स्कंध ३ रा - अध्याय ५ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


२६
शुद्धात्मा विदुर गंगाद्वारी येई । मैत्रेयांसी पाही परमानंदें ॥१॥
वंदूनि तयांसी प्रश्न करी प्रेमें । वर्तावें नरानें केंवी सांगा ॥२॥
सुखार्थ प्रयत्न करिती सकळ । दु:ख तें अटळ परी तयां ॥३॥
श्रीहरीकृपेचा मार्ग दावीं आम्हां । अवतारमहिमा गाई त्याचा ॥४॥
निरिच्छें त्या केंवी निर्मिलें हें जग । संरक्षिलें सांग कैशापरी ॥५॥
आंवरुनि विश्व स्वयें होई लीन । केंवी तें कथन करा मुने ॥६॥
वासुदेव म्हणे विदुराचे प्रश्न । देऊनियां ध्यान ऐका प्रेमें ॥७॥

२७
एकचि तो केंवी ब्रह्मा विष्णु होई । अवतार घेई केंवी सांगा ॥१॥
चरित्र तयाचें तेंवी विश्वोत्पत्ति । नारायणें कैसी केली मुने ॥२॥
कर्मस्वभावही कथावे जीवांचे । कृष्णकथामृतें पुनित करा ॥३॥
व्यासांनीं यास्तव रचिलें भारत । मर्म त्याचें स्पष्ट न कळे जनां ॥४॥
यास्तव भ्रमरमकरंदन्यायें । मज निवेदावें कथासार ॥५॥
जगत्कल्याणार्थ श्रीकृष्णचरित्र । मैत्रेया, समग्र निवेदावें ॥६॥
वासुदेव म्हणे मैत्रेय योगींद्र । वदती तत्सार कथितों ऐका ॥७॥

२८
सृष्टयुत्पत्ति होतां दृश्यद्रष्टारुपें । भासे तोचि असे पूर्वीं एक ॥१॥
एकाकी न रमे म्हणूनि कारण - । कार्यरुप जाण मायाशक्ति - ॥२॥
योजूनियां, विश्व निर्मी हें लीलेनें । निर्मी निजांशानें चिदाभास ॥३॥
महत्तत्व तेणें विकार पावलें । काल गुण झाले साह्य तया ॥४॥
कार्य अधिभूत, कारण अध्यात्म । अधिदैव जाण कर्तारुप ॥५॥
ऐसा हा त्रिविध अहंकार होई । कारण सर्वांसी पुढती तोचि ॥६॥
वासुदेव म्हणे पूर्वीसम एथ । सृष्ट्युत्पत्तिवृत्त कथिलें असे ॥७॥

२९
अधिक जें एथें वर्णिलें तें ऐका । तत्त्वांच्या देवता अभिमानी ज्या ॥१॥
संघशक्त्याभावें सामर्थ्य न त्यांसी । यास्तव प्रभूसी प्रार्थिती त्या ॥२॥
देवा, नमस्कार असो तुजप्रति । शरणागतांसी छत्ररुपा ॥३॥
तापत्रयतप्त जीवांसी न सौख्य । संसारीं तूं एक त्राता आम्हां ॥४॥
पावना, त्वद्‍गुणश्रवणेंचि ज्ञान । घेईं हें वंदन जगत्पते ॥५॥
अहंममत्वें त्वच्चरण दुर्लभ । भक्तही दुर्लभ पामरांसी ॥६॥
वासुदेव म्हणे भक्तीनें विरक्ति । ज्ञानें घडे मुक्ति पुढती सुखें ॥७॥

३०
योगमार्गाहूनि भक्तिमार्ग श्रेष्ठ । योग्यां बहु कष्ट भक्तां सौख्य ॥१॥
अनादि अनंता निर्मूनि आम्हांसी । कार्य जें इच्छिसी न घडे कांहीं ॥२॥
कारणविभिन्न गुण आम्हांप्रति । कैसी सृष्ट्युत्पत्तिअ करणें सांग ॥३॥
ज्ञानदृष्टि जरी देसील तूं आम्हां । भोगूं भोग नाना सहज तरी ॥४॥
अजा अव्यया, कां आम्हां निर्मिलेंसी । रचावी ते सृष्टि केंवी कथीं ॥५॥
सामर्थ्यही तैसें देईं देवदेवा । मोद वासुदेवा स्तवनें होई ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP