मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय १५ वा

स्कंध १० वा - अध्याय १५ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१८९
षष्ठ सप्तम वर्षांचे । राम-कृष्ण होते साचे ॥१॥
सवंगड्यांसवें आतां । चारिती ते धेनुमाता ॥२॥
पादरजें वृंदावन । तदा तयांच्या पावन ॥३॥
समयीं एका वृंदावनीं । घुमला मुरलीचा ध्वनि ॥४॥
बळिरामासवें कृष्ण । शोभविती वृंदावन ॥५॥
वासुदेव म्हणे शोभा । अपूर्व ती वर्णूं आतां ॥६॥

१९०
वृंदावनीं पशु-पक्षी मृगांचे कलप ।
भृंग गुंजती त्या ठायीं अहो जागोजाग ॥१॥
निर्मल उदकपूर्ण सरोवरामाजी ।
अंबुजें फुललीं त्यांचा गंध वायु फेंकी ॥२॥
रम्य हरित तृणाची शोभा वर्णवेना ।
प्रफुल्लित वृक्षलता डोलती त्या स्थाना ॥३॥
पुष्पफलाकीर्ण वृक्ष वांकूनि भूमीसी ।
कृतज्ञचि होऊनि कीं वाटे ते वंदिती ॥४॥
वासुदेव म्हणे ऐसें आल्हादक स्थान ।
पाहूनि उत्साह पावे क्रीडेस्तव कृष्ण ॥५॥

१९१
हांसूनि तैं कृष्ण बोले रामाप्रति । देवश्रेष्ठा, ऐसी योनि देवां - ॥१॥
लाभली, ज्या पापें क्षालनार्थ त्याच्या । आमुची हे पूजा करिती प्रेमें ॥
यशचि हें तव रामा, गाती भृंग । गुंजन जनांस वाटे परी ॥३॥
ऋषिचि हे भृंग असावे या ठाईं । मयूर हे पाहीं करिती नृत्य ॥४॥
रामा, या हरिणी गोपींसम प्रेम । करुनि, सन्मान करिती तव ॥५॥
रंजवी तुज हा कोकिलांचा शब्द । तात्पर्य आदर्श आतिथ्य हें ॥६॥
वासुदेव म्हणे मानद मुकुंद । सकल श्रेष्ठत्व अर्पी रामा ॥७॥

१९२
रामा, तुझा पादस्पर्श । आणी भूमीतें धन्यत्व ॥१॥
वृक्षवल्लीही त्या धन्य । स्पृष्ट चरणरज:कण ॥२॥
कृपाकटाक्षें कृतार्थ । रामा, सरिताप्रवाह ॥३॥
धन्य धन्य पशु-पक्षी । धन्यता या पर्वतांसी ॥४॥
लोलुप ते लक्ष्मी जेथ । वक्ष:स्थळ तें गोपींस- ॥५॥
लाभूनि, त्या होती धन्य । रामा, ऐसे सकल धन्य ॥६॥
वासुदेव म्हणे कृष्ण । बोले रामासी वचन ॥७॥

१९३
ऐसा तुष्ट हरी यमुनेच्या तीरीं । वत्सांसवें चारी धेनूंप्रति ॥१॥
सवंगड्यांसवें स्वयें करी क्रीडा । भृंगांसम शब्दां मधुर करी ॥२॥
मयूरापुढती नाचे त्याचिपरी । भिन्न भिन्न करी पक्षीशब्द ॥३॥
ऐकूनि तें हास्यरसा येई पूर । ओरडतां व्याघ्र पळूनि जाई ॥४॥
दूर जातां धेनू हांका मारी त्यांसी । कौतुक गोपांसी तया शब्दें ॥५॥
वासुदेव म्हणे सामान्य बालक । होऊनि अच्युत क्रीडामग्न ॥६॥

१९४
खेळूनि खेळूनि श्रांत होतां राम । घ्यावया विश्राम वनामाजी ॥१॥
गोपअंकी शिर ठेवूनियां झोंपे । पाय चेंपी त्याचे जगन्नाथ ॥२॥
राम-कृष्णांचिया सन्निध नाचती । गाती, मिथ्यायुद्धीं रमती गोप ॥३॥
प्रशंसा तयांची बांधव करिती । स्वयेंही त्या युद्धीं रमती मोदें ॥४॥
श्रांत कृष्ण कदा कोंवळ्या पल्लवीं । गोपांचिया ठेवी अंकीं उसें ॥५॥
वासुदेव म्हणे जगाचा विश्राम । पावतो आराम गोपअंकीं ॥६॥

१९५
अंकावरी ऐसा कृष्ण । प्रेमें करितां शयन ॥१॥
पादसंवाहून गोप । करिताती कितीएक ॥२॥
कोणी पर्णविंझुण्यानें । वारा घालती प्रेमानें ॥३॥
निद्राभंग न करितां । कोणी गाती गोड गीतां ॥४॥
ऐसा लक्ष्मीचा कांत । गोपवेषें काननांत ॥५॥
क्वचित्‍ दावूनि सामर्थ्य । खेळ खेळे जगन्नाथ ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसा । भाग्यकाळ तो गोपांचा ॥७॥

१९६
शुक महामुनि कथिती रायातें । रामकृष्ण ऐसे रमती वनीं ॥१॥
दामा, सुबल तैं स्तोक्‍ कृष्णादिक । एकदां मित्रांस वदले गोप ॥२॥
बाळकृष्णा, सख्या दुष्टनिबर्हणा । जाऊं तालवना ऐसें वाटे ॥३॥
ताडफळें बहु कृष्णा, तयास्थानीं । परी तया वनीं असुर एक ॥४॥
धेनुकासुर तो गर्दभस्वरुपें । दावितो गोपांतें भय बहु ॥५॥
अन्यही राक्षस ते नरभक्षक । मानव न तेथ जाई कोणी ॥६॥
पशु-पक्षीधेनुरहित तें वन । पुष्पफलाकीर्ण रम्य असे ॥७॥
वासुदेव म्हणे गोप त्या वनातें । वर्णिती आनंदें फलेच्छेनें ॥८॥

१९७
मधुर फळांचा कृष्णा, येई गंध । अपेक्षा मित्रांस सकलांची त्या ॥१॥
इच्छिसी तूं कृष्णा, । तरी जाऊं तेथें । ऐकूनियां दोघे उठले बंधु ॥२॥
गोपांसवें जाती तया तालवनीं । वृक्ष हालवूनि अत्यानंदें ॥३॥
पाडूनियां फळें तोष देती गोपां । पाहूनि गर्दभा क्रोध येई ॥४॥
धेनुकासुर तो धांवे रामावरी । प्रहार त्या करी निजलत्तेनें ॥५॥
वक्षस्थळीं ऐसें ताडूनि यापरी । गर्दभ तो करी ध्वनि वेगें ॥६॥
वासुदेव म्हणे यापरी ताडन । करुनि पळून जाई दैत्य ॥७॥

१९८
अल्पावधीमाजी पुनरपि दैत्य । येऊनि रामास ताडूं पाहे ॥१॥
परी त्याचे पाय धरुनि रामानें । अद्भुत दाविलें बाहुबळ ॥२॥
गरगरां तया फिरवी दैत्यासी । गतप्राण अंतीं होई दैत्य ॥३॥
जाणूनियां राम तदा तालवृक्षीं । महावेगें फेंकी कौतुकानें ॥४॥
मोडूनि तैं वृक्ष पडे अन्यावरी । तोही अन्यावरी ऐसे बहु ॥५॥
वासुदेव म्हणे तालवृक्ष ऐसे । जेंवी झंझावातें पडले वनीं ॥६॥

१९९
धेनुकाचा वध पाहूनियां अन्य । राक्षस धांवून येती क्रोधें ॥१॥
गर्दभांची तया होई तीच गति । राम कृष्ण मुक्ति अर्पिती त्यां ॥२॥
ताड, ताडफळें तेंवी दैत्यप्रेतें । मेघ जैं नभातें शोभा देती ॥३॥
धेनुकाचा वध पाहूनि देवांसी । हर्ष होई चित्तीं दुष्टघातें ॥४॥
पुष्पवृष्टि तेंवी दुंदुभीचा नाद । करुनियां व्यक्त करिती हर्ष ॥५॥
वासुदेव म्हणे गंधर्वगायन । करिती, हर्षून तयावेळीं ॥६॥

२००
निर्भय तें तालवन होतां गोप । हर्षे चरायास नेती धेनु ॥१॥
फळेंही अपूर्व भक्षिती आनंदें । बासरीच्या नादें घुमलें वन ॥२॥
ऐसे राम-कृष्ण वाजवीत पांवे । वृंदावनीं आले अत्यानंदें ॥३॥
स्वागत तयांचें करुनियां गोपी । आनंद पावती अंतरांत ॥४॥
वासुदेव म्हणे तदा कृष्णकांति । अपूर्वचि होती कथिती शुक ॥५॥

२०१
रुप गोजिरें तें केंवी वर्णावें कळेना । धूलिमग्न कुरळे केश झांकिती नयनां ॥
मयूरपिच्छें त्यावरी तेंवी रानफुलें । खोंविली मुखारविंदीं स्मितहास्य खेळे ॥
डोळे भरुनि तें रुप पाहताती गोपी । आनंदसागरा त्यांच्या येई तैं भरती ॥
घरोघर गोपबाळ जाती आनंदानें । रोहिणी यशोदा राम-कृष्णां कौतुकानें - ॥
आशीर्वाद देऊनियां उटणें लाविती । तैल मर्दुनी अंगांतें स्नान घालिताती ॥
आवडीसमान वस्त्रें, भूषणें घालूनि । भोजन तांबूलही त्यां तोषल्या अर्पूनि ॥
सिद्ध करुनि मंचकीं प्रेमें पुष्पशय्या । वासुदेव म्हणे गोपी झोंपविती देवा ॥

२०२
निवेदिती शुक, राया परीक्षिता । श्रीकृष्ण एकदां वृंदावनीं ॥१॥
चारितां धेनूंसी होई तृषाक्रांत । जलप्राशनार्थ रामाविण - ॥२॥
यमुनेसी जाई गोपांसमवेत । ग्रीष्मर्तूंत तप्त वाळवंट ॥३॥
गाई-गोपालही तृषाकुल तदा । सेवाया उदका पुढती जाती ॥४॥
कालियाविषानें दूषित उदक । स्नानपानादिक करिती तेथें ॥५॥
नेत्रस्पर्श कोणी, कोणी आचमन । केलें, ते निष्प्राण होती क्षणीं ॥६॥
वासुदेव म्हणे गोप-गाई ऐशा । पडती प्रेतरुपा यमुनातीरीं ॥७॥

२०३
मागोमाग कृष्ण येऊनि तें पाही । म्हणे कोणीं नाहीं आधार यां ॥१॥
मजवीण कोण संरक्षील यांतें । ऐसें दयावंतें चिंतियेलें ॥२॥
अमृतदृष्टीनें पाहूनि तयांसी । आणिली जागृति कृपालेशें ॥३॥
विस्मयें पाहाती तदा ते अन्योन्यां । पाहूनियां कृष्णा हर्षिन्नले ॥४॥
येणेंचि आमुतें वांचविलें ऐसा । निर्धार मनाचा होई त्यांच्या ॥५॥
वासुदेव म्हणे भक्तांचा निर्धार । करी निरंतर दृढ देव ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP