मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय ३३ वा

स्कंध १० वा - अध्याय ३३ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


३८८
ऐकूनि तें गोपी पावल्या संतोष । स्पर्शे विरहदु:ख दूर त्यांचें ॥१॥
कृष्णाज्ञेनें होती रासक्रीडामग्न । पुढती धरुन मंडलातें ॥२॥
एकमेकींचे त्या धरुनियां कर । जाहल्या तत्पर क्रीडेलागीं ॥३॥
गोपींइतुकींच घेऊनियां रुपें । तुष्ट करी त्यांतें जगन्नाथ ॥४॥
एकेकीच्या आड राहूनियां उभा । करीतसे क्रीडा विश्वकंद ॥५॥
लीलाविग्रही तो कृष्णभगवान । खेळामाजी मग्न गोपींसवें ॥६॥
वासुदेव म्हणे विमानांची दाटी । करुनियां येती गगनीं देव ॥७॥

३८९
पाहूनियां गोपींसवें कृष्ण खेळे । आनंदित झाले देव नभीं ॥१॥
दुंदुभीच्या नादें वर्षती सुमनें । अप्सराही प्रेमें करिती नृत्य ॥२॥
गंधर्वही गाती श्रीहरीचे गुण । भाग्याचें वर्णन काय व्हावें ॥३॥
नूपुरें कंकणें वाजती गोपींचीं । साथ घागर्‍यांची तया होई ॥४॥
कमरपट्ट्यांच्या आश्रयें त्या नृत्य । करुनियां नाद करिती बहु ॥५॥
नादमय तेणें जाहलें तें स्थान । नाचे नादब्रह्म ऐसें वाटे ॥६॥
वासुदेव म्हणे सालंकृत गोपी । दंग नृत्यामाजी होती तदा ॥७॥

३९०
कनकमण्यांत शोभे नील रत्नमणी ॥
तेंवी गोपींमाजी शोभे तदा चक्रपाणी ॥१॥
एक गोपी, एक कृष्ण, एकामागें एक ॥
कृष्ण विद्युल्लतेमाजी शोभे नीलमेघ ॥२॥
अलंकारयुक्त हस्त-पाद गोपिकांचे ॥
मागें पुढें होती तेचि सौदामिनी भासे ॥३॥
नृत्य, पदन्यास हावभाव ते करांनीं ॥
सलील कटाक्ष हर्षे फेंकिती हर्षूनि ॥४॥
कटिप्रदेशीं वांकती सांवरिती वस्त्रें ॥
आंवरितां पयोधर हालती कुंडलें ॥५॥
वासुदेव म्हणे ऐसी धांदल तयांची - ॥
होई, दंग होऊनियां जातां क्रीडेमाजी ॥६॥

३९१
कृष्णगीतध्वनि तोचि मेघनाद । घर्मबिंदु तोच जलवर्षाव ॥१॥
गातां नाचतां त्या उच्च स्वर येई । भरुनियां जाई गगन तेणें ॥२॥
भिन्न स्वरें गातां एका गोपीप्रति । वाहव्वा तिजसी म्हणे कृष्ण ॥३॥
नेणूनि तो अर्थ वाढवूनि स्वर । विनोद साचार करी तेथें ॥४॥
तदा कृष्ण देई धन्यवाद तिज । एक होई श्रांत करितां क्रीडा ॥५॥
स्कंधावरी हस्त ठेविला कृष्णाच्या । तयावरी तिचा पडला भार ॥६॥
वेणी-करांतील गजरेही सैल । होती, भूमीवर गळती पुष्पें ॥७॥
वासुदेव म्हणे अन्य एक उभी । स्कंधीचाचि चुंबी कृष्णकर ॥८॥

३९२
कर्णभूषणांची कांति । विराजली ज्या कपोलीं ॥१॥
कपोलासी तो कपोल । भिडवी इतुक्यांत एक ॥२॥
साधूनि ते संधि कृष्ण । देई तांबूलचर्वण ॥३॥
शोभताती कमलें कर्णी । गजरे ज्यांच्या वेण्यांतूनि ॥४॥
करस्थित कंकणांचा । तेंवी नाद नुपूरांचा ॥५॥
कुरळ्या केशांनीं संयुक्त । वदनचंद्र घर्मयुक्त ॥६॥
भाग्यवती ऐशा गोपी । रंगूनियां कृष्णगीतीं ॥७॥
करिती यथेच्छ क्रीडेतें । लक्ष्मीकांत वश त्यांतें ॥८॥
वासुदेव म्हणे भाग्य । येई कृपेनें उदयास ॥९॥

३९३
क्रीडासक्त ऐसा होतां भगवान । राहिलें न भान गोपींप्रति ॥१॥
वस्त्राभरणेंही जाहलीं शिथील । राया, हें नवल मानूं नको ॥२॥
देवांगनाही त्या मोह्तिअ विमानीं । केवळ पाहूनि रासक्रीडा ॥३॥
मग ज्या नक्षत्र होत्या हरीसवें । कां रे न हरावें भान त्यांचें ॥४॥
स्वयेंचि शर्वरी मोठया शरत्कालीं । परी तारावली भ्रमली वाटे ॥५॥
रासक्रीडामग्न विसरले भान । गुरु-शुक्रही न अस्ता जाती ॥६॥
गोपीधर्मबिंदु पुशी निजवस्त्रें । ऐसें गोपिकांतें सौख्य देई ॥७॥
अत्यानंदें तदा फेंकूनि कटाक्ष । करिती स्वागत प्रभुचें गोपी ॥८॥
वासुदेव म्हणे वृत्ति त्याचि गोपी । लीन कृष्णपदीं होतां मुक्ति ॥९॥

३९४
राया, क्रीडाश्रांत गज, जलक्रीडा । करी, तैं मुकुंदा रुचलें तेंचि ॥१॥
गोपींसवें करी उदकप्रवेश । जलक्रीडादंग होई कृष्ण ॥२॥
अंगसंगम्लानकुंकुमचर्चित । पुष्पमालागंध सुटला तदा ॥३॥
मागोमाग तेणें धांवे भ्रमरावली । वाजंत्रीं वाजलीं गुंजनांचीं ॥४॥
एकेमेकांवरी जल उडवूनि । हांसूनि खेळूनि रमती जळीं ॥५॥
क्रीडा ते पहाया विमानांची दाटी । होइ पुष्पवृष्टि तयावेळीं ॥६॥
पुढती करिणींसवें गजराज । वनांत विहार करी जेंवी ॥७॥

३९५
पुष्पसुगंधित जल । तैसेंचि तें रम्य स्थळ ॥१॥
शरदऋतूचें चांदणें । अति निर्मल तें जाणें ॥२॥
ऐशावनीं सर्व रात्र । निरोधूनि निजवीर्य ॥३॥
जगन्नाथ करी क्रीडा । अलौकिक त्याची लीला ॥४॥
वासुदेव म्हणे ऐसें । बल जिंकितां कामातें ॥५॥

३९६
ऐकूनियां ऐसें रासक्रीडावृत्त । होई परीक्षित शंकामग्न ॥१॥
म्हणे मुनिराया, धर्मरक्षणार्थ । श्रीकृष्ण मनुज रामासवें ॥२॥
बोधूनि जनांसी आचरुनि स्वयें । सकळ रक्षावे सदाचार ॥३॥
अधार्मिकांलागीं करावें शासन । हेतु हा धरुन आला कृष्ण ॥४॥
ऐसें असूनियां यापरी अनर्थ । परस्त्रीसंभोगरुप झाला ॥५॥
निंद्यकर्म ऐसें कृष्णें केंवी केलें । यास्तव अडलें कार्य काय ॥६॥
पूर्णकामासी हे इच्छा केंवी झाली । शंका हे करावी दूर माझी ॥७॥
ऐकूनियां शुक देती प्रत्युत्तर । कथी वासुदेव तेंचि आतां ॥८॥

३९७
राया, ब्रह्मा, इंद्र, चंद्र, विश्वामित्र । ऐसे थोर थोर पुरुषश्रेष्ठ ॥१॥
लंघूनि हा धर्म परस्त्रीसवन - । रुप, निंद्यकर्म करिते झाले ॥२॥
अमेघ्य वस्तुही जाळूनियां अग्नि । निर्दोषचि जनीं अनुभव हा ॥३॥
तेंवी तेजस्व्यांसी दोष न या कर्मे । न जावें सामान्यें परि या मार्गे ॥४॥
देहही जयांच्या नसेचि स्वाधीन । हीन पराक्रम परतंत्र ते ॥५॥
ऐशामागें जातां पावतील नाश । शिवासम सह्य विष कोणा ॥६॥
वासुदेव म्हणे निवेदिती शुक । चालतां हा पंथ मूढ नष्ट ॥७॥

३९८
आचार न कदा असो देवांसम । प्रमाण वचन असो त्यांचें ॥१॥
ज्ञानवैराग्यादि ऐश्वर्यसंपन्न । कथिती वचन तेंचि हित ॥२॥
कथितील जैसें वागतीच तैसें । राया, प्रत्ययातें ऐसें न ये ॥३॥
यास्तव जो जुळे वचनासी त्यांच्या । आचार हिताचा सामान्यां तो ॥४॥
म्हणसील ऐसें कां ते वागताती । तरी घे ममोक्ति ध्यानीं आतां ॥५॥
वासुदेव म्हणे निवेदिती मुनि । असावें तें ध्यानीं निरपेक्षत्वें ॥६॥

३९९
राया, अहंकारविहीन पुरुष । इहपर सौख्य इच्छिती न ॥१॥
अथवा तयांच्या अधर्मे अनर्थ । दु:खही न प्राप्त कवणा तेणें ॥२॥
केवळ प्रारब्धभोगरुप कर्म । करी निरसन प्रारब्धाचें ॥३॥
ईश्वरावांचोनि अन्याची हे स्थिति । पाप ईश्वरासी नसे कदा ॥४॥
भक्तही जयाचे कर्मबंधयुक्त । प्रत्यक्ष तयास काय बाधा ॥५॥
विरुद्धही कर्मे दोष न तयासी । आतां ऐक दृष्टि अन्य देतों ॥६॥
वासुदेव म्हणे भ्रमनिरासार्थ । स्वीकारिती शुक मार्ग अन्य ॥७॥

४००
पतींसवें गोपी स्वयें जो नटाला । लावील तयाला दोष कोण ॥१॥
नव्हे त्याचा देह सामान्यासमान । कृष्ण पूर्णकाम ध्यानीं असो ॥२॥
आचरितां त्याचा मार्ग नित्य ध्यानीं । भेद हा घेऊनि असणें योग्य ॥३॥
दुराचारी कोणी स्वदुष्टवर्तन । म्हणे कृष्णासम, तरी दोष ॥४॥
कारण त्या गोपी असतां क्रीडेंत । पतीही सन्निध मानिती त्यां ॥५॥
यास्तव तयांनीं निंदिलें न कृष्णा । सामर्थ्य सामान्यां नसे ऐसें ॥६॥
ऐसेंही असूनि जातां याचि पंथें । विनाश तयांतें निश्चय हा ॥७॥
वासुदेव म्हणे श्रेष्ठ ते श्रेष्ठचि । सामान्यांचि दृष्टि अपुरी तेथें ॥८॥

४०१
राया, ऐशा क्रीडेमाजी गेली रात्र । चतुर्थ प्रहर प्राप्त झाला ॥१॥
तदा गोपींप्रति बोले शार्ड्गपाणी । गोपींनो, सदनीं जावें आतां ॥२॥
सोडूनि कृष्णासी जाववे न त्यांसी । परी अंतीं जाती परम कष्टें ॥३॥
रासलीलावृत्त ऐकेल जो राया । भक्तिभाव तया प्राप्त होई ॥४॥
जितेंद्रियत्वें तो जिंकील कामासी । कदा न तयासी काम बाधे ॥५॥
वासुदेव म्हणे हृदयीं श्रीरंग । प्रगटतां, न रुचे तया ॥६॥

अभंग-भागवत सप्ताहाचा चौथा दिवस समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP