रामदासांचे अभंग - १११ ते १२०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला,
समर्थ रामदास स्वामींचे अभंग भावार्थासहित.


अभंग--१११

राघवाचे घरीं सदा निरुपण । श्रवण मनन निजध्यास विचारणा सारासार थोर आहे । अनुभवे पाहें साधका रे साधका रे साध्य तूंचि तूं आहेसी । रामीरामदासीं समाधान

भावार्थ--

राघवाच्या घरी धार्मिक ग्रंथांचे सतत श्रवण मनन व निरुपण अखंड चालू असते. हाच केवळ एकच ध्यास असतो.  सारासार विचारांचे मंथन सुरू असते असे सांगून संत रामदास म्हणतात याचा अनुभव स्वतः साधकाने घ्यावा.  साधकाच्या जीवनाचे सार्थक हेच साध्य मानले जाते. त्यातच खरे समाधान मिळते असे संत रामदास सांगतात.

अभंग--११२

स्वस्कंधी बैसणें आपुलिये छाये । अघटित काय घडो शके दुजेविण सुखें स्वरुप बोलणे । अद्वैतासी उणे येऊं पाहे सुख आणि दु:ख वृत्तीच्या संबंधें । निवृत्तीच्या बोधें द्वंद्व कैचे सुखातीत देव पहावा अनंत । दास म्हणे संत वृत्तिशून्य वृत्तिशून्य संत असोनिया वृत्ति । हेखूण जाणती अनुभवी

भावार्थ

आपल्याच सावलीच्या खांद्यावर बसता येणे ही गोष्ट अशक्य असते. असे कधी घडले नाही. दुसरा कोणी नसताना स्वरूपाविषयी सुखाने संवाद होऊ शकत नाही.  तेथ द्वैत निर्माण होते व त्यामुळे अद्वैताला कमीपणा येतो. सुखव दुःख हे दोन्ही आपल्या वृक्तिशी संबंधित आहेत.  जेथे सुखदुःखाची जाणीवच नाही तेथे द्वंद्व संपूर्ण जाते. सुखाच्या अतीत असलेला अनंत परमेश्वराचे दर्शन घ्यावे. तो निराकार निरंजन आहे.  संत रामदास म्हणतात संत वृत्तिशुन्य असतात.  त्यांच्ये मन शांत सरोवरा सारखे असते. त्यांच्या मनात वृत्ति उठत नाहीत तरीही त्यांना देवदर्शनाची, रामरूपाची अत्यंत गोडी वाटते. अनुभवाशिवाय हे जाणता येणार नाही असे संत रामदास म्हणतात.

अभंग --११३

बोलवेना तें बोलावे । चालवेना तेथें जावें नवल स्वरुपाचा योग । जीवपणाचा वियोग हातां नये तेचि घ्यावें । मनेंवीण आटोपावें रामदासीं दृढ बुध्दि । होतां सहज समाधि

भावार्थ--

जे बोलता येणार नाही ते बोलावे करता येण्याजोगे नाही ते करण्याचा प्रयत्न करावा. जेथ पर्यंत चालत जाता येत नाही तेथे जावे. अशा ठिकाणी नवलाईच्या गोष्टींचा योग येतो.  तेथे जीवपणा संपूर्ण जातो. जीवा शिवाचे मिलन होते. जे आपल्या हातात येत नाही ते घेण्याचा प्रयत्न करावा. संत रामदास म्हणतात सहज समाधीच्या अवस्थेत बुद्धी दृढ होत.

अभंग--११४

माझे मी तूं पण विवेकाने नेलें । देवाजीने केलें समाधान आपुल्या सुखाचा मज दिला वाटा । वैकुंठीचा वाटा कोण धांवे देवासी नेणतां गेले बहु काळ । सार्थकाची वेळ एकाएकी एकाएकीं एक देव सांषडला । थोर लाभ झाला काय सांगों

भावार्थ--

मी तूंपणाचे द्वैत विवेकामुळे नाहिसे झाले.  आपल्या सुखाचा वाटा देऊन देवाने सुखी केले. देवाला जाणून घेण्याच्या प्रयत्नात खूप दिवस निघून गेले पण जीवनाचे सार्थक होण्याची वेळ अकस्मात आली.  आणि वैकुंठीच्या वाटा सापडल्या. तेथे एकाएकी देव सापडला मोठा लाभ झाला याचे वर्णन करून सांगता येणार नाही.

