मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय ३२ वा

स्कंध १० वा - अध्याय ३२ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


३७७
परीक्षिती भाग्यवंत । निवेदिती त्यासी शुक ॥१॥
ऐशा रडतां रडतां । झाल्या बेभान गोपिका ॥२॥
अंतीं जाहल्या तटस्थ । कृष्ण बहु दयावंत ॥३॥
प्रगटे तदा वनमाळी । पीतपीतांबरधारी ॥४॥
स्मितहास्ययुक्त मुख । मदना लाजवी तें रुप ॥५॥
मृत संजीवित होती । पाहूनियां तया गोपी ॥६॥
वासुदेव म्हणे आतां । सलील त्या करिती चेष्टा ॥७॥

३७८
लीलेनें येऊनि घट्ट आंवळिले हस्त ॥
दुजी चंदनाची उटी लाविते भुजांस ॥१॥
पहा घेतला नियेनें कर स्कंधावरी ॥
चर्वित तांबुल त्याचा एक घेई करीं ॥२॥
विरहज्वरानें तप्त गोपी ती होऊन ॥
पहा बैसली स्ववक्षीं धरुनि चरण ॥३॥
प्रणयविव्हल कोणी आपुलाचि ओष्ठ ॥
चावूनियां कृष्णावरी फेंकित कटाक्ष ॥४॥
दर्शनें अतृप्त मुनि सेविताती नित्य ।
तेंवी टकमकांण पाही पहा गोपी एक ॥५॥
निरखूनि पाही परी तृप्ति न तियेची ।
वासुदेव म्हणे गोपी आनंद लुटिती ॥६॥

३७९
पहा पहा एक भरुनियां नेत्र । पाही जगन्नाथरुपाप्रति ॥१॥
हृदयमंदिरीं मूर्ति ती स्थापूनि । न जावी फिरुनि या हेतूनें ॥२॥
द्वारचि झांकिलें नयन मिटूनि । योग्यासम ध्यानीं मोद पावे ॥३॥
तात्पर्य, संसारतप्त जीव जैसे । शांत इशलाभें तेंवी गोपी ॥४॥
प्रकृत्यादियुक्त शोभे जेंवी ईश । तैसा कृष्णचंद्र गोपींमाजी ॥५॥
निर्विकार कृष्ण, शोकहीन गोपी । मग त्या प्रेमासी तुलना काय ॥६॥
वासुदेव म्हणे कृष्ण वाळवंटी । घेऊनि गोपींसी पुढती गेला ॥७॥

३८०
निर्मल चांदणें तया वाळवंटी । कुंद मंदारांचीं सुमनें बहु ॥१॥
सर्वत्र सुटला त्यांचा परिमल । अलिगुंजारव घुमूनि जाई ॥२॥
ऐसें मनोरम स्थान तें शोभलें । काम्य वेद व्हावे ज्ञानें तृप्त - ॥३॥
तेंवी पूर्णकाम होऊनियां गोपी । आनंद लुटिती दर्शनाचा ॥४॥
पीनपयोधर कुंकुमसंलिप्त । उत्तरीय वस्त्र कांहीं जणी - ॥५॥
अंथरिती प्रेमें बैसाया कृष्णासी । जणुं कोणी योगी करी ध्यान ॥६॥
वासुदेव म्हणे भक्तचिंतामणि । बैसे त्या आसनीं अत्यानंदें ॥७॥

३८१
प्रेमानंदें तया पूजिती तैं गोपी । कांति ते कृष्णाची वर्णवेना ॥१॥
त्रैलोक्यसौंदर्य आलें एक्या ठाई । ऐसी नवलाई करी कृष्ण ॥२॥
हास्यकटाक्षादि लीलायुक्त गोपी । पुढती चेंपिती कर-चरण ॥३॥
गुप्त होऊनियां विरहानळांत । लोटिलें तो क्रोध होता मनीं ॥४॥
परी तयाच्याचि मुखें तें निघावें । पदरीं घालावें माप त्याचें ॥५॥
चिंतूनियां ऐसे बोलती जें गोपी । वासुदेव तेंचि कथन करी ॥६॥

३८२
कृष्णा, कांहीं जन प्रत्युपकारार्थ । राहताती दक्ष सर्वकाळ ॥१॥
निरपेक्ष कोणी उपकाररत । सत्कर्मनिरत असती सदा ॥२॥
कदा कोणाच्याही उपकारासी जे । न येतीचि ऐसे असती कोणी ॥३॥
गुणदोष, फलाफल, या त्रिविध - । लोकांचें सुस्पष्ट करीं कृष्णा ॥४॥
निवेदी तैं कृष्ण सिद्धांत गोपीसी । वासुदेव तोचि कथितो ऐका ॥५॥

३८३
गोपींनो, परस्पर भार दूर व्हावा । यास्तव करावा प्रत्युपकार ॥१॥
ऐसें जे इच्छिती स्वार्थसाधु तेचि । आपणास्तवचि कर्म त्यांचें ॥२॥
लवही न तेथें वसे सत्यप्रेम । तेणें सौख्य - धर्मप्राप्ति नसे ॥३॥
निरपेक्ष तेही जाणावे द्विविध । स्नेहपाशबद्ध अथवा साधु ॥४॥
निरपेक्ष असे साधूंचें वर्तन । तेणें तयां पुण्यलाभ घडे ॥५॥
स्नेहयुक्तांप्रति सौख्यलाभ जनीं । निरपेक्ष कर्मी प्रेमें रत ॥६॥
वासुदेव म्हणे तृतीय प्रश्नाचें । उत्तर कृष्णाचें अभ्यासार्ह ॥७॥

३८४
चतुर्विध जन तृतीय प्रकारीं । जाणावे अंतरीं गोपिकांनो ॥१॥
एक आत्ममग्, अन्य पूर्णकाम । तृतीय ते जन असती मूढ ॥२॥
चतुर्थ जाणावा जन गुरुद्रोही । पाषाणहृदयी कृतघ्नचि ॥३॥
नित्य अंतर्दृष्टि जन ते प्रथम । उपकार त्यां सम, अपकारही ॥४॥
पूर्णकामत्वेंचि द्वितीय ते स्तब्ध । मूढांप्रति बोध असेचिना ॥५॥
चतुर्थांचें काय वर्णावें स्वरुप । उलटेंचि काळिज तयांप्रति ॥६॥
पूज्याचाचि द्रोह आवडे तयांसी । उपकारबुद्धि कैसी व्हावी ॥७॥
वासुदेव म्हणे ऐकूनि तें गोपी । लाविती कसोटी कृष्णासी ती ॥८॥

३८५
बहिर्दृष्टित्वें हा नव्हेचि प्रथम । तेंवी पूर्णकाज्म नव्हेचि हा ॥१॥
वेणुनादें येणें पाचारिलें आम्हां । कर्म पूर्णकामा शोभे न हें ॥२॥
मूढही याप्रति म्हणवे न आम्हां । बहुविध ज्ञाना कथन करी ॥३॥
चतुर्थ कोटीचि योग्य वाटे यातें । खुणावूनि ऐसें हंसती गोपी ॥४॥
वासुदेव म्हणे जाणूनि तो भाव । बोलला माधव ऐका काय ॥५॥

३८६
गोपींनो, न गणा मज या चौघांत । परम सुहृद जगाचा मी ॥१॥
निरंतर ध्यास लागो मद्भक्तांसी । हेचि इच्छा माझी जाणा नित्य ॥२॥
दरिद्र्यासी धन लाभूनियां नष्ट - । होतांचिअ तो ध्यास तया जेंवी ॥३॥
क्षुधा-तृषाही न आठवे त्या तेणें । निमग्न तो जाणें विषयीं त्याचि ॥४॥
तेणेंचि दावूनि दर्शन मी तुम्हां । गुप्त होऊनियां आकर्षिलें ॥५॥
तेणें तन्मयता लाभली तुम्हांसी । लाभ हा भक्तांसी, अन्यां नसे ॥६॥
वासुदेव म्हणे दोषासी यास्तव । पात्र न माधव स्पष्ट कथी ॥७॥

३८७
धर्माधर्मलोकाचार स्नेहपाश । त्यागूनियां मज भेटलांती ॥१॥
खचित हें ओझें झालें मजवरी । केंवी उतराई तुमचा होऊं ॥२॥
सहस्त्रावधीही वत्सरें हें ऋण । प्रयत्नें फेडून न फिटे ऐसें ॥३॥
ऐशाचि प्रेमानें वागूनि ही फेड । करुनि घ्या हेंच इच्छितों मी ॥४॥
भक्त माझे बहु असती त्रैलोक्यीं । सर्वांवरी प्रीति माझी सम ॥५॥
तेणें एकनिष्ठ नसें मी हें सत्य । उपकार श्रेष्ठ तुमचे येणें ॥६॥
वासुदेव म्हणे एकनिष्ठा ऐसी । श्रेष्ठ हेंचि कथी स्वयें कृष्ण ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP