रामदासांचे अभंग - ७१ ते ८०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला,
समर्थ रामदास स्वामींचे अभंग भावार्थासहित.


अभंग--७१

कायावाचामनें यथार्थ रामीं मिळणें । तरीच श्लाघ्यवाणें रामदास्य कामक्रोध खंडणें मदमत्सर दंडणें । तरीच श्लाघ्यवाणें रामदास्य जैसे मुखें बोलणें तैसी क्रिया चालणें । तरीच श्लाघ्यवाणें रामदास्य रामदास म्हणे निर्गुण लाधणें । तरीच श्लाघ्यवाणें रामदास्य

भावार्थ--

काया वाचा मनाने पूर्णपणे एकरूप होऊन दास्य करणे हेच खरे रामदास्य, काम क्रोधाचे खंडन करून, मद मत्सराला दंड देऊन केलेले दास्य, परस्त्री बद्दलची वासना नष्ट होणे, परद्रव्य अग्नीसारखे दाहक वाटणे, बोलण्या प्रमाणे कृती करणे हीच खरी राम सेवा.   संत रामदास म्हणतात सत्व रज तम या गुणांच्या अतीत होऊन निर्गुण सुख लाभणे हेच खरे रामदास्य.  असे रामदास्य स्तुती करण्यायोग्य असते.

अभंग--७२

आमुचे वंशीं आत्माराम । एका पिंडींचे निष्काम रामदास्य आलें हातां । अवघा वंश धन्य आतां बापें केली उपार्जना । आम्ही लाधलों त्या धना बंधु अभिलाषा टेकला । वांटा घेउनि भिन्न जाला रामीरामदासीं स्थिति । पाहिली वडिलांची रीति

भावार्थ--

संत रामदास या अभंगात म्हणतात, आपण रामाचे वंशज आहोत त्यामुळे हा पिंडच निष्काम आहे. रामाचे सेवक असल्याने सर्व वंश धन्य झाला. वडिलांच्या पुण्याइने राम सेवारुपी धन प्राप्त झाले.  अभिलाषा नावाच्या बंधू आपला वाटा घेऊन वेगळा झाला.  रामदासांना मात्र वडिलांच्या पुण्याईचा लाभ मिळाला.

अभंग --७३

मनुष्याची आशा तेचि निराशा । एका जगदीशावांचुनिया वांचुनियां राम सर्वहि विराम । नव्हे पूर्ण काम रामेविण संकटींचा सखा निजांचा सांगाती । राम आदि अंतीं रामदासीं

भावार्थ--

जगदीशाची कृपा नसेल तर आशेचे निराशेत रूपांतर व्हायला वेळ लागत नाही.  रामाशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही.  श्रीराम हा संकटात धावून येणारा सखा, जिवाचा सांगाती आहे.  संत रामदास म्हणतात, रामदासांना आजीवन सांभाळणारा केवळ रामच आहे. रमदासांचा राम जीवनाच्या आदि व अंती आहे.

अभंग--७४

आम्हा ये प्रपंचीं कोणी नाहीं सखा । एका रघुनायकावांचोनिया विद्या वैभव धन मज क्रुपणाचें । जीवन जीवांचे आत्मारामु आकाश अवचितें जरि कोसळेल । मज तेथें राखील आत्मारामु आपिंगिलें मज श्रीरामसमर्थे । ब्रह्मांड पालथें घालूं शके वक्रदृष्टि पाहतां भरिल त्याचा घोंट । काळाचेंहि पोट फाडू शके रामदास म्हणे मी शरणागत त्याचा । आधार सकळांचा मुक्त केला ।

भावार्थ--

रामदासांना या संसारात रघुनायका शिवाय कोणी सखा नाही.  एकाएकी आकाश कोसळले तरी आत्माराम रामदासांचे रक्षण करील, कोणी वाकड्या नजरेने बघितले तर श्रीराम त्यांच्या नरडीचा घोट घेण्याइतका किंवा प्रत्यक्ष काळाचे पोट फोडू शकेल इतका समर्थ आहे असा विश्वास संत रामदास या अभंगात व्यक्त करतात.  ते म्हणतात श्रीरामाने अंगीकार केल्यास आपण ब्रम्हांड देखील पालथे घालू शकतो कारण श्रीराम सर्वांचा एकमेव आधार आहे.

अभंग--७५

जठरीं लागो क्षुधा । होत नाना आपदा भक्तिप्रेम सदा । न सोडीं सत्य शब्द न फुटे जरी । चिंतीन अंतरीं भक्तिप्रम परी । न सोडी सत्य आतांचि हा देहो । राहो अथवा जावो रामीं प्रेमभावो । न सोडी सत्य म्हणे रामदास । वरी पडो आकाश राघवाची कास । न सोडी सत्य

भावार्थ-- या अभंगात संत रामदास आपण रामा वरची प्रेमभक्ति कधीच सोडणार नाही हे सत्य सांगत आहेत.  पोटात भुकेने कितीही यातना झाल्या, शब्द उच्चारण करण्याची शक्ती नाहीशी झाली तरी अंतकरणात रामाचेच चिंतन करीन. देह राहील अथवा जाईल याचा विचार न करता रामा विषयीचा प्रेमभाव कधीच सोडणार नाही.  संत रामदास म्हणतात कीआकाश कोसळून पडले तरी राघवाची साथ कधीच सोडणार नाही.