अभंग--११५

योगियांचा देव मज सांपडला । थोर लाभ जाला एकाएकीं एकाएकीं एक त्रैलोक्यनायक । देखिला सन्मूख चहुंकडे चहुंकडे देव नित्यनिरंतर । व्यापुनी अंतर समागमें समागम मज रामाचा जोडला । वियोग हा केला देशधडी देशधडी केला विवेके वियोग । रामदासीं योग सर्वकाळ

भावार्थ --

संत रामदास म्हणतात यगेश्वर एकाएकी डोळ्यासमोर प्रगट झाला आणि आश्चर्य असे की योगेश्वराचे रूप चारी बाजूंनी नित्य निरंतर दिसू लागले. रामरुपाने देव भक्तामधील सर्व अंतर व्यापून टाकले आणि समागमाचे सुख मिळाले.  रामाचा समागम झाल्यामुळे वियोगाचं दुःख संपले.  विवेकाने वियोगाचे दु:ख लयाला जावून श्रीरामाचा कायमचा सर्वकाळ योग प्राप्त झाला.

अभंग --११६

राघवाचा धर्म गाजो । कीर्ति अद्भुत माजो ठाईं ठाईं देवालयें । भक्तमंडळी साजो शक्ति आहे तोचि फावे । दोनी लोक साधावे इहलोक परलोक । शत्रु सर्व रोधावे संसारिचें दु:ख मोठें । हें मी कोणाला सांगों जन्म गेला तुजविण । आणिक काय मी मागों मागता समर्थाचा । तेणें कोणा सांगावें रामेविण कोण दाता । कोणामागे लागावें रामदास म्हणे देवा । आतां पुरे संसार असंख्य देणे तुझें । काय देतील नर

भावार्थ--

या अभंगाचा प्रारंभी संत रामदासांनी राघवाचा धर्म गाजत राहो राघवाची कीर्ती दुमदुमत राहो ठिकठिकाणी राममंदिरांची स्थापना केली जावो अनेक भक्तांमुळे ती मंदिरे शोभायमान होवोत अशी मंगल प्राथना करीत आहेत.  आपण बलोपासना करावी, सर्व शत्रूंना शक्तीच्या प्रभावाने रोखावे, व अशाप्रकारे इहलोक व परलोक साधावे असा उपदेश रामदास करतात. अगणित दुखे भोगावी लागली रामा शिवाय जन्म गेला हे आपण कुणाला सांगू शकत नाही.  आणि समर्थचा दास असल्याने कुणाला काही मागू शकत नाही असे रामदास म्हणतात.

अभंग --११७

वदन सुहास्य रसाळ हा राघव । सर्वांगी तनु सुनीळ हा राघव मृगनाभी रेखिला टिळा हा राघव । मस्तकीं सुमनमाळा हा राघव साजिरी वैजयंती हा राघव । पायीं तोडर गर्जती हा राघव सुंदर लावण्यखाणी हा राघव । उभा कोदंडपाणी हा राघव सकल जीवांचें जीवन हा राघव । रामदासासि प्रसन्नहा राघव

भावार्थ--

या अभंगात संत रामदास रामाचे रसाळ वर्णन करीत आहेत रामाच्या वदनावर सुहास्यअसून तो लावण्याची खाणी आहें.  राघवाच्या कपाळावर टिळा लावला आहे.  मस्तकावर सुवासिक फुलांच्या माळा आहेत. गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे. पाया मध्ये तोड गाजताहेत. हातामध्ये कोदंड धारण केला आहे.  राघव जीवांचे जीवन आहे आणि विशेष म्हणजे राघव रामदासांवर प्रसन्न आहे.

