मंदिरच्यां आवारांत पार एक पिंपळाचा ।
पक्षीगण जमोनीयां, ध्यास घेतला देवाचा ॥
वारकर्यांचे भजन, सदा पडतसें कानीं ।
भारावले पक्षीगण, देव त्यांच्यां ध्यानींमनीं ॥
पोपटानें बांधियेला, गंडा काशीचा गळ्यांत ।
मुखीं, `विठ् विठ्' बोल, सदां राहीं, त्या नादांत ।
हिंडतानां डुंबताना, मुखीं हाच असे भाव ।
चिमाकाकी येती पुढे, तोंडीं नाम `शिव, शिव' ॥
राख फासोनिया अंगीं, साधू पारवा येतसे ।
देवरुप होवोनियां, नाचूं, धुमू लागतसे ।
जीवनांत चैन सुख, हौस सदा नटायांची ।
सर्व आता सोडियेले, भूक विठ्ठल नामाची ॥
कबूतरीण बाई त्या, येती शुभ्र वसनांत ।
नेत्र मिटोनीं, पिसारा, करी देवाच्या पुढ्यांत ॥
`काका' कावळे धावले, शुध्द गेली पाहोनीया ।
`धाव पाव, धाव पाव' आळवितीं, विठूरायां ॥
घारुताई म्हणे, माझे चित्त होते, पिल्लापाशीं ।
तूच देवा, एक आतां, तुला शोधिते आकाशीं ॥