ताई, तुझिया अंगणीं, शरदाचे चांदणे ।
शांत, शीतल प्रभेचे, सुधा तुषार शिंपणे ॥
रुंजी मातेच्या भोवतीं, धावे हरीण शावक ।
गूज चालते बाळाचे, नसे उसंत, दे हाक ॥
गेहीं तुझ्या ओसंडतो, समाधानाचा विजर ।
गोडबोल, कौतुकाचे, वीणा झंकार, आशय ॥
डोकावतां कधी दारीं, दिसे नीलिमा नितळ ।
विश्वासानें विहरती, पिले, कानीं, किलबिल ॥
उंच मारितां भरारी, शिकवणी विजयाची ।
हाच उपदेश पिला, कक्षा वाढंवी ज्ञानाची ॥
घेतला तू वसा, ताई, शब्द मधुर बोलाचा ।
खेळे आनंद भोवती, गृहीं ठेवा हा तृप्तीचा ।
अंगणीचा फुलबाग, पुष्पगंध उधळीतो ।
संगे मालतीचा वेल, वार्यावरीं गे डोलतो ॥