रामदासांचे अभंग - ९१ ते १००
समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला,
समर्थ रामदास स्वामींचे अभंग भावार्थासहित.
अभंग--९१
पतित हे जन करावे पावन । तेथे अनुमान करूं नये करुं नये गुणदोष उठाठेवी । विवेकें लावावी बुध्दि जना बुध्दि लावी जना त्या नाव सज्ञान । पतितपावन दास म्हणे
भावार्थ--
जे लोक पतित आहेत त्यांना पावन करून घ्यावे, त्यात अनुमान करू नये त्यांच्या गुणदोषांची चर्चा करू नये. विवेकाने पतीतांची बुद्धी बदलण्याचा प्रयत्न करावा. याचा अर्थ अज्ञानी लोकांना सज्ञानी बनवावे, असे संत रामदास म्हणतात.
अभंग--९२
पोट भरावया मांडिले उपास । जाला कासाविस लाभेंविण ब्रम्ह साधावया कर्ममार्गे गेला । तंव कर्मे केला कासाविस सुटका व्हावया बंधनचि केलें । तेणें तें सुटलें केंवि घडे एक व्यथा एक औषध घेतलें । दास म्हणे जालें तयापरी
भावार्थ--
या अभंगात रामदास आपल्या व्यथा व त्यावरील उपाय याबद्दल बोलत आहेत. आपल्याला भूक लागली तर जेवण करण्याचे सोडून उपास केला तर काहीच लाभ होणार नाही. जीव मात्र कासावीस होईल कारण तप स्वाध्याय आणि ईश्वरभक्ती ही आत्मशुद्धीची साधने सांगितली आहेत. उपवासाची गणना तपात होते व ते शरीर शुद्धी चे साधन आहे. भूक लागली असता हा उपाय करणे व्यर्थ आहे. ब्रम्हज्ञान मिळवण्यासाठी कर्मयोगाने काहीच लाभ होणार नाही. व्याधी पासून सुटका मिळावी म्हणून जर संसाराचा त्याग केला तर त्यापासून सुटका होईल हें घडणार नाही. व्याधी समजून घेऊनच औषध केले पाहिजे. संसारिक दुःखावर रामभक्ती हाच एक उपाय आहे.
अभंग--९३
अर्थेविण पाठ कासया करावें । व्यर्थ का मरावें घोकुनीयां घोकुनिया काय वेगीं अर्थ पाहे । अर्थरुप राहे होउनियां होउनिया अर्थ सार्थक करावें । रामदास भावें सांगतसे
भावार्थ--
अर्थ समजल्याशिवाय केवळ शब्दांचे पाठांतर करून उपयोग नाही घोकून पाठ करण्याचे व्यर्थ श्रम करू नयेत. त्यातील अर्थाशी एकरूप होऊन त्याप्रमाणे आचरण केल्यास जीवनाचे सार्थक होईल असे संत रामदास या अभंगात सांगतात.
अभंग--९५
ज्ञानाचें लक्षण क्रियासंरक्षण । वरी विशेषेण रामनाम अंतरीचा त्याग विवेके करावा । बाहेर धरावा अनुताप ब्रह्मादिका लाभ ज्ञानाचा दुर्लभ । तो होय सुलभ साधुसंगें साधुसंगें साधु होइजे आपण । सांगतसे खुण रामदास
भावार्थ--
आपणास अवगत झालेले ज्ञान प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हे ज्ञानाचे लक्षण आहे. अंतःकरणातील लोभ,, मोह, क्रोध या भावनांचा विवेकाने त्याग करावा. ब्रम्हदेवा सारख्या देवांना सुध्दा ज्ञानाचा लाभ होणे कठीण आहे. ज्ञानाचा लाभ साधुसंतांच्या संगतीत सुलभपणे होऊ शकतो. साधूंच्या संगतीत राहून साधूसारखे विरक्त होणे हीच ज्ञानाची खूण आहे असे संत रामदास म्हणतात.
अभंग--९५
माजी बांधावा भोपळा । तैसी बांधो नये शिळा घेऊ येते तेचि घ्यावें । येर अवघेचि सांडावें विषवल्ली अमरवल्ली । अवघी देवेचि निर्मिली दास म्हणें हरिजन । धन्य जाण ते सज्जन
भावार्थ--
पाण्यामध्ये पोहण्यासाठी भोपळा बांधावा दगड बांधू नये. विष वेली व अमवेली या दोन्ही देवानेच निर्माण केल्या आहेत पण आपल्याला योग्य असेल तेच स्वीकाराव. बाकी सर्व सोडून द्यावे. असे सांगून संत रामदास म्हणतात हरिभक्त हे संतजन असून त्यांच्या संगतीचा लाभ घ्यावा.
अभंग--९६
भाग्यवंत नर यत्नासी तत्पर । अखंड विचार चाळणांचा चाळणेचा यत्न यत्नाची चाळणा । अखंड शाहाणा तोचि एक प्रवॄत्ति निवॄत्ति चाळणा पहिजे । दास म्हणे कीजे विचारणा
भावार्थ--
जे सतत प्रयत्नशील असतात ते पुरुष भाग्यवंत असतात. तें सतत सद्विवेक बुद्धीचा उपयोग करून योग्य व अयोग्य गोष्टींची निवड करीत असतात. केलेल्या प्रयत्नांचे यश अपयश याबद्दल अत्यंत सुज्ञपणे सावध असतात. संत रामदास म्हणतात प्रवृत्ती वझ निवृत्ती यांची निवड करू शकणारा या जगात शाहाणा ठरतो. त्याचा विचार करावा.
