मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध १० वा|पूर्वार्ध|
अध्याय ६ वा

स्कंध १० वा - अध्याय ६ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


६२
उत्पाताचें वृत्त ऐकूनियां नंद । होई भयग्रस्त अंतरांत ॥१॥
नसेल कीं कांहीं संकट गोकुळीं । विचार अंतरीं येती ऐसे ॥२॥
पुत्रास्तव चिंता वाटली तयासी । चिंता ते प्रभूसी म्हणे अंतीं ॥३॥
भार तयावरी टाकूनियां मार्ग- । क्रमी, तदा नंद गोकुळाचा ॥४॥
वासुदेव म्हणे बालकवधार्थ । धाडी एक कंस क्रूर कृत्या ॥५॥

६३
दुष्ट राक्षसी पूतना । जाई वधित बाळांनां ॥१॥
गौळवाडे, नगरें, ग्रामें । धुंडूनियां वधी बाळें ॥२॥
राया, कांपें न अंतरीं । विघ्न न हें भक्तांवरी ॥३॥
विहितकर्मी जो निरत । दंग कथा-कीर्तनांत ॥४॥
विघ्नप्रवेश न तेथें । अन्यत्र त्यां बळ चडे ॥५॥
वासुदेव म्हणे विघ्नें । काय बाधती ईशातें ॥६॥

६४
आकाशगामी ते कामरुपी दुष्टा । पातली गोकुळा रम्य रुपें ॥१॥
लक्ष्मीचि कीं आली दर्शनासी वाटे । मोहक तियेचें ऐसें रुप ॥२॥
वेणीमाजी होतीं मालती कुसुमें । वस्त्र परिधानिलें अमोलिक ॥३॥
एकीकडे कटिपश्चात्भाग स्थूल । पयोधर स्थूल अन्यत्र ते ॥४॥
ऐसी बहु ओढ तेणें कृशकटि । भासली गोपींसी तयावेळीं ॥५॥
रत्नकुंडलांची शोभा अलौकिक । स्त्रियांतेंही मोह रुपाचा त्या ॥६॥
वासुदेव म्हणे नंदगृहीं तेणें । प्रवेश सुखानें पूतनेचा ॥७॥

६५
भस्माच्छन्न अग्नीसम बाळकृष्ण । पाहिला दुरुन पूतनेनें ॥१॥
सर्वज्ञ तो निद्रामिषें राही स्थिर । घेई अंकावर तैसीचि ती ॥२॥
अज्ञानें सर्पासी रज्जु मानूनियां । जेंवी उचलावा तेंवी होई ॥३॥
यशोदा रोहिणी असूनि सन्निध । नाहीं प्रतिबंध केला तिज ॥४॥
मायावी स्वरुपें गेल्या त्या भुलूनि । यद्यपि अंतरीं कालकूट ॥५॥
वासुदेव म्हणे मोहक आकृति । जगीं मोह पाडी सकलांतेंही ॥६॥

६६
महाभयंकर विषलिप्त स्तन । दिधला वदनचंद्रामाजी ॥१॥
तदा क्रुद्ध कृष्णें आंवळूनि स्तन । आरंभिलें पान प्राणांसवें ॥२॥
शोषणें ती त्रस्त होऊनि ओरडे । बाबा, पुरे पुरे ऐसें म्हणे ॥३॥
परी सोडीनाचि कृष्ण यदा स्तन । तदा घामाघूम राक्षसी ते ॥४॥
अंतीं ती पांढरे करुनियां डोळे । ओरडे तैं कांपे भूमंडळ ॥५॥
आकाशमंडळ जाहलें कंपित । सप्त पाताळांत घुमला नाद ॥६॥
वासुदेव म्हणे दशदिशांतूनि । येई प्रतिध्वनि तया नादें ॥७॥

६७
वज्रघातासम भयंकर नाद । येई तदा गोप भयाकुल ॥१॥
अंतीं कासावीस जाहली राक्षसी । मायावी रुपासी त्यागीतसे ॥२॥
विस्तारुनि हस्त, पाद तेंवी मुख । वृत्रासम प्रेतरुप झाली ॥३॥
भूमीवरी देह पडला तो यदा । वृक्षनाश तदा सहा कोश ॥४॥
वासुदेव म्हणे राक्षसीचा देह । वर्णावा प्रचंड केंवी तरी ॥५॥

६८
नांगराचे फाळ दाढा । गुहाचि त्या नाकपुडया ॥१॥
स्तन विशाल खडक । पतित जेंवी पर्वतस्थ ॥२॥
ताम्रवर्णचि ते केश । झाले होते अस्ताव्यस्त ॥३॥
नेत्र भयंकर कूप । वाळवंट ओंतीपोट ॥४॥
महा डोहचि उदर । सेतु हस्त-पाद थोर ॥५॥
ऐसा प्रकार पाहूनि । गोप भयाकुल मनीं ॥६॥
कृष्ण ऐशा प्रेतावरी । लीलेनेंचि क्रीडा करी ॥७॥
वासुदेव म्हणे गोपी । धांवूनियां त्या उचलिती ॥८॥

६९
यशोदा रोहिणीसवें गोपी त्या सत्वरी ।
फिरविती धेनुपुच्छ प्रेमें कृष्णावरी ॥१॥
काढूनि तयाची दृष्ट अन्यही बहुत ।
करिती उपाय, बाधा न होवो हा हेत ॥२॥
घालिती तया कौतुकें गोंमूत्राचें स्नान ।
गोमय गोधूलि एकाठाईं कालवून ॥३॥
केशवादिक द्वादश घेऊनियां नामें ।
टिळे द्वादश लाविती अंगावरी प्रेमें ॥४॥
वासुदेव म्हणे धीर वाटतां पुढती ।
शांत स्वस्थपणें रक्षा करिती सविधि ॥५॥

७०
हस्तपाद प्रक्षालूनि आचमन । करुनियां पूर्ण न्यास केले ॥१॥
अजनामें ईश पायांचें रक्षण । करो मणिमान जानुरक्षा ॥२॥
यज्ञ तो ऊरुचें, अच्युत कटीचें । हयग्रीव याचें उदर रक्षो ॥३॥
हृदय केशव, वक्ष:स्थल ईश । रक्षो सूर्य कंठ, भुजा विष्णु ॥४॥
मस्तकाचे करो रक्षण ईश्वर । वसो चक्रधर अग्रभागीं ॥५॥
बाळपृष्ठभागीं वसो गदाधर । सव्यीं धनुर्धर मधुसूदन ॥६॥
खड्‍गधारी ईश वसो वामभागीं । कोणीं शंखधारी ‘उरुगाय’ ॥७॥
ऊर्ध्वभागीं तुझ्या वसो तो उपेंद्र । राहो तो गरुड अधोभागी ॥८॥
वासुदेव म्हणे आणीकही रक्षा । करिती गोपिका कैसी पहा ॥९॥

७१
सभोंवतीं तुझ्या असो बलराम । इंद्रियरक्षण हृषीकेश ॥१॥
श्वेतद्वीपपति संरक्षो चित्तासी । रक्षो त्वन्मनासी योगेश्वर ॥२॥
पृश्निगर्भ बुद्धि, सर्वगुणाधीश । अहंकार ईश रक्षो तव ॥३॥
गोविंद संरक्षो तुजसी खेळतां । तेंवी झोंप घेतां माधव तो ॥४॥
चालतां वैकुंठपति, बैसतां तो । तुजलागीं रक्षो लक्ष्मीकांत ॥५॥
पिशाच्चाधिपति यज्ञभोक्ता ईश । भोजनीं रक्षक होवो तुझा ॥६॥
ऐकूनि हीं नामें डाकिनी, राक्षसी । बालग्रह तेंवी भूत-प्रेत ॥७॥
पिशाच, यज्ञ त्या पूतना मातृका । विनायक, यक्षां कंप सुटो ॥८॥
वासुदेव म्हणे सर्व दुष्ट ग्रह - । बाधा होवो नष्ट, म्हणती गोपी ॥९॥

७२
पुढती यशोदा पाजूनि कृष्णासी । झोंपवी पालखीं अत्यानंदें ॥१॥
इकडे मथुरा सोडूनियां नंद । येई गोकुळांत गोपांसवें ॥२॥
पाही तें विचित्र प्रेत पूतनेचें । शब्द वसुदेवाचे आठवी तैं ॥३॥
म्हणे हा तपस्वी अथवा पूर्वीचा । पुण्यवंत साचा कोणी ऋषि ॥४॥
पुढती पूतनाशरीर तोडूनि । बाहेर नेऊनि करिती दग्ध ॥५॥
नवलचि तदा जाहलें त्या ठाईं । चंदनाचा येई गंध तेथें ॥६॥
कोण्याही निमित्तें केलें स्तनपान । श्रीहरीनें, धन्य तेणें कृत्त्या ॥७॥
वासुदेव म्हणे दुष्टांसी हे गति । मग सज्जनांसी न्यून काय ॥८॥

७३
जगद्वंद्य ते चरण । अंगावरी जिच्या जाण ॥१॥
उद्धरली ते राक्षसी । ऐसी जयाची महति ॥२॥
धेनुमातांचें वा तेणें । दुग्ध प्राशिलें प्रेमानें ॥३॥
कां न लाभेल तयांसी । सांगा परमश्रेष्ठ गति ॥४॥
देह जाळूनि तो गोप । जाती आनंदें गृहास ॥५॥
मार्गी कळतां सर्व वृत्त । नंद मानी महद्भाग्य ॥६॥
गृहीं येऊनि कृष्णासी । अत्यानंदें घेई अंकीं ॥७॥
गोपही जे नव्हते तेथें । नवल मानिती तें मोठें ॥८॥
कृष्णलीला हे ऐकतां । कृष्णभक्त होई श्रोता ॥९॥
वासुदेव म्हणे भय । भक्त भगवंता काय ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP