स्कंध ३ रा - अध्याय १७ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
८९
ब्रह्मदेववाक्य ऐकूनियां देव । होऊनि निर्भय निघूनि जाती ॥१॥
शतरर्षे ऐसीं लोटतां दुश्चिन्हें । भीम दिव्य क्रमें सकल होती ॥२॥
पातला प्रलय ऐसें वाटे जनां । जन्मले आश्रमामाजी दैत्य ॥३॥
क्षणक्षणा वृद्धि पावूनि वाढले । आकार लाभले पर्वताचा ॥४॥
हिरण्याक्ष एक हिरण्यकशिपु । नामें देवरिपु लाधले हीं ॥५॥
ब्रह्मस्वरें झाले अजिंक्य ते जनीं । गांजिली अवनी स्वसामध्यें ॥६॥
वासुदेव म्हणे जाई हिरण्याक्ष । वरुणलोकास युद्धेच्छेनें ॥७॥
९०
जलक्रीडा करी सागरीं तो दैत्य । गढूळ उदक करी त्याचें ॥१॥
विभावरी नामें वरुणनगरीं । जाऊनियां करी चेष्टा बहु ॥२॥
प्रत्यक्ष वरुणसभेमाजी जाई । आव्हान त्या देई युद्धास्तव ॥३॥
क्रुद्धही वरूण जाणूणियां काल । राहिला निश्चल संयमानें ॥४॥
म्हणे हिरण्याक्षा, आतां आम्ही वृद्ध । विष्णूसवें युद्ध करीं शौर्ये ॥५॥
युद्धेच्छा तो पूर्ण करील बा तुझी । मांस कोल्हींकुत्रीं भक्षितील ॥६॥
वासुदेव म्हणे अनुकूल काल । लाभतां गोपाल स्मरे ज्ञाता ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2019
TOP