मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय ९ वा

स्कंध १० वा - अध्याय ९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१०१
निवेदिती शुक एकदां नृपाळा । कार्यांत गुंतल्या सकळ दासी ॥१॥
यशोदा स्वयेंचि करी तैं मंथन । करी गुणगान श्रीहरीचें ॥२॥
मनोहर नेत्र भुवया सुंदर । बांधिला पदर कौशेयाचा ॥३॥
मंथनरज्जु तो ओढितां गळती । पुष्पें मोगरीचीं वेणींतूनि ॥४॥
रत्नकंकणांचा होई मधुनाद । वक्ष:स्थल कंप पावतसे ॥५॥
तरल कुंडलें सरल नासिका । घर्मबिंदु मुखा शोभा देती ॥६॥
वासुदेव म्हणे ऐसी ती यशोदा । शोभे कृष्णमाता, घुसळी कुंभ ॥७॥

१०२
मंथन यापरी करितां यशोदास । स्तनपानइच्छा गोविंदासी ॥१॥
हांसत हांसत धरुनिक तो रवी । म्हणे मज घेईं मांडीवरी ॥२॥
पाहूनि कौतुकें प्रेमार्द्र ती झाली । तत्काळ ठेविली रवी खालीं ॥३॥
घेऊनियां अंकीं पाजी जगन्नाथा । दुग्ध उतूं जातां दिसलें तोंचि ॥४॥
तत्काळ तैं बाळा ठेवूनि यशोदा । धांवे दुग्धपात्रा उतरावया ॥५॥
वासुदेव म्हणे तेणें क्रुद्ध कृष्ण । करी लीलाकर्म कैसें पहा ॥६॥

१०३
दधिडेर्‍यावरी घाली वरवंटा । बळेंचि स्वनेत्रां उदक आणी ॥१॥
क्रोधावेशें दंत-ओष्ठहीं चावूनि । गेला एका स्थानीं मंदिरांत ॥२॥
पालथ्या उखळीं चढूनि शिंक्यासी । ओढूनियां भक्षी नवनीत ॥३॥
इकडे यशोदा उतरुनि दूध । येतां भग्न घट दिसला तिज ॥४॥
जाणूनि तें कृत्य माता तया शोधी । बावरी तैं मूर्ति भक्षी लोणी ॥५॥
घेऊनियां यष्टि माता येई ऐसें । दिसलें प्रभूतें तयावेळीं ॥६॥
वासुदेव म्हणे तो जगच्चालक । मानूनियां धाक पळूं लागे ॥७॥

१०४
मारुनियां उडी उखळावरुनि । मातेच्या हातूनि निसटूं पाहे ॥१॥
संयमी योग्यांही दुर्लभ जो तोचि । भिऊनि मातेसी पळूं लागे ॥२॥
जगदाधारा त्या धराया यशोदा । मागोमाग त्याच्या धांव घेई ॥३॥
धांवतां धांवतां सैल होई वेणी । पुष्पें तैं गळूनि पडलीं खालीं ॥४॥
नितंबभारानें होई बहु श्रांत । अंतीं जगन्नाथ धरिला करें ॥५॥
वासुदेव म्हणे भक्तपराधीन । पावतो बंधन ईश प्रेमें ॥६॥

१०५
अपराधें बहु भय शासनाचें । मानूनियां रडे आर्तस्वरें ॥१॥
नेत्र चोळिल्यानें काजळ मुखासी । लागलें, मातेसी अवलोकी तो ॥२॥
बावरले नेत्र ऐशा श्रीकृष्णास । धरुनि करांस ओढी माता ॥३॥
म्हणे थांब चोरा, झोडपितें ऐसी । कैशा करितोसी पाहूं खोडया ॥४॥
पाहूनियां परी घाबर्‍या मुखासी । त्यागूनियां यष्टि स्तब्ध राही ॥५॥
वासुदेव म्हणे पुढती दांव्यानें । बांधावें या म्हणे हेचि शिक्षा ॥६॥

१०६
जेणें व्यापिलें ब्रह्मांड । कैसा बांधावा त्या बंध ॥१॥
परी पुत्र मानूनियां । बांधी यशोदा माधवा ॥२॥
नेऊनियां उखळापाशीं । दांवें गुंडाळी तयासी ॥३॥
दोन अंगुळें तें न्यून । पाहूनियां जोडी अन्य ॥४॥
परी तेंही तितुकेंचि । न्यून पडतां तृतिय जोडी ॥५॥
ऐसीं घेतांही बहुत । दांवीं स्थिति होई तीच ॥६॥
अंतीं प्रयत्न आपुला । व्यर्थ मातेसी वाटला ॥७॥
वासुदेव म्हणे हास्य । येई तदा सकलांस ॥८॥

१०७
यशोदा कृष्णासी बांधी हें ऐकूनि । पातल्या धांवूनि गोपी तेथें ॥१॥
गुंडाळिलीं बहु दांवीं श्रीहरीतें । पाहूनि तयांतें नवल वाटे ॥२॥
दोन अंगुळांची न्यूनता अद्यापि । पाहूनियां गोपी चकित होती ॥३॥
गृहीं आतां दांवें नसे अवशिष्ट । यशोदेसी कष्ट तदा बहु ॥४॥
पाहूनि मातेतें श्रांत, दयामय । द्रवला माधव बद्ध होई ॥५॥
वासुदेव म्हणे मातृभक्त हरी । स्वमाया आंवरी मातेस्तव ॥६॥

१०८
रोहिणी नंदही सदनीं नव्हतीं । असतीं तरी येती न ही वेळ ॥१॥
सकळ जगातें बंधमुक्तकर्ता । बंधनांत कैसा पडला पहा ॥२॥
पुत्रभावें प्रेम पाहूनि द्रवला । स्वयेंचि पडला बंधनांत ॥३॥
निज पुत्र ब्रह्मा, आत्माचि शंकर । भोगी जे विलास नित्य लक्ष्मी ॥४॥
पावलीं तीं तिघें अनुग्रह परी । यशोदेची सरी नसें तयां ॥५॥
वात्सल्यप्रेमाचा रज्जु ऐसा कोणा । एका गोपींविना लाभला न ॥६॥
वासुदेव म्हणे भक्तीचें सामर्थ्य । पडे बंधनांत विश्वाधार ॥७॥

१०९
प्रेमळ भक्तांसी साध्य होई हरी । अन्य अहंकारीं मग्न होती ॥१॥
भक्तप्रेमबद्ध ईश अन्या मुक्त । करी केंवी तेंच कथितों आतां ॥२॥
बांधूनि उखळीं माता कार्यमग्न । जाहली ते जाण गृहामाजी ॥३॥
सोडवील आतां पिताचि आपणां । ऐसें आणी मना बालकृष्ण ॥४॥
चिंतूनियां ऐसें योजी एक युक्ति । अर्जुनवृक्षांसी अवलोकी ॥५॥
‘नलकूबर’ तैं ‘मणिग्रीव’ दोघे । पुत्र कुबेराचे शापदग्ध ॥६॥
ऐश्वर्यमदानें जाहले ते धुंद । यास्तव नारद तयां शापी ॥७॥
वासुदेव म्हणे शापें त्याचि जुळे । वक्ष ते जाहले नंदांगाणीं ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP