स्कंध ३ रा - अध्याय ७ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


३३
तोषूनि विदुर मैत्रेय मुनींसी । विनम्र भावेंसी प्रश्न करी ॥१॥
निर्गुणीं त्या केंवी गुणांचा आरोप । क्रीडा बालकवत्‍ संभवेना ॥२॥
इच्छा सहवास तया नसे कांहीं । अविद्येसी केंवी संबंध त्या ॥३॥
नित्य ज्ञानानंद जीवाचें स्वरुप । येई किंचितज्ञत्व केंवी तया ॥४॥
असूनि तो एक भिन्नत्व त्या केंवी । विषमता येई कैसी तेथें ॥५॥
वासुदेव म्हणे मैत्रेय क्षत्त्यासी । उत्तरें प्रश्नांची देती ऐसीं ॥६॥

३४
विदुरा, हा जीव भासे हीनदीन । तेचि माया जाण ईश्वराची ॥१॥
छिन्नशिर हस्तपादादि विहीन । पाही कोणी स्वप्न परी मिथ्या ॥२॥
तैसेचि हे भास जाणावे विदुरा । कां न ईश्वरा म्हणसी तरी ॥३॥
प्रतिबिंब हाल उदकांत पाहीं । संबंध न कांहीं चंद्रासी तो ॥४॥
प्रतिबिंबही तें स्थिरचि न हाले । तयावरी आले उदकगुण ॥५॥
तैसे उपाधीचे गुण हे भासती । संबंध ईशासी नसे त्यांचा ॥६॥
गाढ निद्रेसम ईश्वरीं रंगून । जाई ज्याचें मन दु:ख न त्या ॥७॥
वासुदेव म्हणे श्रवणें या शांति । उपजतां भक्ति काय तोटा ॥८॥

३५
क्षत्ता म्हणे माझे छेदिले संशय । परतंत्र जीव उपाधीनें ॥१॥
वास्तविक तया नसे कांहीं बाधा । निश्चय हा साचा होई मम ॥२॥
ज्ञाते किंवा मूढ सर्वकाळ सुखी । क्लेश मध्यस्थासी होती बहु ॥३॥
भाग्यानेंचि घडे साधूचा सहवास । अहो मम भाग्य तुमच्या संगें ॥४॥
विराटाची आतां कथावी संतती । विरंचीची कृती सकल सांगा ॥५॥
वासुदेव म्हणे शास्त्रोपायादिक । प्रश्न ते अनेक सुटती ऐका ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP