निर्वाण प्रकरण - ६६५० ते ६६६३
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
तुकारामबावानीं लोकांस नित्यपाठासाठीं स्वर्गाहून पाठविलेले अभंग.
॥६६५०॥
जन्माचें तें मूळ पाहिलें शोधून । दु:खासी कारण जन्म घ्यावा ॥१॥
पापपुण्य करुनी जन्मा येतो प्राणी । नरदेही येऊनी हानी केली ॥२॥
रजतमसत्व आहे ज्याचे अंगीं । याचगुणें जगीं वायां गेला ॥३॥
तम म्हणजे काय नर्कचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥४॥
तुका म्हणे येथें सत्याचें सामर्थ्य । करावा परमार्थ अहर्निशी ॥५॥
॥६६५१॥
अहर्निशी सदा परमार्थ करावा । पाय न ठेवावा आडमार्गी ॥१॥
आड मार्गी कोणी जन जे जातील । त्यांतून काढील तोचि मार्गी ॥२॥
तोचि ज्ञानी खरा तारी दुजीयासी । वेळोवेळां त्यासी शरण जावें ॥३॥
आपण तरेल नव्हें ते नवल । कुळें उद्धरील सर्वाचीं तो ॥४॥
शरण गेलियाने काय होतें फळ । तुका ह्मणे कुळ उद्धरिलें ॥५॥
॥६६५२॥
उद्धरिलें कूळ आपण तरला । तोचि एक झाला त्रैलोक्यांत ॥१॥
त्रैलोक्यांत झालें द्वैतचि निमालें । ऐसें साधियेलें साधन बरवें ॥२॥
बरवें साधन सुखशांतीं मना । क्रोध नाहीं जाणा तीळभरी ॥३॥
तीळभरी नाहीं चित्तासि तो मळ । तुका ह्मणे जळ गंगेचें तें ॥४॥
॥६६५३॥
जैसी गंगा वाहे तैसें त्याचें मन । भगवंत जाण त्याचे जवळी ॥१॥
त्याचे जवळी देव भक्तिभावें उभा । आनंदाचा गाभा तया दिसे ॥२॥
तया दिसे रुप अंगुष्ठाप्रमाण । अनुभवीं खूण जाणती हे ॥३॥
जाणती हे खुण स्वात्मअनुभवी । तुका ह्मणे पदवी ज्याची त्याला ॥४॥
॥६६५४॥
ज्याची त्याला पदवी इतरां न साजे । संतांलां उमजे आत्मसुख ॥१॥
आत्मसुख घ्यारे उघडा ज्ञानदृष्टी । यावीण चावटी करुं नका ॥२॥
करुं नका कांहीं संतसंग धरा । पुर्वीचा जो दोरा उगवला ॥३॥
उगवेल प्रारब्ध संतसंगें करुनि । प्रत्यक्ष पुराणीं वर्णियेले ॥४॥
वर्णियेलें एका गुणनामघोषें । जातीलरे दोष तुका ह्मणे ॥५॥
॥६६५५॥
दोषरे जातील अनंत जन्मींचे । पाय त्या देवाचे न सोडावे ॥१॥
न सोडावे पाय निश्चय तो करा । आळवा शारंग्धरा भावबळें ॥२॥
धरुनी केशव आणा भाववलें । पापीयां न कळे कांहीं केल्या ॥३॥
न कळे तो देव संतसंगावांचुनी । वासना जाळुनी शुद्ध करा ॥४॥
शुद्ध करा मन देहातीत व्हावें । वस्तूंसीं ओळखावें तुका ह्मणे ॥५॥
॥६६५६॥
ओळखा रे वस्तू सांडारे कल्पना । नका आडराना जाऊं झणीं ॥१॥
झणी जाल कोठें बुडवाल हीत । विचारीं मनांत आपुलीया ॥२॥
आपुलीया जीवें शिवासीं पाहावें । आत्मसुख घ्यावें वेळोवेळां ॥३॥
घ्यावें आत्मसुख स्वरुपीं मिळावें । भूतीं लीन व्हावें तुका म्हणे ॥४॥
॥६६५७॥
भुतीं लीन व्हावें सांगावें नलगेची । आतां अहंकाराची शांती करा ॥१॥
शांती करा तुह्मी ममता नसावी । अंतरीं असावी भूतदया ॥२॥
भूतदया ठेवा मग काय उणें । प्रथम साधन हेंचि असे ॥३॥
असो हें साधन ज्याचे चित्तीं वसे । मायाजाळ नासे तुका ह्मणे ॥४॥
॥६६५८॥
मायाजाळ नासे या नामें करुनी । प्रीति चक्रपाणि असों द्यावी ॥१॥
असों द्यावी प्रीति साधुच्या पायासीं । कदा कीर्तनासीं सोडूं नये ॥२॥
सोडुं नये पुराण । श्रवण कीर्तन । निजध्यास मनन साक्षात्कार ॥३॥
साक्षात्कार झाल्या सहज समाधी । तुका ह्मणे उपाधी गेली त्याची ॥४॥
॥६६५९॥
गेली त्याची जाणा तोचि ब्रह्म झाला । अंतरीं निवाला पूर्णपणें ॥१॥
पूर्णपणें झाला राहतो कैशा रीती । त्याची आतां स्थिती सांगतों मी ॥२॥
सांगतों तुह्मां ऐका मनोगत । राहातो मुर्खवत जगामाजी ॥३॥
जगांत पिशाच्य अंतरीं शाहाणा । सदा ब्रह्मीं जाणा निमग्न तो ॥४॥
निमग्न तो सदा जैसा मकरंद । अंतरबाह्य भेद वेगळाले ॥५॥
वेगळाले भेद किती त्या असती । हृद्गत त्याची गती नकळे कोणा ॥६॥
नकळे कोणाला त्याचें हेंचि वर्म । योगी म्हणे वर्म खूण त्याची ॥७॥
खूण त्याची जाणे जो तैसा असे ती । तुका म्हणे भ्रांती दुजीयाला ॥८॥
॥६६६०॥
दुजीयाला भ्रांती भाविकाला शांती । साधुचिये वृत्ती लीन झाली ॥१॥
लीन झाली वृत्ती ब्रम्हातें मिळाली । जळांत आटली लवण जैसें ॥२॥
लवण जैसें पुन्हा जळाचे बाहेरी । येत नाहीं खरें त्यांतूनियां ॥३॥
त्यासारिखी तुह्मी जाणा साधुवृत्ती ॥ पुन्हा न मिळती मायाजाळीं ॥४॥
मायाजाळ त्याला पुन्हारे बांधीना । सत्य सत्य जाणा तुका ह्मणे ॥५॥
॥६६६१॥
स्वर्गलोकींहुनी आले हे अभंग । धाडियेले सांग तुह्मालागीं ॥१॥
नित्य नेमें त्यासीं पढतां प्रतापें । जळतील पापें जन्मांतरींचीं ॥२॥
तयामागें पुढें रक्षी नारायण । मांडिल्या निर्वाण उडी घाली ॥३॥
बुद्धीचा पालट नासेल कुमती । होईल सद्गती येणे पंथें ॥४॥
सद्भक्ति झालीया सहज साक्षात्कार । होईल उद्धार पूर्वजांचा ॥५॥
साधतील येणें इहरपरलोक । सत्यसत्य भाक माझी तुह्मां ॥६॥
परउपकारासाठीं सांगितलें देवा । प्रसादीक मेवा ग्रहण करा ॥७॥
येणें भवव्यथा जाईल तुमची । सख्या विठ्ठलाची आण मज ॥८॥
टाळ आणि कंथा धाडिली निशाणी । घ्यारे वोळखोनी सज्जनहो ॥९॥
माझे दंडवत तुम्हां सर्व लोकां । देहा सहित तुका वैकुंठासी ॥१०॥
॥६६६२॥
सत्यसत्य जाणा त्रिवाचा नेम । अनुभव पाहा पदोपदीं ॥१॥
पदोपदीं पाहा श्रीमुख चांगलें । प्रत्यक्ष पाउलें विठोबाचीं ॥२॥
विठोबाची भेटी घडेल वाचितां । तुह्मालागीं आतां सांगितलें ॥३॥
सांगितलें खरें विश्वाचिया हीता । अभंग वाचितां जे कां नर ॥४॥
ते नर पठणीं जीवन्मुक्त झाले । पुन्हां नाहीं आले संसारासीं ॥५॥
संसार उडाला संदेह फीटला । पूर्ण तोचि झाला तुका ह्मणे ॥६॥
॥६६६३॥
पांच कोटी एक लक्षाचा शेवट । चौतीससहस्त्र स्पष्ट सांगितले ॥१॥
सांगितलें हें तुका कथुनीयां गेला । बारा अभंगांला सोडूं नका ॥२॥
सोडूं नका तुम्हा सांगितलें वर्म । भवपाशकर्मे चुकतील ॥३॥
चुकती यातायाती विठोबाची आण । करा हें पठण जीवेंभावें ॥४॥
जीवेंभावें करितां होईल दर्शन । प्रत्यक्ष सगुण तुका ह्मणे ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : May 26, 2019
TOP