अभंग--११८

कुळ हनुमंताचें । मोठे किराण त्यांचें भुभुकारें ँळळजयाचें । किलकिलाटें आतां वाटतें जावें । त्याचें सांगाती व्हावें डोळे भरुनी पहावें । सर्वांग त्यांचें ऐकोनी हासाल परी । नये तयांची सरी विचार जयांसी करी । स्वामी माझा असंख्य मिळाला मेळा । रामा भोंवता पाळा पालथें या भूगोळा । घालू शकती ऐसी करणी त्यांची । व्यर्थ जिणीं आमुचीं पाला खाउनी रामाची । शुश्रुषा केली ऐसे ते रामदास । सर्वस्वे उदास रामीं जयांचा विश्वास । बाणोनि गेला

भावार्थ--

संत रामदास म्हणतात हनुमंताचे कुळ प्रसिद्ध आहे त्यांच्या भुभुकाराने, किलबिलाटाने सर्व परिसर व्यापून राहिला आह. असे वाटते की आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांचे सांगाती व्हावे. त्यांना डोळे भरून पाहावे. हे ऐकून कुणाला हसायला येईल परंतु त्यांची बरोबरी कोणीही करू शकणार नाही कारण प्रत्यक्ष श्रीराम त्यांच्याशी विचारविनिमय करत असत.  श्रीरामा सभोवती ती वानरसेना वेढा घालीत अस.  आपल्या शक्तीने या भूगोलोकाला पालथा घालू शकतील एवढी त्यांची शक्ती होती.  केवळ झाडाचा पाला खाऊन त्यांनी राघवाची सेवा केली ही त्यांची करणी आपल्याला आपले जीवन व्यर्थ, लाजिरवाणें आहे असे वाटायला लावते.  ते रामाचे दास असून वृत्तीने अत्यंत उदासीन आहेत.  शिवाय त्यांना कसलीच अपेक्षा नाही.  रामावर त्यांचा दृढ विश्वास आहे. त्यांच्या भक्तीची सर कुणालाच येणार नाही.  असा आपला स्वामी हनुमंत आहे असे रामदास म्हणतात.

अभंग--११९

देव वैकुंठीचा । कैपक्षी देवाचा भार फेडिला भूमीचा । आत्मा सर्वांचा पाळक प्रजाचा । योगी योगियांचा राजा सूर्यवंशींचा । तो अयोध्येचा राम सामर्थ्याचा । कैवारी देवांचा मेघ वोळला सुखाचा । न्यायनीतीचा उध्दार अहिल्येचा । एकपत्नीव्रताचा सत्य बोलणे वाचा । जप शिवाचा नाथ अनाथांचा । स्वामी हनुमंताचा सोडविता अंतीचा । रामदासाचा

भावार्थ--

श्रीराम हा वैकुंठीचा देव असून देवांचा कैवारी आहे तो सर्वांचा आत्मा असून धरणीचा भार हलका करण्यासाठी सूर्यवंशात अवतार धारण केला आहे. प्रजेचा पालनकर्ता असून योग्यामधील सर्वश्रेष्ठ योगी आहे.  श्री राम अयोध्येचा राजा असून अत्यंत सामर्थ्यवान आहे.  आपल्या प्रजेला न्याय नीती व सुख देणारा मेघ च आहे. अहिल्येचा उद्धारकर्ता, एकपत्नी, सत्यवादी आहे.  रामनामाचा जप स्वतः शिवशंकर करतात. प्रभू रामचंद्र अनाथांचे नाथ असून हनुमंताचे स्वामी आहेत.  संत रामदास म्हणतात श्रीराम हा अंतकाळी सुटका करणारा मोक्षदाता आहे.

अभंग--१२० कैवारी हनुमान, आमुचा ॥ पाठी असतां तो जगजेठी । वरकड काय गुमान नित्य निरंतर रक्षी नानापरी । धरुनियां अभिमान द्रोणागिरि करि घेउनि आला । लक्ष्मणप्राणनिधान दासानुदासा हा भरंवसा । वहातसे त्याची आण

भावार्थ-- संत रामदास या अभंगात हनुमानाचा महिमा सांगत आहेत.  ते म्हणतात हनुमान निरंतर रक्षण करणारा आपला कैवारी आहे.  लक्ष्मणाच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी तो द्रोणागिरी सारखा पर्वत तळहातावर घेऊन आला.  संत रामदास म्हणतात हनुमंता सारखा जगाचे रक्षण करणारा जगजेठी पाठीशी असताना आणखी कशाचीच अपेक्षा करण्याचे कारण नाही. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा.

N/A

References : N/A
Last Updated : March 11, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP