स्कंध ३ रा - अध्याय २ रा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
N/A९
विदुराचा प्रश्न ऐकूनि उद्धव । होई कंठरुद्ध बाष्पनेत्र ॥१॥
उत्तर तयासी देवने न ऐसें । पाहूनि क्षत्त्यातें धन्य वाटे ॥२॥
अकृत्रिम प्रेम कृष्णावरी त्याचें । बाल्यादारभ्य तें होतें बहु ॥३॥
पंच वर्षे वय असतां एकदां । आरंभिली पूजा श्रीकृष्णाची ॥४॥
इतुक्यांत माता भोजनासी बाही । परी उठला नाहीं त्यजूनि पूजा ॥५॥
जन्मभरी ऐसी निष्ठा कृष्णावरी । जयाच्या अंतरीं उद्धव तो ॥६॥
निजधामा कृष्ण जातां विदुराचा । प्रश्न होतां ऐसा गहिंवरला ॥७॥
झांकूनियां नेत्र जाहला तो स्तब्ध । वाटलें कौतुक विदुराप्रति ॥८॥
कृतार्थ मानूनि आदर वाढला । सावध जाहला उद्धव तैं ॥९॥
वासुदेव म्हणे भक्तीची हे धुंदी । येई जयाप्रति मुक्तचि तो ॥१०॥
१०
विदुरासी बोले उद्धव दु:खानें । त्यागिले श्रीकृष्णें आम्हांप्रति ॥१॥
अंधकारमय होती दशदिशा । तिलक द्वारकेचा पुसूनि गेला ॥२॥
कैसें कथूं सांगें कुशल मी आतां । भाग्यभानू जातां अस्ताचळीं ॥३॥
अहो भाग्यहीन वाटती यादव । सान्निध्येंही देव कळला नाहीं ॥४॥
क्षीरसिंधूमाजी होता यदा शशि । भासला मत्स्यचि मत्स्यांप्रती ॥५॥
सत्यरुप त्याचें कळलें न तदा । यादवांचा तैसा प्रकार हा ॥६॥
वासुदेव म्हणे अति परिचय । होतांचि मानव भ्रम पावे ॥७॥
११
पोक्तही यादवश्रेष्ठ हा माधव । मानिती मानव, परी तया ॥१॥
शिशुपालादींनीं निंदिले हरीसी । मोह मन्मनासी परी न झाला ॥२॥
योग्यता तयाची ज्ञात मज पूर्ण । द्यावया दर्शन पतितां आला ॥३॥
अतृप्त ठेवूनि जनांप्रति गेला । हरुनियां नेल्या वृत्ति तेणें ॥४॥
मायाबलदर्शी रुप तें अद्भुत । आश्चर्यकारक प्रभूलागींही ॥५॥
ऐश्वर्य सौंदर्यखाणचि केवळ । भूषणें सकळ खुलती जेणें ॥६॥
युधिष्ठिरराजसूय यज्ञामाजी । पाहूनि नृपांसी नवल वाटे ॥७॥
मूर्ति ही निर्मितां ब्रह्ययाचें चातुर्य । संपलें सकळ म्हणती जन ॥८॥
वासुदेव म्हणे गोपीचित्तचोर । श्रीकृष्ण, सौंदर्य सौंदर्याचें ॥९॥
१२
विदुरासी प्रेमें बोलला उद्धव । अजही अव्यय अवतरे हा ॥१॥
शांत अशांत वा रुपें त्यांचीं दोन । शांत ते सज्जन अन्य दैत्य ॥२॥
अशांतपीडित पाहूनि शांतांसी । दया माधवासी येई बहु ॥३॥
प्रवृत्तिसंयुक्त तदा तो होतसे । घर्षणें प्रगटे अग्नि जेंवी ॥४॥
व्यापकत्वें यदा भासे तो अदृश्य । तदाही आहेच अव्यक्त तो ॥५॥
तात्पर्य तो व्यक्त होतांही न जन्म - । पावला, हें मर्म ध्यानीं असो ॥६॥
वासुदेव म्हणे वसुदेवसदनीं । अवतार घेऊनि खेळे हरि ॥७॥
१३
कंसभयें आम्ही राहिलों गोकुळीं । सेवा नच झाली तेणें ताता ॥१॥
ऐसें वासुदेव बोले वसुदेवा । खेद कां न व्हावा ऐकूनि तें ॥२॥
अनीश्वरत्व त्या नसे या वचनें । भ्रुकुटीभंगानें हरिला भार ॥३॥
ईश्वरत्व त्याचें चरित्रेंचि सिद्ध । व्यर्थ खटाटोप प्रमाणांचा ॥
वैरीही जयाचे उद्धरुनि गेले । अलौलिक केलें कर्म ऐसें ॥५॥
त्रैलोक्य जयाच्या पदीं नम्र व्हावें । तेणें कां नमावें उग्रसेना ॥६॥
पूर्ण कृपा परी तयावरी त्याची । वासुदेव चिंती कृपावंता ॥७॥
१४
पूतना हराया आली प्राण श्रीहरीचे ॥
सदय हरीनें तिज नेली सद्गतीतें ॥१॥
ऐशा दयावंताविण शरण कोणासी ॥
विदुरा, जावें हें नित्य पुसावें मनासी ॥२॥
भक्तजनोद्धार केला नवल न कांहीं ॥
उद्धरुनि नेले रणीं वैरी । दुर्जनही ॥३॥
वासुदेव म्हणे आतां ऐका उद्धवोक्त ॥
चरित्र कृष्णाचें प्रेमें कथीन संक्षिप्त ॥४॥
१५
भूभारहरणकार्यार्थ विरंची । प्रार्थितां विष्णूसी दया आली ॥१॥
कंसकारागृहीं देवकीचा पुत्र । होऊनि अच्युत प्रगट झाला ॥२॥
वसुदेव भयें गोकुळीं त्या नेई । एकादश राही वरुषें तेथें ॥३॥
पक्षिकूजनें तें यमुनेचें तीर । निनादे, बळिभद्र कृष्णासवें ॥४॥
क्रीडा करिता तो शोभे सिंहछावा । चित्तीं वासुदेवा मोद बहु ॥५॥
१६
बाललीला त्याच्या मोहक उद्धवा । नित्य अवलोकाव्या म्हणती गोप ॥१॥
हंसावें रडावेंण नाचावें खेळावें । कौतुक करावें ऐसें बहु ॥२॥
शुभ्र दुग्धवर्ण धेनु वृषभ ते । चारीत आनंदें हिंडे वनीं ॥३॥
वेणुनादें धुंद करी गोपाळांसी । लीलामात्रें वधी कंसदूतां ॥४॥
कालिया सर्पाचें केलें उच्चाटण । धरिला गोवर्धन अंगुलीनें ॥५॥
शरद्ज्योत्स्नेमाजी गोपींसवें क्रीडा । मानूनि आनंदा करी बहू ॥६॥
वासुदेव म्हणे कृष्णासवें गोपी । क्रीडतां शोभती अनुपम ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2019
TOP