स्कंध ३ रा - अध्याय १८ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
९१
ऐकूनिही, विष्णु हरील प्राणासी । लवही न चित्तीं भय दैत्या ॥१॥
शोधार्थ विष्णूच्या करी धडपड । भेटतां नारद कळलें वृत्त ॥२॥
रसातळीं तदा जाई तो क्रोधानें । वराहरुपानें दिसला विष्णु ॥३॥
तयालागीं क्रोधें म्हणे हे वनचरा । येसी कासयाला सागरीं या ॥४॥
कासया हे पृथ्वी नेसी उचलूनि । जा त्वरें टाकूनि आमुची ही ॥५॥
अधमा, हा वेष ओळखितों तव । वैरी मम देव रक्षिसी त्यां ॥६॥
योगमायाश्रमें वधिसी दैत्यांतें । वरा मम देव मातें गवसलासी ॥७॥
गदाघातें शिर फोडीन तत्काळ । अनाथ होतील देव, मुनि ॥८॥
शोकहीन तदा होतील बांधव । म्हणे वासुदेव पुढती ऐका ॥९॥
९२
ऐकूनि ते कटु शब्द । वराहासी येई क्रोध ॥१॥
कांपे थरथरां पृथ्वी । म्हणूनि प्रथम येई वरी ॥२॥
अर्पी तिज निज तेज । करी पूर्वस्थानस्थित ॥३॥
दैत्य मागोमाग येई । अंध क्रोधानें तो होई ॥४॥
करी अपशब्दवर्षाव । अंगावरीं घेई धांव ॥५॥
भूमिउद्धार पाहूनि । पुष्पें वर्पिलीं देवांनीं ॥६॥
हिरण्याक्ष भडके तदा । घेई स्कंधावरी गदा ॥७॥
वासुदेव म्हणे आतां । पाही वराह त्या दैत्या ॥८॥
९३
उपहासें बोले वराह तयासी । शोधितों तुजसी ग्रामसिंहा ॥१॥
दैवहीना, मृत्युद्वारीं ठेपलासी । तेणें भ्रष्ट मति जाहलीसे ॥२॥
व्यर्थ वल्गनांसी कोण घाली भीक । घेऊनि समक्ष पृथ्वी गेलों ॥३॥
भित्रा, निर्लज्जही वदलासी परी । ठाकलों समोरी युद्धास्तव ॥४॥
एकमेव वीर ऐसी तव ख्याति । तुज बलवंतासी वैर केलें ॥५॥
अंत त्याचा आतां करणें मज प्राप्त । जिंकूनियां मज रक्षीं दैत्यां ॥६॥
करीं आतां सत्य आपुलें वचन । वासुदेव गान पुढती करी ॥७॥
९४
डिंवचिल्या सर्पासम दैत्य क्रुद्ध । दीर्घ श्वासोच्छ्वास सोडीतसे ॥१॥
महा क्रोधें गदा हाणिली प्रभूसी । चुकवी सहजचि प्रभु स्वयें ॥२॥
पुढती एकमेक आघात करिती । वार चुकविती परस्पर ॥३॥
एकाचि स्त्रीस्तव महायोद्धे जेंवी । लढताती तेंवी लढती वीर ॥४॥
गदाघातें देह ठेंचूनियां जाती । अधिकचि होती क्रुद्ध तदा ॥५॥
दोघेही निपुण दोघे अति दक्ष । गदाही उत्कृष्ट दोघांप्रति ॥६॥
वासुदेव म्हणे युद्ध तें पहाया तया ठाया ब्रह्मयादिक ॥७॥
९५
पाहूनि दैत्याचें कौशल्य विरंची । वराहप्रभूसी विनवीतसे ॥१॥
म्हणे देवा, दैत्य उन्मत्त हा जाणा । गांजीतसे जनां सर्वकाल ॥२॥
याच्यासम वीर कोणीही न अन्य । भयाकुल जन तेणें बहु ॥३॥
बालक सर्पासी करी बहु क्रीडा । तेंवी वेळ ऐसा व्यर्थ जाई ॥४॥
सायंकाळ होतां दैत्य अनावर । यालागीं सत्वर मार्ग योजा ॥५॥
संपेल हा आतां अभिजित् मुहूर्त । स्मरा पूर्वशाप देवदेवा ॥६॥
वासुदेव म्हणे प्रार्थना प्रभूसी । ब्रह्मदेव ऐसी भावें करी ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2019
TOP