रामदासांचे अभंग - १७१ ते १८०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला,
समर्थ रामदास स्वामींचे अभंग भावार्थासहित.


अभंग---१७१

त्रिभुवनासी क्षयरोग । एक सद्गुरू आरोग्य जे जे तया शरण गले । ते ते आरोग्य होऊनि ठेले शरण रामी रामदास । क्षयातीत केलें त्यास

भावार्थ--- संत रामदास म्हणतात स्वर्ग, पृथ्वी, नरक या तिनही भुवनांना क्षयरोगाची बाधा आहे. हे सर्व विश्व नाशवंत आहे. केवळ आपले सद्गुरू हे परमेश्वरी तत्व अविनाशी आहे. जे जे या अविनाशी तत्वाला शरण गेले त्या परमेश्वरी तत्वाशी एकरूप झालें तेच केवळ शाश्वत झाले. राम चरणाशी शरण जाऊन रामदास क्षयातीत झाले.

अभंग---१७२

ब्रम्हांडचि तीर्थ जालें । जयाचेनी एका बोलें ॥ सद्गुरूची पायवणी । सकळ तीर्था मुकुटमणी ॥ रामीरामदास म्हणे । महिमा धाता तोही नेणें ॥

भावार्थ--- संत रामदास म्हणतात, ज्याच्या केवळ एका वचनाने सर्व ब्रम्हांडाचे तीर्थक्षेत्र बनले त्या आपल्या सद्गुरूचा चरणस्पर्श सकळ तीर्थाचा मुकुटमणी आहे. जो साधक त्यांचा महिमा जाणून घेईल त्यालाच हे समजून येईल.

अभंग---१७३ एक हेंअनेक, अनेक जें एक । अनुभवीं देख स्वानुभव ॥ कोठुनिया जालें कैसे आकारलें । वेदी वर्णियेलें ज्ञानकांडी ॥ तें गुज सद्गुरूकृपे कळों आलें । दास म्हणे जालें ब्रह्मरूप ॥

भावार्थ---

हे अनेकरुपी विश्व एकाच चैतन्य तत्वातून साकारले आहे. विश्वाचे हे अनेकत्व एकाच परमात्म्याचे प्रतिबिंब आहे. ही आत्मप्रचितिची, स्वानुभवाची गोष्ट आहे. हे आत्मतत्व कोठून व कसे आकारास आले याचे वर्णन वेदांच्या ज्ञानकांडात केलेले आहे संत रामदास म्हणतात, हे रहस्य सद्गुरूकृपेमुळे समजून येते.

अभंग---१७४ एक तो गुरू दुसरा एक सद्गुरू सद्गुरूकृपेवाचुनि न कळे ज्ञानविचारू पारखी नेणती ज्ञानी ओळखती । गुरू केला परि ते नाहीं आत्मप्रचिति म्हणोनि वेगळा सद्गुरू निराळा । लक्षांमध्यें कोणी एक साधु विरळा सद्य प्रचीति नसतां विपत्ति । रामदास म्हणे कैसी होईल रे गति

भावार्थ--- संत रामदास म्हणतात, गुरू अनेक प्रकारचे असतात पण सद्गुरू एखादाच असतो. सद्गुरूवाचुन ज्ञानविचार समजत नाही. ज्या प्रमाणे खरा रत्नपारखीच रत्नाची खरी पारख करू शकतो त्या प्रमाणे गुरू केला म्हणजे आत्मप्रचिति येत नाही. लक्ष साधुंमध्ये एखादाच सद्गुरू असतो जो आत्मप्रचिति देऊ शकतो. आत्मप्रचिति नसलेला साधक संकटांत सापडतो. त्याला सद्गती म्हणजे मोक्षलाभ होऊ शकत नाही.

अभंग---१७५ सद्गुरू लवकर नेती पार ॥ थोर भयंकर दुस्तर जो अति । हा भवसिंधु पार ॥ षड्वैय्रादिक क्रुर महामीन । त्रासक हे अनिवार ॥ घाबरला मनिं तीव्र मुमुक्षु । प्रार्थित वारंवार ॥ अनन्यशरण दास दयाघन । दीनजनां आधार ॥

भावार्थ---

हा संसार सागर पार करून जाण्यास अत्यंत कठिण आहे. या भव सागरांत मद, मोह, लोभ, मत्सर या सारखे अत्यंत दुष्ट असे भयानक मासे आहेत, ते अनिवार त्रास देणारे आहेत. त्या षड्ररिपुंना मोक्षाची ईच्छा करणारा साधक अतिशय घाबरून सद्गुरूंची वारंवार प्रार्थना करु लागतो. अशा वेळीं सद्गुरू साधकाला मदत करून भवसिंधुपार नेतात. अनन्यशरण अशा दासाला दीनजनांचा आधार असलेले करुणामय सद्गुरूच वाट दाखवतात.

अभंग---१७६

तुजविण गुरूराज कोण प्रतीपाळी । मायबाप कामा न ये कोणी अंतकाळीं जळाविण तळमळित जसा मीन शुष्क डोहीं । तुजविण मज वाटे तसें धांव लवलाही चकोरचंद्रन्याय जसा गाय माय बाळा । पाडसासी हरिणी जसी तेंवि तूं कृपाळा रामदास धरूनी आस पाहे वास दिवसरात । खास करिल काळ ग्रास, ध्यास हा मानसी

भावार्थ--- या अभंगात संत रामदास सद्गुरूचा धावा करीत आहेत. ते म्हणतात, अंतकाळीं जन्मदाते मायबाप कामास येत नाहीत. त्या वेळी सद्गुरू सारखा कोणी सांभाळ करणारा नाही. कोरड्या डोहांत पडलेला मासा जसा पाण्याविणा तळमळतो तशी आपली अवस्था झाली आहे. चकोर पक्षी जशी चंद्रोदयाची, गाय वासराची, आई लेकराची, हरिणी पाडसाची आतुरतेने वाट पहाते त्या प्रमाणे संत रामदास आपल्या कृपाळु सद्गुरूची आळवणी करीत आहेत. काळाचा ग्रास होण्यापूर्वी श्री रामाने आपणास दर्शन द्यावे असा धावा ते करीत आहेत.

अभंग---१७७

गुरूवरें दातारें । अभिनव कैसें केलें.  एकचि वचन न बोलत बोलुनि । मानस विलया नेलें भूतसंगकृत नश्वर ओझें । निजबोधें उतरिलें दास म्हणे मज मीपणाविरहित । निजपदीं नांदविलें

भावार्थ---

संत रामदास म्हणतात, आपल्या सद्गुरूंनी अभिनव करणी केली. एकही शब्द न बोलतां त्यांनी केवळ दर्शनाने या चंचल मनाचे हरण करुन ते विलयास नेल, पंचमहाभूतांचा हा नाशवंत पसारा निजबोधाने क्षणांत नाहिसा झाला. मीपणाच्या अहंकाराचे ओझे उतरवून चरण कमलांशी शाश्वत स्थान प्रदान केलें.

अभंग---१७८

अपराधी आहे मोठा । मारणें कृपेचा सोटा गुरुराज सुखाचे कंद । नेणुनि केला हा निजछंद । तेणें पावलों मी बंध । जालों निंद्य सर्वस्वीं तारीं तारीं सद्गुरुराया । वारीं माझे तापत्रया । तुझे पाय काशी गया । आहे मजला सर्वस्वीं आतां अंत पाहसी काय । तूंचि माझा बापमाय । रामदास तुझे पाय । वारंवार वंदितो

भावार्थ---

सद्गुरू हे आनंदाचे कंद असून त्यांचा आपल्याला छंद लागला आहे, त्यांच्या चरणाशी बांधला गेल्यामुळे आपण पुर्णपणे निंद्य बनलो आहे. सद्गुरूंचे पाय काशी गयेसारखे तीर्थस्थाने असल्याने आपली आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक या तिनही तापांपासून सुटका करावी अशी विनवणी करून संत रामदास परत परत सद्गुरू चरणांना वंदन करतात.

अभंग---१७९

त्रिविध तापहारक हे गुरूपाय । भवसिंधूसी तारक हे गुरुपाय स्वात्मसुखाचें बीज हे गुरुपाय । ज्ञानाचें निजगुज हे गुरुपाय भक्तिपंथासि लाविती हे गुरुपाय । नयनीं श्रीराम दाविती हे गुरुपाय सहज शांतीचे आगर हे गुरुपाय । पूर्णकृपेचे सागर हे गुरुपाय । सकळ जीवांसी पावन हे गरुपाय

भावार्थ---

तिनही तापांचे हरण करणारे, संसारसागर तारून नेणारे, आत्मसुख देणारे, ज्ञानाचे रहस्य उलगडून दाखवणारे, भक्तिपंथास लावून श्रीरामाचे दर्शन घडवणारे सद्गुरूचे हे चरणकमल शांतीचे आगर असून पूर्णकृपेचे सागर आहेत. हे गुरुपद सर्व जीवांना पावन करणारे आहेत असे संतरामदास या अभंगात सांगतात.

अभंग---१८०

शरण जावें संतजनां । सत्य मानावें निर्गुणा नाना मतीं काय चाड । करणें सत्याचा निवाड ज्ञाने भक्तीस जाणावें । भक्त तयास म्हणावें रामीरामदास सांगे । सर्वकाळ संतसंग

भावार्थ---

या अभंगात संत रामदास संत-सज्जनांची महती सांगत आहेत. सगुण व निर्गुणाची उपासना या विषयीं अनेक मत-मतांतरे आहेत, यातून सत्य काय आहे हे समजून घ्यावे निर्गुण हेंच अंतिम सत्य मानावे.  या ज्ञानातूनच भक्तीचा उगम होऊन साधक प्रेमळ भक्त बनतो. यासाठी संत-सज्जनांना शरण जावे, सदा सर्वकाळ संतांच्या संगतीत राहावें.

N/A

References : N/A
Last Updated : March 11, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP