निर्वाण प्रकरण - ६४९६ ते ६५०८
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
आपणां स्वत:स दु:ख झालें म्हणून धांवा केला नाहीं. लोकांचें दु:ख पहावत नाहीं ह्मणून धावां केला.
॥६४९६॥
नाहीं मागितला । तुम्हा मान म्यां विठ्ठला ॥१॥
जे हे करविली फजिती । माझी येवढी जनां हातीं ॥२॥
नाहीं केलें पोंट । पुढें घालूनी बोभाट ॥३॥
तुका ह्मणे धरुनी हात । नाहीं नेलें दिवाणांत ॥३॥
॥६४९७॥
बोलतों निकुरें । नव्हत सलगीचीं उत्तरें ॥१॥
माझें संतापलें मन । परपिडा ते पाहोन ॥२॥
आंगांवरी आलें । तोंवरी जाईल सोसीलें ॥३॥
तरी तुक भक्तांची आण देवा । जरी तुका येथें ठेवा ॥४॥
॥६४९८॥
आम्ही मागों ऐसें नाहीं तुजपासीं । जरी तूं भितोसी पांडुरंगा ॥१॥
पाहे विचारुन तुज आहे ठावें । आह्मी धालों नांवें तुझ्या एका ॥२॥
रिद्धि सिद्धि तुझें मोक्ष भांडवल । हे तों आह्मां फोल भक्ति पुढें ॥३॥
तुका ह्मणे जावें वैकुंठा चालत । बैसोनी निवांत सुख भोगूं ॥४॥
====
ऐसी देवास आण घालून देहुग्रामास येऊन सभोंवते संत समुदाय असून मध्यें आपण बैसले तों अकस्मात जरा प्रत्यक्ष
वृद्ध स्त्रीच्या रुपें येऊन कानीं सांगितलें कीं काळ सन्निध आला.
॥६४९९॥
जरा कर्णमुळीं सांतों आली गोष्टी । मृत्युचीये भेटी जवळी आली ॥१॥
आतां माझ्या मना होई सावधान । हे पुण्याची जाण कार्य सिद्धि ॥२॥
सेवटील घडी वुडतां नलगे वेळ । साधावा तो काळ जवळी आला ॥३॥
तुका ह्मणे चिंतिं कुळीची देवता । वारावा भोंवता मिथ्या शब्द ॥३॥
====
तेव्हां तुकारामबावा परम सावध होऊन पत्र लिहून मनोदुतां हातीं शेषशयनीं श्रीनारायणास धाडिलें.
॥६५००॥
काळावरी घालूं तरी तो सरिसा । न पुरवितां ईच्छा दास कैंचे ॥१॥
आतां नाहीं कांहीं उशिराचें काम । न खंडावें प्रेम नारायणें ॥२॥
देणें झालें मग विलंब कां आड । गोड तरी गोड आदि अंतीं ॥३॥
तुका ह्मणे होईल दर्शनें निश्चिती । गाईन तें गीतीं ध्यान मग ॥४॥
॥६५०१॥
आतां कशासाठीं दुरी । अंतर उरी राखिली ॥१॥
करी लवकरी मुळ । लाहाणे तीळ मुळींचिया ॥२॥
दाही ठायीं उद्योग वाणे । दरुषणें निश्चिती ॥३॥
तुका ह्मणे वेग व्हावा । ऐसी जेवा उत्कंठता ॥३॥
॥६५०२॥
उसंतील्या कर्मवाटा । बहुमोठा आघात ॥१॥
शिघ्र यावें शिघ्र यावें । हातीं न्यावें धरोनी ॥२॥
भागलों ये खटपटे । घटपटें करितां ॥३॥
तुका म्हणे कृपावंता । माझी चिंता खंडावी ॥४॥
॥६५०३॥
संतांचे उपदेश आमुचे मस्तकीं । नाहीं मृत्युलोकीं राहाणेंसा ॥१॥
म्हणऊनि बहु तळमळी चित्त । येई वो धांवत पांडुरंगा ॥२॥
उपजली चिंता लागला उसीर । होत नाहीं धीर निढळ वाटे ॥३॥
तुका म्हणे पोटीं रिघालेंसे भय । करुं आतां काय ऐसें झालें ॥४॥
॥६५०४॥
धर्माचि तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं ॥१॥
मज सोडवीं दातारा । कर्मापासूनि दुस्तरा ॥२॥
करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥३॥
जिवींच्या जीवना । तुका म्हणे नारायणा ॥४॥
॥६५०५॥
धरुनियां चाली हांवा । येईन गांवा धांवत ॥१॥
पाठविसी मूळ तरि । लवकरि विठ्ठले ॥२॥
नाचेन त्या प्रेमसुखें । कीर्ती मुखें गाईन ॥२॥
तुका म्हणे संतमेळीं । पायधुळी वंदीन ॥४॥
॥६५०६॥
आपुले गांवींचें न देखेसें झालें । परदेसी एकलें किती कंठुं ॥१॥
ह्मणऊनि पाहें मुळ येतां वाटे । जीवलग भेटे कोणी तरी ॥२॥
पाहतां अवघ्या दिसतील दिशा । सकळ ही वोसा दृष्टीपुढें ॥३॥
तुका ह्मणे कोणी न संगे वारता । तुझी वाटे चिंता पांडुरंगा ॥४॥
॥६५०७॥
आतां बरे झालें । सकाळींच कळों आलें ॥१॥
मज न ठेवीं इहलोकीं । आलों तेव्हां झाली चुकी ॥२॥
युगमहिमा ठावा । नव्हता ऐसा पुढें देवा ॥३॥
तुका म्हणे ठेवीं । भोगासाठीं निरयगांवीं ॥४॥
॥६५०८॥
तुह्मासी हें अवघें ठावें । किती द्यावें स्मरण ॥१॥
कां बा तुह्मी ऐसें नेणां । निष्ठुरपणें ढाळीतसां ॥२॥
आळवितां मायबापा । नये कृपा अझुनि ॥३॥
तुका ह्मणे जगदिशा । काय असां निजेले ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 15, 2019
TOP