्दात सांगा सांगता येत नाही मन शब्दातीत होते मनाचे मनाशी संत रामदासांच्या मनात विलसू लागला

अभंग --१०५

ज्ञानेविण जे जे कळा । ते ते जाणावी अवकळा ऐसें भगवंत बोलिला । चित्त द्यावें त्याच्या बोला एक ज्ञानचि सार्थक । सर्व कर्म निरर्थक दास म्हणे ज्ञानेविण । प्राणी जन्मला पाषाण

भावार्थ--

ज्ञानाशिवाय माणसाचे सर्व प्रयत्न, सर्व कला केवळ अवकळा आहेत असे प्रत्यक्ष भगवंताने सांगितले आह, त्याचा विचार करावा असे संत रामदास म्हणतात.  ज्ञान हेच जीवनाचे सार्थक असून त्याशिवाय सर्व कर्म निरर्थक ठरते. संत रामदास म्हणतात, ज्ञाना शिवाय मनुष्य हा केवळ दगड होय.

अभंग--१०६

कोणें प्रारब्ध निर्मिलें । कोणें संसारीं घातलें ब्रह्मादिकांचा निर्मिता । कोण आहे त्या परता अनंत ब्रह्मांडांच्या माळा । विचित्र भगवंताची कळा रामदासांचा विवेक । सर्वा घटीं देव एक

भावार्थ--

अनंत ब्रम्हांडाच्या मालिका ज्याने निर्माण केल्या, ब्रह्मादिक देवांचा jजो निर्माता आहे, ज्याच्या पेक्षा श्रेष्ठ असा कुणीही नाही, ज्याने या संसारात प्राणी सृष्टी उत्पन्न केली व त्यांचे प्रारब्ध निर्माण केले.  या सर्व लीला एका भगवंताच्या आहेत.  संत रामदास सांगतात अनंत प्राण्यांच्या देहात एकच परमात्मा विलसत आहे हे समजून घेणे हाच खरा विवेक आहे.

अभंग--१०७

पतित म्हणजे वेगळा पडिला । पावन तो जाला एकरुप एकरुप देव अरुप ठायींचा । तेथे दुजा कैंचा कोण आहे कोण आहे दुजा स्वरुपीं पाहतां । विचारें राहतां सुख आहे सुख आहें मूळ आपुलें शोधितां । मनासी बोधितां रामदास

भावार्थ--

जो स्वरुपापासून वेगळा झाला तो पतित व जो स्वरुपाशी एकरुप झाला तो पावन असे संत रामदास म्हणतात. स्वरुपाशी पूर्पपणे एकरुप झाल्यास तेथे मी तू पणाचा भेद राहत नाही मुळांत आपण अमृताचे पुत्र आहोत.  एकाच आत्मतत्वातून जन्माला आलो आहोत आणि ते आत्मत्त्व अमर आहे. असा विचार करण्यात फार सुख आहे. संत रामदास म्हणतात, हाच बोध मनाने स्विकारला पाहिजे.

अभंग--१०८

कर्ता तूं नव्हेसी करवितानव्हेसी । जाण निशचयेसी आलया रे चंद्रसूर्यकळा धरा मेघमाळा । जीववीति कळा देवापासीं देवें केलें अन्न केलें तें जीवन । तेणें पंचप्राण स्थिर जाले दास म्हणे मना तुज देवें केलें । मग त्वां देखिलें सर्वकाहीं

भावार्थ--

म्हणूस स्वतः करता किंवा करविता नाही ही गोष्ट निश्चयपूर्वक जाणून घ्यावी असे संत रामदास म्हणतात.  चंद्र-सूर्य, मेघ मालिका पृथ्वी हे सर्व ईश्वरानें निर्माण केले आहे.  जीवनास आवश्यक असलेले, पंचप्राण स्थिर करणारे अन्न व पाणी हे सर्व देवाने निर्माण केले आह.  एवढेच नव्हे तर असा विचार करणारे मन ही देवाचीच देणगी आहे.  त्यामुळेच आपण सर्व काही समजून घेऊ शकतो असे रामदास म्हणतात.

अभंग--१०९

करुनी अकर्ते होऊनियां गेले । तेणे पंथें चाले तोचि धन्य तोचि धन्य जनीं पूर्ण समाधानी । जनीं आणि वनीं सारिखाचि कळतसे परी अंतर शोधावें । मनासि बोधावें दास म्हणें

भावार्थ-- स्वतः सर्व काही करूनही स्वतःकडे कर्ते पणा घेणारे अनेक अकर्ते होऊन गेले आहेत ते लोक समुदायात असोत अथवा वनात एकांतात असोत पूर्ण समाधानात राहातात.  संत रामदास म्हणतात अशा लोकांचे अंतरंग, त्यांचे विचार समजून घेऊन त्या पासून योग्य तो बोध घ्यावा.

अभंग--११०

गगना लावू जातां पंक । लिंपे आपुला हस्तक ऊर्ध्व थुंकता अंबरीं । फिरोनि पडे तोंडावरीं ह्रदयस्थासी देतां शिवी । ते परतोनी झोंबे जिवीं प्रतिबिंबासी जें जे करी । तेंआधींच तोंडावरी रामीरामदासी बुद्धि । जैसी होय तैसी सिद्धि

भावार्थ--

आपण आकाशाला चिखल लावायला लागलो तर आपलेच हात चिखलाने माखून निघतात.  वर तोंड करून आकाशावर थुंकलो तर ते परत आपल्याच तोंडावर पडते. आपल्या ह्रदयांत वास करणाय्राला अभद्र शब्द वापरले तर ते परतून आपल्याच मनाला दुःख देतात.  रामदास म्हणतात जशी आपली बुद्धी तशी सिद्धी आपणास प्राप्त होत.

N/A

References : N/A
Last Updated : March 11, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP