निर्वाण प्रकरण - ६५३० ते ६५४९

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


देवानें आवडीनें कण्याची पेज सेवन केली.

॥६५३०॥
ऐका महिमा आवडीची । बोरें खाय भिल्लटिचीं ॥१॥
थोर प्रेमाचा भुकेला । हाची दुष्काळ तयाला ॥२॥
पोहे सुदाम देवाचे । फके मारी कोरडेच ॥३॥
न ह्मणे उचिष्ट अथवा थोडें । तुका ह्मणे भक्ति पुढें ॥३॥
====

देवभक्त जेवल्यानंतर लक्ष्मी, सत्यभामा, रुक्मिणी वगैरे तुकारामबावांच्या गृहीं प्रवेशन जिजाबाईच्या संसारास हसल्यावरुन ती तुकारामबावांस कठोरोत्तरें बोलली ते अभंग.

॥६५३१॥
मज चि भोंवता केला येणें जोग । काय याचा भोग अंतरला ॥१॥
चालोनियां घरा सर्व सुखें येती । माझी तों फजीती चुके चि ना ॥२॥
कोणाची बाईल होऊनियां वोढूं । संवसारीं कादूं अपदा किती ॥३॥
काय तरी देऊं तोडतील पोरें । मरतीं तरी बरें होतें आतां ॥४॥
कांहीं नेदी वांचों धोवियेलें घर । सारवावया ढोर शेण नाहीं ॥५॥
तुका ह्मणे रांड न करितां विचार । वाहुनियां भार कुंथे माथा ॥६॥

॥६५३२॥
काय नेणों होता दावेदार मेला । वैर तो साधिला होउनि गोहो ॥१॥
किती सर्वकाळ सोसावें हें दु:ख । किती लोकां मुख वासूं तरी ॥२॥
आपुली आई काय माझें केलें । धड या विठ्ठलें संसाराचें ॥३॥
तुका ह्मणे येती बाइले असडे । फुंदोनियां रडे हांसे काहीं ॥४॥

॥६५३३॥
गोणी आली घरा । दाणे खाऊं नेदी पोरा ॥१॥
भरी लोकांची पाठोरी । मेला चोरटा खाणोरी ॥२॥
खवळली पिसी । हातां झोंबे जैसी लासी ॥३॥
तुका ह्मणे खोटा । रांडे संचिताचा सांटा ॥४॥

॥६५३४॥
आतां पोरा काय खासी । गोहो झाला देवलसी ॥१॥
डोचकें तिंबी घालल्या माळा । उदमाचा सांडी चाळा ॥२॥
आपल्या पोटा केली थार । आमचा नाहीं येसपार ॥३॥
हातीं टाळ तोंड वासी । गाय देउळीं देवापासीं ॥४॥
आतां आह्मी करुं काय । न बसे घरीं राना जाय ॥५॥
तुका ह्मणे आतां धीरी । आझुनि नाहीं झालें तरी ॥६॥

॥६५३५॥
बरें झालें गेलें । आजी अवघें मिळालें ॥१॥
आतां खाइन पोटभरी । ओल्या कोरडया भाकरी ॥२॥
किती वरी तोंड । याशीं वाजवूं मी रांड ॥३॥
तुका बाइले मानवला । छि:थू करुनि यां बोला ॥४॥

॥६५३६॥
न करवे धंदा । आइता तोंडीं पडे लोंदा ॥१॥
उठितें तें कुटितें टाळ । अवघा मांडिला कोल्हाळ ॥२॥
जीवंत चि मेले । लाजा वाटुनियां प्याले ॥३॥
संवसाराकडे । न पाहाती ओस पडे ॥४॥
तळमळती यांच्या रांडा । घालिती जीवा नांवें धोंडा ॥५॥
तुका ह्मणे बरें झालें । घे गे बाइले लीहिलें ॥६॥

॥६५३७॥
कोण घरा येतें आमुच्या काशाला । काय ज्याचा त्याला नाहीं धंदा ॥१॥
देवासाठीं झालें ब्रह्मांड सोइरें । कोमळ्या उत्तरें काय वेचे ॥२॥
मानें पाचारितां नव्हे आराणुक । ऐसे येती लोक प्रीतीसाठीं ॥३॥
तुका ह्मणे रांडे नावडे भूषण । कांतेलेंसे श्वान लागे पाठीं ॥४॥

॥६५३८॥
निजों नेदी सकाळवेळीं । रातींकाळीं चिनचिनी ॥१॥
वोंगळानें घेतली पाठी । केली आठी जीवासी ॥२॥
मेळवूनि सवें जन चिंता नेणे देवळींच ॥३॥
तुका म्हणे आलों घरा । तोंडा घोरा बाइलेच्या ॥४॥

॥६५३९॥
घरीं रांडा पोरें मरती उपवासी । सांगे लोकांपासी थोरपण ॥१॥
नेऊनियां घरा दाखवावें काय । काळतोंडा जाय चुकावूनि ॥२॥
तुका ह्मणे आह्मी जाणों त्या प्रमाण । ठकावे हे जन तैसे नहों ॥३॥

॥६५४०॥
निघालें दिवाळें । झालें देवाचें वाटोळें ॥१॥
आतां वेचूं नये वाणी । विचारावें मनिच्या मनीं ॥२॥
गुंडाळिलीं पोतीं । भीतरी लावियेली वाती ॥३॥
तुका ह्मणे करा । ऐसा माजी घरा ॥४॥

॥६५४१॥
तुकोबाची कांता सांगे लोकांपाशीं । वेडा पंढरीशी जातो बाई ॥१॥
माझे मायबापें बरें नाहीं केलें । पदरीं बांधिलें भिकार्‍याच्या ॥२॥
चौघी माझ्या बहिणी नांदती सुखाच्या । माझी कर्मदशा ऐशी झाली ॥३॥
फुटकाचि वेणू तुटक्याचि तारा । घाली वेरजारा पंढरीसी ॥४॥
तुका ह्मणे तिनें ऐसें न करावें । परी शरण जावें विठोबाला ॥५॥

॥६५४२॥
तुकोबाची बाईल कैसी । मारी बुदबुदां पोरांसी ॥१॥
मेला जन्माचा भिकारी । नित्य सोडीना पंढरी ॥२॥
गुज ऐके शेजे नारी । पिसा हिंडे दारोदारीं ॥३॥
तुका म्हणे धीर धरी । अझुनी काय झालें तरी ॥४॥

॥६५४३॥
बाइलेनें भलें । ह्मणे दाविलें चांगलें ॥१॥
एकाविण एका । वेचें मोल होतें फुका ॥२॥
काळिमेनें राती । दिवस कळा आली होती ॥३॥
उंच नीच गारा । हिरा परीस मोहरा ॥४॥
विषें दाविलें अमृत । कडू गोड घात हीत ॥५॥
तुका ह्मणे भले । तैसे नष्टानें दाविलें ॥६॥
====

फाल्गुन शुद्ध एकादशीच्या दिवशीं देवासमोर
उभें राहून कीर्तन केलें.

॥६५४४॥
जोडोनियां कर । उभा राहिलों समोर ॥१॥
हेंचि माझें भांडवल । जाणे कारण विठ्ठल ॥२॥
भाकितों करुणा । आतां नुपेक्षावें दीना ॥३॥
तुका ह्मणे डोयी । ठेवीं वेळोवेळां पायीं ॥४॥

॥६५४५॥
न राहे क्षण एक वैकुंठीं । क्षीरसागरीं त्रिकुटीं ॥ जाय जेथें दाटी । वैष्णवांची धांवोनी ॥१॥
भाविक गे माय । भोळे गुणाचे ॥ आवडे तयाचें नाम घेतां तयाशीं ॥२॥
जो नातुडे कवणीये परी । तपें दानें व्रत थोडीं ॥ ह्मणतां नाचे हरी । रामकृष्ण गोविंद ॥३॥
चौदा भुवनें जयाच्या पोटीं । तो राहे भक्तांचिये कंठीं ॥ करोनीयां साठीं । चित्त क्षेम दोहींची ॥४॥
जया रुप ना आकार । धरी नाना अवतार ॥ घेतलीं हजार । नांवें ठेवुनी आपणा ॥५॥
ऐसा भक्तांचा हा ऋणी । पाहतां आनमीं पुराणी ॥ नाहीं तुका ह्मणे ध्यानीं । तो कीर्तनीं नाचतसे ॥६॥

॥६५४६॥
बरवा झाला वेवसाव । पावलों चिंतिलाची ठाव ॥ दृढ पायीं राहिला भाव । पावला जीव विश्रांती ॥१॥
बरवा फळला शकुन । अवघा निवारला शिण ॥ तुमचें झालिया दरुषण । जन्ममरण नाहीं आतां ॥२॥
बरवें झालें आलों ठाया । होतें संचित ठायींच्या पायां ॥ देह भाव पालटली काया । पडली छाया ब्रम्हींची ॥३॥
जोडलें न सरे हें धन । अविनाशी आनदंघन ॥ अमूर्त मूर्ति तूं मधुसुदन । समचरण देखियेले ॥४॥
जुनाट युगादीचें नाणें । बहुता काळचें ठेंगणें ॥ लोपलें होतें पारिखेपणें । ठाव चळणें चुकविला ॥५॥
आतां या जीवाचिये साठीं । न सोडी पडलिया मिठी ॥ तुका ह्मणे शिणलों जगजेठी । न लावी दिठी दुसर्‍याची ॥६॥

॥६५४७॥
देवा तूं आमचा कृपाळ । भक्तप्रतिपाळ दीनवत्सल ॥ माय तूं माउली स्नेहाळ । भार सकळ चालविसी ॥१॥
तुजलासी चिंता । राखणें लागे वांकडें जातां ॥ नये विसंबतां । धीर तुज ॥२॥
आम्हां भय चिंता नाहीं धाक । जन्म मरण कांही एक ॥ झाला इहलोकीं परलोक । आलें सकळीक वैकुंठ ॥३॥
नकळे दिवस किंवा रात्री । अखंड लागलीसे ज्योति ॥ आनंदलहरीची गती । वर्णू किती तया सुखा ॥४॥
तुझिया नामाचीं भूषणें । तुवां मज लेवविलें लेणें ॥ तुका म्हणे तुझिया पुण्यें । काय तें उणें एक आम्हा ॥५॥

॥६५४८॥
आतां येणें बळें पंढरीनाथ । जवळी राहिला तिष्ठत ॥ पहातां नकळे जयाचा अंत । तोचि हृदयांत घालूं आतां ॥१॥
विसरोन आपला देहपणभाव । नामें भुलला पंढरीराव ॥ न विचारी याति कुळ कांहीं ठाव । लागावया पाव संतांचे ॥२॥
बरें वर्म आलें आमुच्या हातां । हिंडांवे धुंडावें न लागतां ॥ होय अविनाश सत्ताकार दाता । चतुर्भुज संतां परी धांवें ॥३॥
आवडी होय सान थोर । रुप सुंदर मनोहर ॥ भक्तिभाव लोभापर । पाहे आदर याचकपणें ॥४॥
तें वर्म आलें आमुचिया हातां । म्हणोनि शरण रिघालों संता ॥ तुका म्हणे पंढरीनाथा । न सोडी आतां जीवेंसी ॥५॥

॥६५४९॥
कथा त्रिवेणीसंगम । भक्त आणि देवनाम ॥ तेथीचें उत्तम । चरणरज वंदितां ॥१॥
जळती दोषांचें डोंगर । शुद्ध होती नारीनर ॥ गाती ऐकती सादर । जे पवित्र हरिकथा ॥२॥
तीर्थे तयां ठायां येती पुनीत व्हावया ॥ पर्वकाळ पायां । तळीं वसे वैष्णवा ॥३॥
अनुपम्य हा महिमा । नाहीं द्यावया उपमा ॥ तुका ह्मणे ब्रह्मा । नेणें वर्णू या सुखा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 15, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP