सूर्य चंद्राची प्रभा, प्रासादी पसरे प्रांगणीं
कवडसे डोकावताती, त्यां खोपटीं आढयांतुनी ॥
हात जोडी मेघराजां, आकाशिं डोळे कृषिवलाचें ।
`पर्जन्य' आज्ञापत्र निघते, विद्युल्लतेच्या स्वाक्षरीचे ।
`सरळ ते' जगतात जगणे, अन् तसे चालायाचे ।
वळण येतां मार्ग चुकतो, पायीं तो काटा रुते ॥
राहिली अजुनीहि आहे, `स्तुति' कुमारी कन्यका ।
सज्जनां ती नावडे, अन् ना वरी ती दुर्जनां ॥
कोण वश ना होई मानव, तृप्त होता खाऊनीं ।
काढितो मधुस्वरांसी, तो मृदंगहि लेपनीं ॥
दान करि ना मूढ तो, दारिद्र्य येईं जर कधीं ॥
जे हाती ते टाकुनि, अनिश्चिताच्या पाठीलागी ।
नष्ट होई जवळीचे अन् हाती न गंवसे काहीही ॥
जी पुस्तकांत राही, ती विद्या, धन दुजाहाति गेले
विद्या, धन दोन्हीही, उपयोगी ना प्रंसगी ते पडले
ती योजने सहस्त्रहि, मुंगी हळुहळुहि मार्ग आक्रमिते
परि जागचा न हाले, पद एकहि गरुड तो न जाऊ शके
शरदीं मेघ न वर्षति, वर्ष, वर्षाऋतूत ना गर्जे
वाचाळ अधम कृति नच, सुजन कृतिकरीं, न बोल ये वाचे
हळू हळू घट भरतो, पडत राहि जल तयांत थेंबांनें ।
विद्या, धर्म, धन सकल, हाचि नियम सारखाचि अनुसरणे ॥
उपदेशानें मूढां, शांत न हो कोप, उलट वाढतसे ।
सर्पास दुग्ध देणे, विष वाढविणेच होय ते जैसे ॥
जाणि गुणासीं विरळा, करी मैत्री निर्धनासवें विरळा ।
परकार्यरतहि विरळा, परदु:खें दु:खि हो असा विरळा ॥
नाक्षर बनतो मंत्र न, मूळी ना औषधीं, नसे शक्य ।
योग्य न पुरुष नसे कधि, वाण असे, योजना न करीं अशक्य
जुने न सकलहि सुंदर, काव्य नवे, म्हणुनि कां अयोग्य ?
सज्जन करुनि परीक्षा मूढातें कधि वाटे योग्य ?
विद्या व्याकरणाविन, भंग, नाव घे नदी तरुनि जाया ।
अपथ्य करिं, औषधि घे, या परि तीनहि अयोग्य अन् वाया ॥
षट्कर्ण ऐकि गुपित न, स्थिरराही चार कर्ण जे ऐकीं ।
कर्ण दोन जे जाणिति, थांग न लागेल ब्रह्म देवासीं ॥
करी सुवासिक, दोनहि हातांना अंजलीतली पुष्पे ।
वृत्ती ही सुमनाची, डाव्या उजव्यास सारखी राहे ॥
नभ शक्ती पक्षांची, मत्स्यांचे बल असे जला माजी ।
नृपति, दुर्बलां शक्ती, बालक-करी रडण्याने माता राजी ॥
भरला घट शब्द न करीं, घट अर्धा बुडबुडतो ।
कुलीन बुध, गर्व न करि, निर्गुण मूढहि सदाच बडबडतो ॥
देशोदेशी हिंडे, विद्वानांच्याच संगतीं राही ।
तैलबिदु पाण्यांवरि, विस्तारित बुध्दि त्याचिया जाई ॥
देयीं रवी न चटका, उंचवटा वाळुचा जसा देईं ।
दुसर्यामुळें पदाला स्थिर जो, दु:सह नीच तो होई ॥
झेपे शिशु सिंहाचा गंडस्थळिं मत्तही गजांवरतीं ॥
धीर गमवि मनुजाचा, चेंडुसारखा पुन्हा उशी घेयीं ।
वर्तन कमकुवताचें, जणु ढेकुळ मातिचे जली जायी ॥
स्वस्थानीं नक्र वसें, ओढी गज-राज-पाद `जली' जैसा ।
परि स्थान-भ्रष्ट झाला, श्वान मुखीं, व्यर्थ पडतसे तैसां ॥