स्कंध ३ रा - अध्याय २९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१६५
देवहूती म्हणे कपिला तूं ईश । अज्ञउद्धारार्थ अवतार हा ॥१॥
तत्त्वबोध मज जाहला सुगम । जेणें ईशप्रेम दृढ होई ॥२॥
प्रेमस्वरुप तो कथीं भक्तिमार्ग । जीवाच्या अनेक गति कथीं ॥३॥
सामर्थ्ययुक्त तें काळाचें स्वरुप । निवेदावें मज मुनिराया ॥४॥
जयाच्या भयानें आचरिती पुण्य । नियामक ज्ञान तेंही कथीं ॥५॥
जेणें अंधकूपनिमग्नां विरक्ति - । उपजूनि, चित्तीं मोक्षलाभ ॥६॥
वासुदेव म्हणे मैत्रेय विदुरा । निवेदी हा सारा ज्ञानबोध ॥७॥

१६६
कपिल मातेसी म्हणती हेतूंसम । मार्ग भिन्न भिन्न भक्तीचे या ॥१॥
गुणभेदें मुख्य तीन, ते त्रिविध । ऐसी नवविध कथितों भक्ति ॥२॥
दंभ, मत्सर तैं आवडे ज्या हिंसा । तामसी भक्तीचा प्रकार तो ॥३॥
हिंसायुक्त भक्ति अधम जाणावी । मध्यम गणावी दंभयुक्त ॥४॥
मत्सरसंयुक्ता तामसी उत्तम । प्रकार हे तीन तामसीचे ॥५॥
वासुदेव म्हणे तामस तो भक्त । मानी ईश्वरास स्वार्थास्तव ॥६॥

१६७
उपभोग, कीर्ति, ऐश्वर्यार्थ भक्ति । जाणावी राजसी मध्यम ते ॥१॥
यथाक्रम तेही उत्तम मध्यम । जाणावी अधम त्रिप्रकारें ॥२॥
पापक्षालन तेही उत्तम मध्यम । वेदवचनार्थ सात्विक ते ॥३॥
उत्तमादि तेही त्रिधा यथाक्रम । प्रकार हे जाण माते, नऊ ॥४॥
श्रवणादि भेद नावांचेही नऊ । प्रकार हे बहु सगुणामाजी ॥५॥
निर्गुण भक्तीचा एकचि प्रकार । मुक्तिहूनि थोर तेचि भक्ति ॥६॥
लीलाश्रवणानें प्रेमपूर्ण चित्त । सिंधूकडे ओघ गंगेचा जैं ॥७॥
वासुदेव म्हणे आत्यंतिक ऐसी । संज्ञा या भक्तीसी शाश्वतत्वें ॥८॥

१६८
भागवतधर्मे वर्ततां हे भक्ति । उपजूनि चित्तीं स्थैर्य पावे ॥१॥
सर्वांतर्यामीं हा ऐसें न जाणतां । मूर्तीची जे पूजा दंभचि तो ॥२॥
भस्मामाजी होम तेंवी भेदयुक्त । मूर्तिपूजा व्यर्थ श्रमकारी ॥३॥
देहाभिमान तैं जया भेदबुद्धि । द्वेष भूतमात्रीं शांति न त्या ॥४॥
नित्य नैमित्तिक कर्मोत्तर माझी । पूजा मद्भक्तासी आवश्यक ॥५॥
भूतांहूनि भिन्न मानी जो मजसी । दु:ख मी स्वयेंचि तया देतों ॥६॥
यास्तवचि श्रेष्ठां बहुमान द्यावा । समांसी करावा स्नेह सदा ॥७॥
हीनांचा संतोष राखूनि समत्व - । सर्वांभूतीं नित्य आचरावें ॥८॥
वासुदेव म्हणे सर्वपूजा ऐसी । कथिती मातेसी श्रेष्ठ मुनि ॥९॥

१६९
सुमंगले माते, अचेतनाहूनि । सचेतन जनीं वृक्ष श्रेष्ठ ॥१॥
तयां जीवांहूनि प्राणधारी श्रेष्ठ । तयांहूनि श्रेष्ठ चित्तयुक्त ॥२॥
शब्दादि विषयग्राहक त्याहूनि । स्पर्श-ज्ञात्यांहूनि रसज्ञाते ॥३॥
भ्रमरादि गंधज्ञाते तयांहूनि । सर्पांदि त्याहूनि शब्दज्ञाते ॥४॥
माते, तयांहूनि श्रेष्ठ काकादिक । जयांप्रति रुपज्ञान घडे ॥५॥
मर्कटादिकां ज्यां ऊर्ध्वावर दंत । जाणावे वरिष्ठ काकाहूनि ॥६॥
वासुदेव म्हणे बहुपाद प्राणी । सर्पादिकांहूनि श्रेष्ठचि ते ॥७॥

१७०
बहुपादांहूनि श्रेष्ठ । जाणावे ते चतुष्पाद ॥१॥
पुढती मानव द्विपाद । तेथ चतुर्वर्ण श्रेष्ठ ॥२॥
वर्णांमाजी त्या ब्राह्मण । विप्रांमाजी तो वेदज्ञ ॥३॥
वेदार्थज्ञ तयाहूनि । श्रेष्ठ जाणावा या जनीं ॥४॥
तयाहूनि संशयछेत्ता । पुढती विहितकर्मकर्ता ॥५॥
श्रेष्ठ निष्काम नि:संग । आचरी जो धर्ममार्ग ॥६॥
देहासवें सर्व कर्मे । मज अर्पी निरभिमानें ॥७॥
सर्वश्रेष्ठ तोचि नर । माते करावा विचार ॥८॥
वासुदेव म्हणे ऐसे । पंथ ईश्वरप्राप्तीचे ॥९॥

१७१
केंवी या जीवासी संसाराची प्राप्ति । निवेदितों तेंचि माते आतां ॥१॥
प्रकृति पुरुष सृष्टिनियामक । जेणें कर्मभोग दैव तेंचि ॥२॥
भिन्न भिन्न गति लाभती दैवेंचि । माते, या जीवासी कर्मासम ॥३॥
ईशरुप तेंचि कारण भेदासी -। होतां, काल ऐसी संज्ञा तया ॥४॥
सर्वसंहारक जाणावा हा काल । स्वाधीन सकल देव याच्या ॥५॥
कर्मफलदाता विष्णु तो काळचि । शत्रुमित्र यासी समान ते ॥६॥
अदक्षांसी दक्ष राहूनि संहारी । इंद्र वृष्टि करी भयें याच्या ॥७॥
भयानेंचि याच्या ब्रह्मा विष्णु आदि । उत्पत्तिस्थित्यादि करिती कर्मे ॥८॥
मृत्यूचाही मृत्यू म्हणे वासुदेव । काळचि हें विश्व रची खची ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP