निर्वाण प्रकरण - ६५७१ ते ६५८०
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
त्यानंतर तुकाराम बावांनीं भजन करुन देवांस आरती करुन लळीत केलें.
आरती
॥६५७१॥
जगदीश जगदीश तुज म्हणती । परि या जना माजी असशील युक्ती ॥
पुण्य पाप विरहित सकळां अधिपती । दृष्टा परी नळणी अलिप्त गती ॥१॥
जयदेव जयदेव जय पंढरीनाथा श्री पंढरीनाथा । नुरे पाप विठ्ठल ह्मणतां सर्वथा ॥२॥
आगमनिगम तुज नेणती कोणी । परी तूं भावभक्ति जवळीच दोन्ही ॥
नेणतां विधियुक्त राते पूजनीं । न माय ब्रम्हांडीं संपुष्ट शयनीं ॥३॥
असुरां काळ भासे विक्राळ पुढें । पसरी मुख एक चावितो धुंडें ॥
भक्तां शरणांगतां चाले तो पुढें । दावी वाट जाऊं नेदी वांकुडें ॥४॥
एकाएकीं बहू विस्तरला सुखें । खेळे लीळा त्याची तोचि कौतुकें ॥
तेथें नरनारी कवळ बाळकें । काय पाप पुण्य कवण सुख दु:खें ॥५॥
सकळां वर्मा तूंचि जाणसी एक । बंध मोक्ष प्राप्त आणि सुखदु:ख ॥
आणूं म्हणती तुज ठकलीं बहुतेक । तुका म्हणे शरण आलों मज राखें ॥६॥
लळीतें
॥६५७२॥
कळस वाहियेला शिरीं । सहस्त्र नामें पूजा करीं ॥१॥
पीक पिकलें पिकलें । घन दाटूनियां आलें ॥२॥
शेवटींचें दान । भागा आला नारायण ॥३॥
तुका ह्मणे पोट । भरलें वारले बोभाट ॥४॥
॥६५७३॥
गलित झाली काया । हेंचि लळीत पंढरीराया ॥१॥
आलें अवसानापासीं । रुप राहिलें मानसीं ॥२॥
वाहिला कळस । तेथें स्थिरावला रस ॥३॥
तुका म्हणे गोड झालें । नारायणीं पोट धालें ॥४॥
॥६५७४॥
बोलाचे गौरव । नव्हे माझा अनुभव ॥१॥
माझी हरिकथा माउली । नव्हे आणिकां पांगिली ॥२॥
व्याली वाढविलें । निजपदीं निजविलें ॥३॥
दाटली रसें । त्रिभुवन ब्रम्हरसें ॥४॥
विष्णु जोडी कर । रज माथां वंदी हर ॥५॥
तुका म्हणे बळ । तोरडी हा कळी काळ ॥६॥
====
सप्तरात्री देव व भक्ता बरोबर क्रमून निर्याण काळ समीप आला असें पाहून इंद्रायणीच्या कांठीं भजन करीत चालले तेव्हां देवादि विमानांत बसून समारंभ पाहवयास आले.
॥६५७५॥
वाट वैकुंठीं पहाती । भक्त कैं पा येथें येती ॥
तयां जन्म मरणखंती । नाहीं चित्तीं परलोक ॥१॥
धन्य धन्य हरीचे दास । तया सुलभ गर्भवास ॥
ब्रह्मादिक करिती आस । तीर्थे वास भेटिची ॥२॥
कथा श्रवण व्हावयास । यमधर्मा थोर आस ॥
पाहाती रात्रंदिवस । वाट कर जोडूनियां ॥३॥
रिद्धीसिद्धी न पाचारितां । त्या धुंडिती हरिभक्तां ॥
मोक्ष सायुज्यता । वाट पाहे भक्तांची ॥४॥
असती जेथें उभे ठेले । सदां प्रेमसुखें धाले ॥
आणिकही उद्धरीले । महा दोषी चांडाळ ॥५॥
सकळ करिती त्यांची आस । सर्व भावें ते उदास ॥
धन्य भाग्य त्यांस । तुका ह्मणे दरुषणें ॥६॥
॥६५७६॥
नाहीं कंटाळलों परी वाटे भय । करावें तें काय न कळतां ॥१॥
जनवन आम्हां समानचि झालें । काम क्रोध केले पाठवणी ॥२॥
षड् ऊर्मि शत्रु जिंकिलें अनंता । नामाचिया सत्ताबळें तुझ्या ॥३॥
मुख्य धर्म आह्मां सेवकांचा ऐसा । स्वामी करी शिरसा पाळावें तें ॥४॥
ह्मणऊनी तुका अवलोकोनी पाय । वचनाची पाहे वास एका ॥५॥
॥६५७७॥
आतां आवश्यक करणें समाधान । पाहिलें निर्वाण न पाहिजे ॥१॥
केलें तरी आतां सुशोभ्य करावें । दिसतें बरवें संतांमधीं ॥२॥
नाहीं भक्तराजीं ठेविला उद्धार । नामाचा आकार त्यांचियानें ॥३॥
तुका ह्मणे माझ्या वडिलांचें ठेवणें । गोप्य नारायणें न करावें ॥४॥
====
प्रयाणापूर्वी पंढरीनाथानीं तुकारामबावास प्रायश्चित्त घेण्यास सांगितलें.
॥६५७८॥
एक वेळ प्रायश्चित्त । केलें चित्त मुंडण ॥१॥
अहंकार नांवें दोष । त्याचें ओस पाडिलें ॥२॥
अनुतापें स्नानविधी । यज्ञसिद्धि देह होम ॥३॥
जीव शिवा होतां चुका । तेथें तुका विनटला ॥४॥
॥६५७९॥
झाली होती काया । बहुत मलीन पंढरीराया ॥१॥
तुमच्या उजळली नामें । चित्त प्रक्षाळिलें प्रेमें ॥२॥
अनुतापें झाला झाडा प्रालब्धानें केला तोडा ॥३॥
तुका ह्मणे देह पायीं । ठेउनी झालों उतराई ॥४॥
॥६५८०॥
संसाराचे अंगीं अवघीं च व्यसनें । आह्मी या कीर्तनें शुद्ध झालों ॥१॥
आतां हें सोंवळें झालें त्रिभुवन । विषम धोऊन सांडियेलें ॥२॥
ब्रह्मपुरीं वास करणें अखंड । न देखिजे तोंड विटाळाचें ॥३॥
तुका ह्मणे आह्मां एकांताचा वास । ब्रह्मीं ब्रम्हरस सेवूं सदा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 15, 2019
TOP