अभंग--९७
नमू रामक्रुष्णा आदिनारायणा । तुम्ही त्या निर्गुणा दाखवावें दाखवावे निजस्वरुप आपुँलें । दिसेनासे जालें काय करू पांडुरंगा देवा अगा महादेवा । तुम्ही मज द्यावा ठाव ब्रह्मीं ब्रह्मी ब्रह्मरुप ते मज करावें । रामदास भावें प्रार्थितसे
भावार्थ--
संत रामदास राम-कृष्णांना वंदन करून त्या देवतांना प्रार्थना करतात की त्यांनी त्यांचे निर्गुण निजस्वरूप प्रकट करून दाखवावे कारण सगुणाच्या भक्तीमुळे निर्गुणाचे स्वरूप दिसेनासे झाले आहे. पांडुरंगाला अत्यंत भाविकपणे प्रार्थना करतात की त्यांनी आपल्याला ब्रह्मरूप बनवून ब्रम्ह रुपात विलीन करावें.
अभंग--९८
सूर्यनारायणा देवा नमस्कार । तुवां निराकार दाखवावें दाखवुनी द्यावें मज निववावें । चंद्रा तुज भावें प्राथितसें प्राथितसें मही आणि अंतरिक्षा । तुम्ही त्या अलक्षा दाखवावें दाख़वावें मज आपोनारायणें । ब्रह्मप्राप्ति जेणें तें करावें करावे सनाथ अग्निप्रभंजने । नक्षत्रे वरुणें दास म्हणे
भावार्थ--
या अभंगात रामदास सूर्यनारायणाला नमस्कार करून त्यांनी आपल्याला निराकार रूप साकार करून दाखवावे अशी विनंती करतात. चंद्राने शितल रूप दाखवून आपणास शांत करावे अशी भावपूर्ण प्रार्थना करतात । पृथ्वी आकाश आप तेज वायू अग्नी या पंचमहाभूतांनी आपल्या अलक्ष रूपाचे प्रकटीकरण करून ब्रह्म प्राप्तीचा मार्ग दाखवावा अशी विनंती करीत आहेत.
अभंग--९९
तुम्ही सर्व देव मिळोनी पावावें । मज वेगीं न्यावें परब्रहमीं परब्रह्मीं न्यावें संतमहानुभावें । मज या वैभवें चाड नाहीं चाड नाही एका निर्गुणावांचोनी । माझे ध्यानीं मनीं निरंजन निरंजन माझा मज भेटवावा । तेणें होय जीवा समाधान समाधान माझें करा गा सर्वहो । तुम्हांसी देव हो विसरेना विसरेना देह चालतो तोंवरी । बाह्य अभ्यंतरी दास म्हणे
भावार्थ--
सर्व देवांनी तसेच संत महानुभावांनी कृपा करून आपल्याला परब्रह्मस्वरूपी न्यावे अशी प्रार्थना संत रामदासांनी या अभंगात केली आहे. आपल्याला एका निर्गुण निराकार परब्रम्हा शिवाय कोणत्याही वैभवाची अपेक्षा नाही. आपल्या ध्यानीमनी केवळ निरंजन परमेश्वर वसत असून तेच निरंजन स्वरुप डोळ्यांनी पाहावे हेच आपल्या मनाचे समाधान आहे. सर्व देवांनी हे समाधान मिळवून दिल्यास देहात चलनवलन असे पर्यंत हा उपकार आपण विसरणार नाही व बाह्य व अंतर्यामी सतत चिंतन करीत राहिल असे संत रामदास प्रतिज्ञापूर्वक सांगत आहेत.
अभंग--१००
मन हे विवेके विशाळ करावें । मग आठवावे परब्रह्म परब्रह्म मनीं तरीच निवळे । जरी बोधें गळे अहंकार अहंकार गळे संतांचे संगतीं । मग आदि अंतीं समाधान समाधान घडे स्वरुपीं राहतां विवेक पाहतां नि:संगाचा नि:संगाचा संग सदृढ धरावा । संसार तरावा दास म्हणे
भावार्थ--
या अभंगात संत रामदास संसार सागर कसा तरून जावा याविषयी मार्गदर्शन करीत आहेत. विवेकाने मन विशाल करावे आणि मग परब्रह्माचे स्वरूप आठवावे. जेव्हा पूर्ण बोध होऊन अहंकार गळून जाईल तेव्हाच परब्रम्हाचे दर्शन मनामध्ये प्रतिबिंबित होईल. अहंकार गळण्यासाठी संतांची संगती धरावी त्यामुळे जीवनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत समाधान टिकून राहते. स्वतःच्या आत्मस्वरूपात मन स्थिर झाल्यानंतरच समाधानाची प्राप्ती होते. देहबुद्धी व त्यामुळे घडणार्या विषयाचा संग यापासून दूर राहणार्या संतांची संगत दृढपणे धरावी. तरच त्यांचे विवेक व वैराग्य कळून येते, त्यामुळे संसारसागर सहज तरुन जाता येतो असे संत रामदास सांगत आहेत.
N/A
References : N/A
Last Updated : March 11, 2023
TOP