अभंग--७६

रुप रामाचेंपाहतां । मग कैंची रे भिन्नता दृश्य अदृश्यावेगळा । राम जीवींचा जिव्हाळा वेगळीक पाहतां कांहीं । पाहतां मुळींच रे नाहीं रामदासीं राम होणें । तेथें कैचें रे देखणें

भावार्थ-- संत रामदास म्हणतात रामाचे rरुप सदा सर्वकाळ डोळ्यात भरलेले असूनही दर्शनास गेले तर आकलन होत नाही.  सदा सर्वकाळ मन राम चिंतनात दंग असल्याने ताटातूट होण्याचा संभवच नाही.  घेऊ म्हटले असता घेता येत नाही व टाकू म्हटले तर सोडता येत नाही.  त्यामुळे रामदासांना रामरूप धनाची लूट करणे शक्य होते.

अभंग--७७

माझा स्वामी आहे संकल्पापरता । शब्दीं कैसी आतां स्तुति करु स्तुति करुं जातां अंतरला दूरी । मीतूंपणा उरी उरों नेदी उरों नेदी उरी स्वमी सेवकपण । एकाकीं आपणाऐसें केलें केले संघटण कापुरे अग्नीसी । तैसी भिन्नत्वासी उरी नाहीं उरी नाही कदा रामीरामदासा । स्वये होय ऐसा तोचि धन्य

भावार्थ--

संत रामदास या अभंगात देव भक्तांमधील अद्वैत भावनेची उकल करून सांगत आहेत की त्यांचा स्वामी श्रीराम मनाच्या संकल्प विकल्पाच्या पलीकडे आहे. राम कथा ऐकून श्रीरामाच्या गुणांची स्तुती करावीशी वाटते पण शब्दांशिवाय स्तुती करता येत नाही त्यात द्वैत निर्माण होते. दर्शन होताच मन राम रूपात विरून जाते तेथे मी तूं पणा, स्वामी सेवक पणा उरतच नाही. द्वैत संपून जाते जसे कापूर व अग्नि क्षणात समरस होतात.  कापराचे भिन्नत्व पूर्णपणे विलयास जाते तसेच रामदास स्वतः रामरूप बनून जातात ते धन्य होत असे संत रामदास म्हणतात.

अभंग--७८

कांहीं दिसे अकस्मात । तेथें आलें वाटे भूत वायां पडावें संदेहीं । मुळीं तेथें कांहीं नाहीं पुढे देखतां अंधार । तेथें आला वाटें भार झाडझुडूप देखिलें । तेथें वाटे कोणी आलें रामदास सांगे खूण । भितों आपणा आपण

भावार्थ--

या अभंगात माणसाला भ्रम कशामुळे होतो व त्याचे निरसन कसे करावे याविषयी संत रामदास सांगत आहेत.  काही वेळा अकस्मात एखादी अस्पष्ट आकृती दिसते ते भूतच आहे असा भ्रम होतो.  वाटेवर अंधारातून जात असताना समोरून कोणीतरी येत आहे असे वाटते.  जंगलातील झाडे सजीव प्राण्यासारखी भीतीदायक वाटतात संत रामदास म्हणतात जेथे काहीही नसताना काहीतरी असल्यासारखे वाटणे हे सारे कल्पनेचे खेळ आहेत.  आपण आपल्याच सावलीला घाबरावे त्यातलाच हा प्रकार आहे.

अभंग--७९

वाजे पाऊल आपुलें । म्हणे मागें कोण आलें कोण धांवतसें आड । पाहों जातां जालें झाड भावितसे अभ्यंतरीं । कोण चाले बरोबरी शब्दपडसाद ऊठिला । म्हणे कोण रे बोलिला रामीरामदास म्हणे । ऐसीं शंकेचीं लक्षणे

भावार्थ --

या अभंगात संत रामदास मनात येणार्‍या शंका-कुशंकांची लक्षणे सांगत आहेत चालताना आपल्याच पावलांचा आवाज ऐकून आपल्या मागे कुणीतरी येत आहे अशी शंका येते.  चालताना कुणीतरी आपल्या बरोबर चालत असल्याचा भास होतो.  विचारांती ते झाड आहे हे समजतें शब्दांचा प्रतिध्वनी ऐकू येतो व कुणीतरी बोलतो असे वाटते की सर्व शंकेची लक्षणे आहेत.

अभंग--८०

शक्ति आहे तों करावें विश्व कीर्तनें भरावें पुण्यवंत तो साक्षेपी । आळशी लोकीं महापापी आपुलाचि घात करी । सदा कठोर वैखरी माणुस राजी राखों नेणें । त्यास न मानीती शहाणे गुणें माणूस भोंवतें । अवगुणानें थितें जातें दास म्हणे भला भला । जेथें तेथें पवाडला

भावार्थ--

प्रत्येकाने आपल्या शक्तीप्रमाणे काम करावे उद्योगी पुरुष पुण्यवान तर अशी आळशी महापापी होय. ज्याचे बोलणे कठोर असते तो आपणच आपला घात करत असतो.  ज्याला माणसाचे मन जिंकता येत नाही तो शहाणा समंजस असत नाही.  गुणांनी माणूस आवडते अवगुणांनी त्याला कमीपणा येतो.  संत रामदास म्हणतात त्याचे सर्वत्र पोवाडे गायले जातात स्तुती केली जाते तो माणूस भला समजावा.

N/A

References : N/A
Last Updated : March 11, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP