मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय ३७ वा

स्कंध १० वा - अध्याय ३७ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


४३३
शुकोक्ति पुढती ऐकूनि घ्या प्रेमें । कंसाच्या वचनें केशीदैत्य ॥१॥
होऊनियां अश्व फोडीत किंकाळ्या । गोकुळांत आला क्रूरभावें ॥२॥
गमनें तयाच्या धरणी कंपित । मनासम वेग दैत्याचा त्या ॥३॥
निनादूनि जाई त्रैलोक्य नादानें । फुगवी डौलानें वक्षस्थळ ॥४॥
फुरफुरवीत येई नासिकेतें । आयाळेंचि केलें घोर कृत्य ॥५॥
विमानें देवांची आदळती मेघीं । मेघही विमानीं धडक्या देती ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसा केशी दैत्य । येई गोकुळांत सकलां भय ॥७॥

४३४
कंसरिपु कृष्णा शोधीत तो हिंडे । कंप गोकुळांतें अवघ्या तदा ॥१॥
वृत्त तें कृष्णासी कळतां तो त्यासी । म्हणे ये भेटीसी त्वरित माझ्या ॥२॥
ऐकूनि तें दैत्य गर्जना सिंहाची । करुनि कृष्णासी पाही क्रोधें ॥३॥
विक्राळ वदन पसरूनि धांवे । दुगाण्या कृष्णातें मारु पाहे ॥४॥
तत्काळ तैं कृष्णें धरुनि चरणीं । दिला भिरकावूनि दूर तया ॥५॥
चार शत हस्त अंतरीं फेंकिला । गरुड जैं व्याळा फेंकी तेंवी ॥६॥
वासुदेव म्हणे किंचित्काळ मूर्च्छा । येई तरी दैत्या फिरुनि शुद्धि ॥७॥

४३५
खवळूनि मुख पसरुनि धांवे । कृष्णासी गिळावें ऐसें इच्छी ॥१॥
तेंचि व्हावें ऐसें इच्छिलें कृष्णानें । तोंचि त्या केशीनें धरिला कर ॥२॥
वामकर मुखीं धरुनि फोडावा । इच्छेनें या चावा घेऊं पाहे ॥३॥
परी लोहभेदें पडताती दंत । प्रकार तैसाच होई तेथें ॥४॥
घशामाजी हस्त घालूनि आपुला । बाहु फुगविला इच्छामात्रें ॥५॥
श्वासोच्छ्‍वास अंतीं कोंडूनियां दैत्य । काढावया हस्त यत्न करी ॥६॥
परी विफल ते जाहले प्रयत्न । अंतीं जाई प्राण निघूनियां ॥७॥
वासुदेव म्हणे हर्षे तदा देव । सुमनवर्षाव करितो बहु ॥८॥

४३६
त्रिकालज्ञ तदा नारद पातले । एकांतीं पाहिलें श्रीकृष्णासी ॥१॥
जोडूनियां कर बोलले तैं कृष्णा । यादवभूषणा, वासुदेवा ॥२॥
अग्नि काष्ठामाजी असूनिही गुप्त । तैसा तूं अव्यक्त सर्व ठायीं ॥३॥
चालक तैं साक्षी तूंचि सकलांचा । गुणांचा निर्माता गुणातीता ॥४॥
केशीवधें झाला देवांसी संतोष । कल्याण सर्वत्र त्वत्कृतीनें ॥५॥
वासुदेव म्हणे स्तवूनि यापरी । चिंतूनि अंतरी वदले मुनि ॥६॥

४३७
देवा, अद्यचि अक्रूर । भक्त या स्थळीं येईल ॥१॥
उदयीक मथुरेसी । वास घडेल तुजसी ॥२॥
तृतीय दिनीं तव हस्तें । मृत्यु येईल दैत्यांतें ॥३॥
देवा, चाणूर, मुष्टिक । कुवलयापीड गज ॥४॥
शंखासुर, यवनासुर । मुरदैत्य, नरकासुर ॥५॥
वध यांचाही पुढती । देवा, दिसेल आम्हांसी ॥६॥
पारिजातकहरण । इंद्रपराभव जाण ॥७॥
राजकन्यांचे विवाह । पुढती कथी वासुदेव ॥८॥

४३८
नृगोद्धार तेंवी स्यमंतकास्तव । जांबवंत युद्ध पुढती पाहूं ॥१॥
मृतपुत्रसंजीवन त्या पुढती । पौंड्रकवधादि विक्रम ते ॥२॥
राजसूययज्ञीं शिशुपालवध । काव्याचे विषय होतील ते ॥३॥
पार्थाचा सारथी होसील पुढती । पाहीन ते कृति प्रत्यक्ष मी ॥४॥
सत्यसंकल्प तूं स्वानंदनिमग्न । देवा, ज्ञानपूर्ण रुप तुझें ॥५॥
कदाही तुजसी नसे भवबाधा । नमस्कार माझा अजा, घेई ॥६॥
वासुदेव म्हणे बोलून नारद - । जातां, काननांत रमला कृष्ण ॥७॥

४३९
राया, परीक्षिता लीला श्रीहरीच्या । अवर्णनीय त्या शेषातेंही ॥१॥
एकदां वनांत ‘शेळ्या-मेंढया’ नामें । खेळ श्रीहरीनें आरंभिला ॥२॥
कोणी शेळ्या, कोणी रक्षक, तस्कर - । होती, गोपबाळ आनंदानें ॥३॥
मयासुरपुत्र तदा व्योमासुर । कपटचतुर शिरला त्यांत ॥४॥
तस्कर होऊनि उचली मेंढ्यांसी । प्राय: सकळांसी नेई दूर ॥५॥
गुहेमाजी एका ठेविलें नेऊनि । शिळा बैसवूनि द्वारीं एक ॥६॥
अंतीं क्रीडेमाजी राहिलें चारचि । पाहूनि कृष्णासी कळलें वृत्त ॥७॥
वासुदेव म्हणे तस्कर वृकासी । तदा जगजेठी धरी स्वयें ॥८॥

४४०
शुकमहामुनि कथिती रायातें । आश्रय जयातें श्रीहरीचा ॥१॥
तयालागीं कोण देऊं शके दु:ख । मुक्तीस्तव दैत्य यत्न करी ॥२॥
परी सर्पमुखीं मूषकाचे यत्न । अवस्था ते जाण तैसी होई ॥३॥
अंतीं विक्राळ तो प्रगटला दैत्य । न सोडी अच्युत परी तया ॥४॥
मगरमिठी ते कृष्णाची न सुटे । व्याकुळ दैत्याचे प्राण अंतीं ॥५॥
वासुदेव म्हणे आदळूनि दैत्य । अंतीं करी मुक्त कृष्ण त्यासी ॥६।

४४१
पाहूनि तो चमत्कार । देव करिती आश्चर्य ॥१॥
दैत्यवधोत्तर हरि । येई गुहेच्या त्या द्वारीं ॥२॥
लत्ताप्रहारेंचि शिळा । भग्न करुनि गोपाळां - ॥३॥
मुक्त करुनि क्षणार्धे । हरी संकट तयांचें ॥४॥
वासुदेव म्हणे लीला । थक्क करिती जगाला ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP