स्कंध ३ रा - अध्याय २४ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
१२४
विदुरा, यापरी कांतेचें वचन । ऐकूनि कर्दम वदले तिज ॥१॥
प्रिये, खेद ऐसा करुं नको मनीं । कांता जे सद्गुणी तिज न दु:ख ॥२॥
व्रत नियमादि पाळीं तूं ऐसेच । पुत्र जगन्नाथ तुजसी जाण ॥३॥
घेऊनि अवतार करील उपदेश । छेदील समस्त हृदयग्रंथी ॥४॥
पतिवचनें ती करी आराधन । विश्वास ठेऊन पतीवरी ॥५॥
दीर्घकाल ऐसा लोटतां श्रीहरी । जन्मले उदरीं दयामय ॥६॥
वासुदेव म्हणे येऊनियां ब्रह्मा । बोलला वचना ऐका काय ॥७॥
१२५
सर्वज्ञ विरंची बोले कर्दमासी । संतुष्ट मजसी केलेंसी तूं ॥१॥
पितृआज्ञा पाळी पुत्र तोचि धन्य । करीं कन्यादान ऋषींप्रती ॥२॥
मरीच्यादि कोणकोणा अनुरुप । इतुकेंचि मात्र पाहीं यत्नें ॥३॥
पत्नीच्या उदरीं पातला श्रीहरी । कृतार्थ जाहली देवहूती ॥४॥
सुलक्षणी बाळ सांख्यशास्त्रवेत्ता । श्रेष्ठ लौकिकाचा ‘कपिल’ नामें ॥५॥
वासुदेव म्हणे बोलूनियां ऐसें । ब्रह्मा स्वस्थळातें निघूनि जाई ॥६॥
१२६
मरीचातें ‘कला’ अत्रीसी ‘अनसूया’ । ‘हविर्भू’ पुलस्त्या, पुलाहा ‘गति’ ॥१॥
‘श्रद्धा’ अंगिरातें ‘क्रिया’ ते ऋतूसी । अर्पी ‘अरुंधती’ वसिष्ठातें ॥२॥
भृगुलागीं ‘ख्याती’ अथर्वणा ‘शांति’ । कर्दम तो अर्पी परमानंदें ॥३॥
विरंचीवचनें कन्या ऐशारीती । अर्पूनियां चित्तीं तुष्ट झाला ॥४॥
वासुदेव म्हणे कांतांसवें मुनि । अपुलाल्या स्थानीं निघूनि गेले ॥५॥
१२७
पुढती एकांतीं कर्दम, पुत्रासी । प्रार्थी देवा, तूंचि सकल कर्ता ॥१॥
देवा, पूर्वकर्मे तापविनाशार्थ । दीर्घकाल कष्ट पडती जनीं ॥२॥
अनेक जन्मही कष्टतां कोणासी । प्रभो, तव प्राप्ति सुलभ नसे ॥३॥
ऐसेंहि असूनि अनुग्रह ऐसा । आम्हावरी साचा केलासी तूं ॥४॥
षड्गुणैश्वर्य तें लोळे तुझ्यापायीं । अन्य मज नाहीं इच्छा आतां ॥५॥
वासुदेव म्हणे संन्यासें भ्रमण । करीन कर्दम म्हणे आतां ॥६॥
१२८
बाळ म्हणे मुने, ज्ञानाचा उपदेश । करावया सत्य जन्मलों मी ॥१॥
यास्तव संन्यास घेईं वा न घेईं । नित्य लक्ष ठेवीं मजमाजी ॥२॥
बोलतों मी जें जें होतसे तें सत्य । जन्मूनियां सत्य वचन केलें ॥३॥
लिंगदेहचि हा जन्मासी कारण । होतां आत्मज्ञान सुटका त्याची ॥४॥
ज्ञान तें पूर्वीचें लुप्त झालें आजि । पुन: स्थापनेसी पातलों तें ॥५॥
मुने मम भक्ति करुनि हो मुक्ति । मातेसी उपदेश करीन हा ॥६॥
तेणें ती कृतार्थ निश्चयें । वासुदेव भावें गुण गाई ॥७॥
१२९
कपिलवचनें आनंदला मुनि । प्रेमें त्या घालूनि प्रदक्षिणा ॥१॥
वंदूनि वनांत गेला आनंदानें । कंठिला सुखानें मुनिमार्ग ॥२॥
ब्रह्मरुपीं चित्त करुनियां लीन । ईशप्रेमें ज्ञानरुप होई ॥३॥
अहं मम भाव त्यागूनि ईश्वर । पाहिला सर्वत्र कर्दमानें ॥४॥
क्षुधा, तृषा, शोक, मोह, जरा, मृत्यु । टाळूनियां हेतु पूर्ण त्याचे ॥५॥
वासुदेव म्हणे पूर्णावस्था ऐसी । लाभे कर्दमासी भावबळें ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 05, 2019
TOP