शिक्षक, गुरुजन, आध्यापक, जरि शब्द मुखीं येती ।
गुरुमूर्ती सात्वीक तरल ती, विद्यार्थ्यापुढतीं ।
आभ्यासू, रत सदा शिक्षणीं, वाहुनि वृत्त घेणे ।
`शिष्यगणांचे भविष्य उज्वल' हेच हृदयिं धरणे ।
गुरुदक्षिणा निर्वाहाला, साधन हे होत ।
परी कधीं ना, `मनांत यांच्या, व्हावे धनवंत ।
एकच अभिलाषा या जगती विद्यादानाची ।
विद्यार्थ्याचे उच्च जीवनीं, कृतार्थ होण्याची ।
ठेवुनिया आदर्श पुढतिया, जीवनपट पुढतीं ।
`राम' आणिला ज्ञानर्जनिं, अन् भूषविले विद्यार्थी ।
सुसंस्कृताचा पंडित, जोपासीत अचार्यकुलां ।
आयुष्याच्या, संध्यासमयीं, विद्या-देवीला ।
शिष्याकरवीं, पराजयातें, द्विगुणित यश व्हावे ।
शिष्यवरातें पुरी करीं ती, वांछा सद्भावे ।
आज सुमंगल, समयीं यांच्या अंजलि दानाचीं ।
देवीला वाहतो, साक्ष ही, विशाल हृदयाचीं ।
सुशील दांपत्त्यास लाभले, हेच समाधान ।
आयु सुखाचे अन् शांतीचे, असे भाग्यवान ।